Login

हे बंध रेशमाचे... भाग ६

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे... भाग ६

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, उमाला मानसिक ताणामुळे चक्कर आली आहे. मावस सासुबाई जे बोलल्या ते ऐकून आपल्या आत्याबाईंची काय प्रतिक्रिया येतेय असे वाटून उमा अधिकच घाबरलीय. आता पुढे...

आपल्या बहिणीकडे तोंड वळवत पारूबाई म्हणाली,
"काय कवतिक सांगती सुनंच, यकदा फतकाल घालून बसली, तर बसला जागा उटवतो का तिला? कधी यळंवर आन् खाया मिळालंय का तुमास्नी? आली कवतिक करनारी. माजी सून रानात जात न्हाई, पर दर मैन्याला करकरीत नोटा आनती. तुजी दोन पोरं तू कशी सांभाळली त्ये मी बगीतलं हुतं. ही साळंत लोकाची यवडी पोरं दिसभर सांभाळती. आन् घरातलं समदं काम तीच करती. म्या काडीला बी हात लावत न्हाय." विषय करंडे सोडून भलतीकडेच गेला आहे हे ऐकून उमाला बरे वाटले.

पारूबाईच्या डोळ्यात काळजी दिसत होती. तिने सुनेला थोडावेळ आत जाऊन पडून राहायला सांगितले व ती आपल्या कामाला लागली.
तिच्या माहेराहून आणलेल्या दुरड्या तिने अंगणात मध्यभागी मांडायला लावल्या. येणाऱ्या बायकांनी त्या करंड्यांना हळदीकूंकू लावले. दुरड्या सोडून त्यातील एक सजुरी, एक लाटी वडी येणाऱ्या महिलांना देण्यासाठी आपल्या जावेला बसवले.

थोड्यावेळाने उमा उठून स्वयंपाकघरात आली. बाहेरचा आवाज तिच्या कानावर पडत होता. दरवेळी दुरड्या सोडताना सासुबाई तिला येणाऱ्या बायकांच्या पाया पडायला लावत, म्हणून ती बाहेर गेली व तिथे त्यावेळी आलेल्या बायकांच्या पाया पडू लागली तशी पारूबाई कडाडली.
"व्हय गं, लै जोर आलाय व्हय तुला वाकायला? तुला म्या बोलीवलं हुतं का भायेर? कशापायी आलीस मंग? मुकाट्यानं आत हो." हे ऐकून तिथे आलेल्या बायका टकामका एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागल्या. ती मुकाट्याने आत गेली. चुलीपुढे बसून ती स्वयंपाक करता करता बाहेर काय चाललंय ते पाहत होती.
सासुबाई माच्यावर बसून येणाऱ्या गावातल्या बायकांशी बोलत होत्या.
चुकूनमाकून एखादी बाई तिला बघण्यासाठी आत येत होती. तिच्याशी दोन शब्द बोलून बाहेर जात होती.

अजून तरी आत्याबाईंनी दुरड्यांबद्दल अवाक्षरही काढलेले नाही हे पाहून तिच्या जीवात जीव आला. मगाशी बाहेर गेली तेव्हा तिने करंडे मोजले होते. सात करंडे होते. ते पाहून तिला भीती वाटली होती.

बायकांचा येण्याचा वेग मंदावला तसे पारूबाईंनी तेथून आपले बस्तान हलवले व त्या आत उमाच्या काकीच्या शेजारी जाऊन बसल्या.
"व्हय, म्या काय म्हनते उमाला चक्कर आली हुती हे तिच्या आयला सांगू नकासा. उगं त्यांच्या जीवाला घोर नगो. उद्या तुम्ही जाताना उमाला दोन दिस घिऊन जावा. म्हायारी गेलं की बरं वाटतं जीवाला." लेकीच्या सासरी येऊन कमी अधिक काही बोलायचे नसते असे वळण असणाऱ्या काकीने होकारार्थी मान हलवली.

आपल्या चक्कर येण्यामुळे सासुबाई धास्तावलेल्या आहेत हे उमाच्या लक्षात आले.
"आत्याबाई, नको आता जायला माहेरी. नवव्या महिन्यातच जाईन मी. उद्याची शाळेला सुट्टी पडेल माझी."
"पडू दे पडली तर. दोन दिस त्येवडंच बरं वाटंल जीवाला."
"अहो, पण माझ्याच ओटीभरणासाठी आलेल्या पाव्हण्यांनी घर भरलंय आणि मी कशी जाऊ?"
"आदी तुच व्हतीस का? आली मोटी कामाची. जा मुकाट्यानं कापडं भर पिशवीत. पाव्हणीबाय, घिऊन जावा तिला." यावर तिचा नाईलाज झाला. कपडे पिशवीत भरताना खरं तर तिला आता आईला भेटता येईल याचा आनंद झाला होता.

आपल्याला चक्कर आल्याचा इतका परिणाम आत्याबाईंवर झालेला पाहून तिला विस्मय वाटला. करंडे कमी दिल्याबाबत त्या एका शब्दानेही काही बोलल्या नाहीत. तिला तर वाटले होते, गावातल्या बायकांसमोर आपल्या काकीला आत्याबाई काहीतरी लागट बोलतील, पण तसे काहीच झाले नाही. हे सगळे आपल्या पोटात वाढत असलेल्या घराण्याच्या वंशाच्या काळजीपोटी चाललेय का? असा प्रश्न तिच्या मनात डोकावला.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all