Login

हे बंध रेशमाचे... भाग ११

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे... भाग ११

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

वंदना आणि उमाच्या गप्पा सुरू आहेत. तिचे अनुभव ऐकून उमा अस्वस्थ झाली आहे. आता पुढे...

"असं कसं वंदू? तुझ्या नवऱ्याला जाणीव नाही का आपल्या बायकोची? लग्नाच्या वेळी जे विधी केले जातात ती वचने जपण्याचे काम फक्त स्त्रीचेच आहे का?"

"उमा, लग्नाच्या वेळी किंवा त्यानंतरचे काही दिवस आपल्याभोवती भिरभिरत फिरणारा नवरा पाहून आपण सुखावतो, पण नवऱ्याची खरी ओळख अशा प्रसंगी होते. कुठल्याही स्त्रीला जर नवऱ्याचा पाठिंबा असेल तर ती सगळ्या जगाशी लढू शकते, पण तोच जर उदासीन असेल तर ती घरातही आपले स्थान निर्माण करू शकत नाही गं. तिथं ती पालापाचोळा ठरते."

"खरं आहे गं वंदू तू म्हणतेस ते. यासाठी बाईने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे."

"अगं, ही शरयू झाली आणि मी नाही तिला सांभाळणार असे सासुबाईंनी सांगितले. त्यामुळे मला नोकरी सोडावी लागली. नवऱ्याशी बोलले तर त्याला काहीच फरक पडत नव्हता माझ्या नोकरी सोडण्याचा."

"बरं, आता तब्येतीची काळजी घे. किती काळवंडली आहेस! काळजी करू नकोस, सगळे व्यवस्थित होईल."

"मुलगा झाला तर... वंशाला दिवा मिळाला तरच मी पुन्हा त्याची जायचेय."

"असे काही नाही गं. सासुबाई बोलल्या म्हणजे लगेच तसेच करतील असे नाही ना! नवरा काही बोलत नसेल, आईविरूध्द कसे बोलायचे म्हणून, पण त्यालाही खटकत असेल आईचे वागणे मनातून. फार विचार करू नकोस याचा. तब्येतीकडे लक्ष दे. शरयुकडे लक्ष दे. सगळे चांगले होईल."

तिचा निरोप घेऊन उमा माघारी परतली. परतताना ती गप्प झालीय हे लक्षात येऊन मामीने तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा चेहरा कोमेजला होता.

दोघी घरी आल्या तर आई शेतातून परत आली होती. बाबांनी तिच्यासाठी कोंबडा कापला होता. त्याचा स्वयंपाक बनवणे आईने सुरू केले होते. उमाचा कसनुसा झालेला चेहरा पाहून तिने काळजीने विचारले,
" काय झालं गं? चेहरा का इतका उतरलाय?"
"काही नाही गं, दमले."
"मग कशाला चालायचं एवढं? व्हय गं, तुला पण कळलं नाही का?" ती मामीकडे बघून दटावली.

"वन्स, तिला वंदू भेटली होती. दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या. आम्ही काय लांब गेलो नव्हतो, इथंच कोपऱ्यापर्यंत गेलो होतो."
मामीने आपली बाजू सावरली‌.

"अगं, मग मैतरणीला घरी घेऊन यायचं नाहीस का? दोघीजणी सोबत जेवला असता. थांब, मीच सुशीला जाऊन सांगते, वंदूला इकडचं जेवायला पाठव म्हणून." असे म्हणत आई बाहेर पडली सुध्दा. वंदुच्या बोलण्यातून अजून बाहेर न पडलेली उमा आईकडे फक्त पाहत राहिली...

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all