हे बंध रेशमाचे भाग १५
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
उमाने रजेसाठी अर्ज दिला आहे. बाळंतपणासाठी माहेरी जायचे आहे असे तिने ठरवले आहे. आता पुढे...
"बाई, तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही गावातच राहता. सध्या शाळेतील कदम बाई बदलून गेल्या आहेत. त्यांच्या जागेवर नवीन कुणाची नेमणूक अजून झाली नाही. तुम्ही आत्ता सुट्टी काढण्याऐवजी अजून काही दिवस काम करता का? ही सुट्टी तुम्ही बाळंतपणानंतर घेऊ शकता. शाळेची अडचण आहे म्हणून विनंती करतोय. बघा तुम्हाला जमत असेल तर. तुमची तब्येत ठीक आहे म्हणून विचारतोय. बघा जमतंय का?" मुख्याध्यापक पाटील यांनी विचारले.
यावर उमा विचारात पडली. अजून पंधरा दिवस ती शाळेत येऊ शकली असती. मी उद्या सांगते असे तिने मुख्याध्यापकांना सांगितले. घरी आल्यावर तिने याबाबत महेशरावांशी चर्चा केली. त्यांचेही म्हणणे पडले की, शाळेची अडचण लक्षात घेता अजून थोडे दिवस थांबावे. काही अडचण आलीच तर गावात सरकारी दवाखाना आहेच. त्यामुळे अजून काही दिवस सुट्टी काढायचे थांबूयात असे ठरले.
आत्याबाईंनी सुट्टी काढ म्हणून मागे घायटा घेतला होता. शाळेची अडचण आहे म्हणून अजून काही दिवस सुट्टी मिळणार नाही असे तिने सांगितले. आता ती अवघडली होती. तरीही स्वयंपाकाचे काम तिच्याकडेच होते. सारखी उठबस करणे तिला अवघड जात होते. तरीही ती नेटाने सगळे करत होती व शाळेतही जात होती.
एकदाची देशमुख बाईंची नियुक्ती झाली आणि उमाची सुटका झाली. तिने बॅग भरायला घेतली हे पाहून पारूबाई म्हणाली,
"नव्हं, आता नववा महिना सरत आलाया, तर मंग इथंच ऱ्हा की. इथंच करू बाळातपन. तुज्या म्हायारला गावात दवाखाना बी न्हाई."
"आत्या, कटोलीच्या दवाखान्यात माझ्या नावाची नोंदणी केली आहे. दादाच्या दोस्ताची गाडी आहे. त्यामुळे रात्री जायची वेळ आली तरी अडचण येणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तिथं माझे चुलते,चुलत्या पण आहेत."
"तरी बी मला वाटतंया तू इथंच ऱ्हा. मग बाळातपन झाल्याव जा म्हायारला." आता ती कोंडीत सापडली. त्यांच्या बोलण्यातून तिच्याबद्दलची काळजी जाणवत होती, पण सासरी बाळंतपणापर्यंत रहायचे आणि नंतर ही इथेच थोडे दिवस थांबणे तिला नको वाटतं होतं. कितीही झालं तरी पहिलटकरीण होती ती. आईशी जसे मोकळेपणाने बोलू शकतो तसे सासूशी बोलू शकणार नाही हे तिला माहीत होते.
तिने महेशरावांपाशी विषय काढला.
"मला बाळंतपणासाठी आईकडं जायचं आहे. आत्याबाई इथंच थांब म्हणतायत. बाळंतपण झाल्यावर जा म्हणतायत."
"मग थांब की. ती म्हणतेय तर नंतर जा."
"अहो, तुम्ही तरी समजून घ्या. आईशी मी जेवढ्या मोकळेपणाने बोलेन तेवढे आत्यांशी बोलू शकेन का? तुम्ही आत्ता तरी माझा थोडा विचार करा." हे ऐकल्यावर महेशराव थोडावेळ शांत बसले. मग म्हणाले,
"ठीक आहे, कर तू तयारी. मीच उद्या तुला सोडून येतो. सांगतो मी आईला समजून, काळजी करू नकोस, पण तिकडे गेल्यावर स्वतःची काळजी घ्यायची. आमच्या जीवाला घोर लावू नकोस म्हणजे बास." हे महेशरावांचे शब्द ऐकले आणि तिला आनंद झाला. तिने पुन्हा आपली बॅग भरायला घेतली.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
पारूबाईंना सांगितल्यावर त्यांची याबाबत काय प्रतिक्रिया असेल? जाऊ देतील उमाला? वाचकांना काय वाटते?
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा