हे बंध रेशमाचे... भाग १०
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
मुलगा की मुलगी या द्वंद्वाचा प्रवास करणारी उमा आपण मागच्या भागात पाहिली. आता पुढे...
"मामी, एकदम भारी झालीय भेळ. थोडी आणखी द्या."
"नको, जास्त खाल्ली तर रात्री जेवण जाणार नाही. तुझी इच्छा होती म्हणून बनवली. पित्त वाढेल याने. तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, नाही तर आजारी पडलीस तर तुझ्या सासरची माणसं म्हणतील, माहेरी गेली आणि आजारी पडून आली." हे ऐकून उमाने हात आवरता घेतला. दोघींनी चहा घेतला व थोडे चालण्यासाठी त्या बाहेर पडल्या.
चालत पुढे गेल्यावर वंदना भेटली. उमाला फार आनंद झाला, कारण वंदनाचे लग्न झाल्यापासून दोघींची भेट कधीमधीच व्हायची. अवघडलेल्या वंदनाच्या बोटाला पकडून तिची साधारण तीन वर्षांची मुलगी चालत होती. तिच्याशी बोलत वंदना चालत होती. उमाला पाहून तिलाही खूप आनंद झाला. दोघींनीही एकमेकींना घट्ट मिठी मारली. ती चिमुकली या दोघींकडे टकामका बघत होती. त्याने तिचा गालगुच्चा घेतला व विचारले,
"काय नाव गं तुझे?" ती लाजून म्हणाली,
"शरयू."
"अय्या, छान आहे की तुझे नाव. मी तुला शरूच म्हणेन, चालेल?" तिने हसून मान डोलावली.
"मी कोण आहे माहीत आहे का?" तिने नकारार्थी मान हलवली.
"मी तुझी मावशी आहे मावशी. ही तुझी आई आणि मी कायम एकत्र असायचो." ती आपली नुसतीच तोंडाकडे पाहत होती.
"कधी आलीस गं वंदना? आई काही म्हणाली नाही, तू आली आहेस म्हणून."
"अगं, आजच आले. तू कशी आहेस? तू कधी आलीस?"
"अगं, मी तर कालच आलेय. काकी आणि दादू डोहाळेबुत्ती घेऊन आले होते, तर आत्याबाई म्हणाल्या, जा, दोन दिवस माहेरी जाऊन ये. मला जरा चक्कर आली होती, त्यामुळे त्यांनी विश्रांतीसाठी पाठवले दोन दिवस."
"छान आहे, पण उद्या जर मुलगी झाली तर हे प्रेम, ही माया अशीच टिकवून ठेवा म्हणाव."
"म्हणजे काय गं?"
"अगं मी यातून गेलेय म्हणून सांगितले. शरयूचा जन्म झाला त्यावेळी मला बघायला अगर भेटायला सासरचे कुणीही आले नव्हते. आले ते थेट बारशालाच."
"नवरा? तो पण आला नव्हता?"
"तो आठ दिवसांनंतर आला होता."
"मग तू रागावली नाहीस त्यांच्यावर? इतरांचे ठीक आहे, पण त्याने तरी लगेच यायला हवे होते ना! बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो."
"काय रागावून करायचं? इच्छा असती तर तो त्याचदिवशी पण येऊ शकला असता. त्याला काय कुणी बांधून ठेवले होते का? मी काही बोलले असते तर त्यावर गुळमुळीत उत्तर मिळाले असते फक्त मला. त्यामुळे मी काहीच बोलले नाही."
"मुलाला आणि मुलीला प्रसववेदना वेगवेगळ्या असतात का? या सासवा पण बाईच्या जन्माला येऊन अशा का वागतात?"
"आता तर मला म्हणतात, मुलगा झाला तरच सासरी ये, नाही तर तिकडेच राहा."
"आणि नवरा? तो काय म्हणतो?" अस्वस्थ होऊन उमाने विचारले.
"तो काहीच बोलत नाही, याचेच वाईट वाटते. तो आईला का ठणकावून सांगत नाही की गप्प बस, मुलगा, मुलगी काहीही झालं तरी मला फरक पडणार नाही, तर तू का बडबड करतेस?
त्यामुळे त्याच्या मनातही तेच आहे हा समजून येतं." वंदना एक उसासा टाकत म्हणाली.
त्यामुळे त्याच्या मनातही तेच आहे हा समजून येतं." वंदना एक उसासा टाकत म्हणाली.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
