हे बंध रेशमाचे... भाग १६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
महेश रावांनी उमाला माहेरी सोडून येतो असे सांगितले आहे. आता पुढे...
सकाळी लवकर उठून उमाने स्वयंपाक पाणी आवरले. पारूबाई तिच्या लगबगीकडे पाहत होती, पण काही बोलली नाही.
"आई, मी उमाला सोडायला जातोय माहेरी." महेशरावांनी आईला सांगितले.
"तिला म्हटलं हुतं की, इथंच ऱ्हा म्हनून. सांगिटलं न्हाय का तिनं?" डोळे फिरवत पारूबाई म्हणाली.
"तिनं सांगितलं होतं, पण मीच म्हटलं, जा आपली तुझ्या माहेरी. तसं पण पहिलं बाळंतपण माहेरीच असतंय ना? मग कशाला आपण त्रास घ्यायचा? करू दे की तिच्या माहेरच्यांना." महेश रावांनी घेतलेला पवित्रा उपयोगी पडला. पारूबाईचा नकार होकारात बदलला. जाईपर्यंत सुनेला "काळजी घे. उगा पिंजऱ्यातनं सुटल्याल्या पक्ष्यावानी इकडं तिकडं उंडगत बसू नगंस" असे सल्ले पारूबाई देत होती. एकदाची सुटका झाली म्हणून उमाला आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात ती हो ला हो करत होती. एकदाची घराबाहेर पडली की उमाने सुटकेचा निःश्वास सोडला. ते पाहून महेशरावांनी विचारले,
"काय झालं? तुरूंगातून सुटका झाल्यासारखी निःश्वास सोडतेयस?"
"अहो, त्या जाऊ नकोस म्हणत होत्या ना! एकदाची परवानगी दिली म्हणून सोडला निःश्वास." महेशरावांनी यावर काही विचारले नाही.
महेशराव तिला सोडून लगेच परतले. तिला एकदम मोकळे मोकळे वाटले. सासरी नांदून आलेल्या लेकीला माहेरी आल्यावर असेच वाटते, आईने तिच्याकडे पाहत तिची अवस्था जाणली आणि तिला विचारले,
"व्हय गं, तुला खायला काय बनवू?"
"भजी बनवतेस का? मला खाऊ वाटतायत." उमा म्हणाली. आईने तत्परतेने उठून सगळी तयारी केली व भज्यांचा पहिला
घाणा तेलातून काढला की, डिश भरून उमाच्या समोर डिश ठेवली. भजीची प्लेट उचलून तिने नाकापाशी नेली. खोल श्वास घेऊन आपल्या आत तो वास तिने आधी मुरवला व नंतर भजी तोंडात टाकली. भजी खाणाऱ्या लेकीकडे समाधानाने पाहणाऱ्या आईचे डोळे उगाचच पाण्याने भरून आले.
घाणा तेलातून काढला की, डिश भरून उमाच्या समोर डिश ठेवली. भजीची प्लेट उचलून तिने नाकापाशी नेली. खोल श्वास घेऊन आपल्या आत तो वास तिने आधी मुरवला व नंतर भजी तोंडात टाकली. भजी खाणाऱ्या लेकीकडे समाधानाने पाहणाऱ्या आईचे डोळे उगाचच पाण्याने भरून आले.
सासरी सुबत्ता होती, पण ते सासर होते. सगळ्यांचे जेवण झाल्याशिवाय बायकांनी जेवायचे नाही, भले कितीही भूक लागली तरीही. इथे पहिला भज्याचा घाणा पुढ्यात आला.
उमाला वाटले, आता काही दिवस आपण मुक्तपणे वावरू शकतो. सगळं विचारून करण्याची आता आवश्यकता नाही.
हा तिचा भ्रम होता. तिकडे सासू आणि इकडे आई...दोघीही तिच्यावर करडी नजर ठेवून होत्या. ती हातीपायी नीट सुटावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. तिने हालचाल करावी यासाठी आत्तापर्यंत पारूबाई प्रयत्न करत होती, आता ते काम उमाच्या आईकडे आले आहे असे पुढच्या दोन दिवसांत उमाला वाटले.
"माहेरी आलो तरीही हा ससेमिरा आहेच..." असे वाटून उमा वैतागून गेली. इकडं जाऊ नगंस, तिकडं जायला नको मग घरात बसून करायचं तरी काय? हा प्रश्न उमाला पडला. रात्री आईशेजारी कलंडताना तिने विचारले,
"आई, आपल्या बिब्ब्याच्या झाडाला बिब्ब्या आल्या होत्या का?"
"व्हय.. आल्या हुत्या. अजुनबी असत्याल झाडावर. का?"
"काय नाही. झोप आता ."
तिच्या डोळ्यासमोर ते बिब्ब्यांनी लगडलेले मनोहारी झाड आले. त्या झाडाचे चित्र नजरेसमोर तरळत असतानाच तिची झोप लागली. झोपेतही तिच्या स्वप्नात ते पिवळ्या धमक बिब्ब्यांनी लगडलेले झाड आले होते. ती समाधानाने त्या झाडाकडे पाहत होती.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा