Login

हे बंध रेशमाचे... भाग १९

एकत्र कुटुंबाची कथा

हे बंध रेशमाचे भाग १९

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, शरयूसोबत बोलत असताना त्या बालजीवाने जो प्रश्न उपस्थित केला त्यामुळे उमाचे अंतरंग ढवळून निघाले. आता पुढे....

उमा झोपण्यासाठी आडवी झाली खरी, पण तिची झोप लागेना. तिची चाललेली चुळबुळ आईच्या लक्षात आली. आई उठून बसली.

"व्हय गं पोरी, झ्वाप लागंना व्हय? दुकतंय का? पाय दाबू का वाईच? मंजी झ्वाप लागंल."

"नाही गं. काही दुखत नाही. झोपच लागंना."

"कसली काळजी करतीयास व्हय?"

आपल्या मनातील गोंधळ ओठांवर न आणता ती म्हणाली,

"कशाची काळजी करतेय? नाही लागत एखाद्या दिवशी झोप. त्यात काय एवढं?" असे म्हणत तिने कुस बदलली. आईला काळजी वाटू नये यासाठी तिने डोळे मिटून घेतले व ती शांत पडून राहिली. ती झोपली आहे असा ग्रह झाल्याने आईने डोळे मिटले. दिवसभराच्या कामाने दमल्यामुळे आईचा चटकन डोळा लागला. आईची झोप लागली हे पाहून तिला बरे वाटले. सकाळी कोंबडा आरवला तरी तिची झोप काही लागली नाही. अंगावर वाकाळ घेऊन ती स्तब्ध पडून राहिली.


असेच चार दिवस गेले आणि तिचा उतरलेला चेहरा पाहून आईने विचारले,

"का गं? त्रास हुतुय का? जायाचं का दवाखान्यात?"

"पाय भरून आलेत गं. पोटात दुखतंय जरासं."

अनुभवी असलेल्या आईने लेकीची लक्षणे पाहून पुढची तयारी सुरू केली. धुवून ठेवलेल्या जुन्या साड्यांची बाळुती फाडली. तिला डोक्याला बांधायला एक नेटकं फडकं घेतलं. अंथरूण पांघरूणाची पिशवी तयार केली. चार दिवस दवाखान्यात राहावे लागेल, त्यासाठी लागणारे सगळे सामान भरले. तिचे कपडे घेतले.

सगळे सामान भरून होईपर्यंत तिच्या कळा वाढल्या होत्या. आईने तिच्यासाठी भरपूर तूप घालून शिरा बनवला. थोडा डब्यात भरला व थोडा तिला जबरदस्तीने खायला लावला. ती अजिबात काही खायला तयार नव्हती. येणाऱ्या कळांनी बेजार झाली होती ती. आईने तिला चुचकारून तेवढा डिशभर शिरा खायला लावला.

" ऐक पोरी. उपाशीपोटी कळा कशा देशील? जरा आदार असला पोटात तर ताकद येती. यवडं ऐक माजं. खा दोन घास." असे म्हणत लेकीला खाऊ घातले. अंगणात तिला जरा येरझारा घालायला लावल्या व तोपर्यंत सगळ्यांनी दोन दोन घास खाऊन घेतले. जेवण झाल्यावर आईने पटकन मागचे आवरले, जाऊबाईला सुचना दिल्या आणि वसंताला मित्राकडे पिटाळले.

वसंता पाच मिनिटांत मित्रासोबत गाडी घेऊन आला. गाडीत सामान ठेवून सगळे बसले व गाडी दवाखान्याकडे निघाली. गाडीत आई बाबा तिच्या शेजारी बसले होते. आईचे तिच्याकडे बारीक लक्ष होते. तिचा हात हातात घेऊन आई म्हणाली,

"बाळातपन मंजी बाईचा दुसरा जलम असतुया. समदं ठीक हुईल. काळजी करू नगंस. मी सांगिटलं हाय त्येवडं ध्येनात ठीव. सुरवातीच्या कळांना जोर दिऊ नगंस. जवा मोठ्या कळा येतीलं तवा जोर लाव. मंजी तू आदीपासनं दमायची न्हाईस अन् मोटी कळ देशील."
आई सांगत असलेले ती फक्त ऐकत होती. वेदनांनी तिचा जीव कासावीस झाला होता. नवऱ्याची आठवण येत होती. अशावेळी नवरा आपल्यासोबत हवा होता असे तिला प्रकर्षाने वाटत होते.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all