Login

हे बंध रेशमाचे... भाग ९

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे... भाग ९

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.


मोगऱ्याच्या वेलापाशी विचारात गढलेली उमा आपल्या पोटात काय असेल? मुलगा की मुलगी? या विचाराने त्रस्त झाली आहे. आता पुढे...

"उमा, कुटं हायंस? चल की जेवायला." अशी हाक मारत आई बाहेर आली म्हणून उमा विचारांच्या आवर्तातून बाहेर आली. आई जर अचानक तिच्या समोर येऊन उभी राहिली असती, तर आपली पोरगी कसल्या भीतीने एवढी त्रासली आहे याचे तिला कोडे पडले असते.

ती आईच्या मागोमाग आत गेली. जेवण झाल्यावर मामा परत गेला. मामी व आईने मागचे सगळे आवरले व आई शेताकडे गेली.

आता मामी व उमा दोघीच घरात होत्या. दोघींच्या गप्पा रंगल्या. गप्पांच्या ओघात उमाने मामीला विचारले,
"तुम्हाला काय वाटते मामी, मला मुलगा होईल का मुलगी?"

"काय का होईना, त्याच्यापाशी काय आहे? आईला आपलं बाळ प्रिय असतं, मग तो मुलगा असला काय किंवा मुलगी."

"पण बाकीच्यांची अपेक्षा असेल तर?" उमा म्हणाली.

"ही काय तुझ्या हातातली गोष्ट आहे का? कशाला नाही तो विचार करतेस? उलट आता तू आनंदी रहायला हवंय. पोटात बाळ आहे तुझ्या. काय होईल ते होईल, बाळ बाळंतीण सुखरूप असले म्हणजे झाले. तुला कुणी काही म्हंटले का?"

"थेट म्हटले नाही, पण त्यांच्या बोलण्यातून जाणवते की त्यांना वंशाला दिवा हवाय."

"आले लक्षात. सासुबाईंची अपेक्षा असणार. लक्ष देऊ नकोस. आपल्या तब्येतीकडे लक्ष दे. स्वतःची काळजी घे. एकदा बाळ घरात आले की सगळ्या अपेक्षा गुंडाळून ठेवतील बघ त्या." मामी समजुतीच्या स्वरात म्हणाली.

"असे नाही झाले तर?"

"पुढचे पुढे बघता येईल. आत्तापासूनच कशाला डोक्यात घेऊन बसलीयस? नवरा काय टाकणार आहे का तुला? सासूनं काहीपण बोलू दे. ऐकून घ्यायचं, अन् खाली मान घालून गप्प बसायचं. ओरडून ओरडून आपल्या मनानं गप्प बसंल. उगा तोंडाला लागलं तर भांडणं होतात आणि नात्यात पण बिघाड होतो.
मला बघितलंय का कधी आज्जीला उलट बोलताना? त्यांची बडबड मला ऐकायलाच येत नाही आता, इतके मी दुर्लक्ष करायला शिकलेय."

हे ऐकून उमा खुदकन हसली. ती आजीची बडबड ऐकायचीच की.
मामीशी बोलल्यामुळे तिला जरा हलके वाटले. मनावरचे मणामणाचे ओझे दूर झाले.

"बरं, मामी आता भेळ खावीशी वाटतेय." उमा म्हणाली.

"आत्ता करते. हिरवी मिरची घालू की तिखट?"

"तिखट घाला. मस्त झणझणीत करा, अन् चिंच जरा जास्तच घाला."

"चिंच जास्त खाऊ वाटतीय? मग मुलगीच होणार." मामी हसत हसत म्हणाली ते ऐकून उमा म्हणाली,

"पहिली बेटी धनाची पेटी."

"हो का? अन् मघाशी कसले खूळ आले होते मग!" मामी म्हणाली.

यावर हसत हसत उमा म्हणाली,
"मला आज मिळणार आहे का भेळ? नाही तर माझ्या बाळाचा कान फुटेल. माझे डोहाळे पुरवा आधी, मग प्रश्न विचारा."

यावर मामी हसतच भेळ करायला उठल्या.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
0

🎭 Series Post

View all