हे बंध रेशमाचे भाग २०
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
उमाला घेऊन गाडी दवाखान्याच्या दिशेने निघाली आहे. उमाला महेशरावांची खूप आठवण येत आहे. आता पुढे...
हाॅस्पिटलमध्ये गेल्यावर सिस्टरनी उमाला आत नेले. आईने तिची फाईल दिली. उमाला चेक केल्यानंतर सिस्टरनी तिला परत बाहेर पाठवले व अजून दोन तास लागतील तोपर्यंत व्हरांड्यात फिर असे सांगितले. आई पण तिच्यासोबत व्हरांड्यात फिरू लागली. तिच्यासारखीच अजून एक केस त्यावेळी आली होती. ती तरूणी पण तिथे येरझारा घालत होती. मधूनच कळ आली की कळ जाईपर्यंत भिंतीला धरुन उभी राहत होती. त्या तरूणीच्या कळांमधले अंतर कमी झाले तसे सिस्टरने तिला आत लेबर रूममध्ये घेतले.
व्हरांड्यात फिरणाऱ्या उमाला तिचा वेदनेने पिळवटलेला आवाज ऐकू येत होता. तिचे ओरडणे ऐकून उमाला भीती वाटत होती. ते लक्षात आले तशी आई म्हणाली,
"घाबरू नगंस. म्या काय सांगते त्ये ध्येनात ठीव. किती बी मोटी कळ आली तरीबी अजाबात त्वांड उगडायचं न्हाय. त्वांड उगाडलं की मंग जोर निगून जातो. समदा जोर कळा देयाला लावायचा मंजी तुला कमी तरास हुईल अन् कळा बी पटापटा येतीला. समाजलं?" आईने सांगितलेले आपल्या किती लक्षात राहील याची तिला खात्री नव्हती इतका तिचा जीव वेदनेने कासावीस झाला होता. तरीही आईच्या म्हणण्यावर तिने होकारार्थी मान हलवली.
आतून ट्यांहा ट्यांहा असा बाळाचा रडलेला आवाज आला आणि त्या तरूणीची सुटका झाली हे जाणून उमानेच निःश्वास सोडला. थोड्यावेळाने उमाची आत जाण्याची वेळ आली तशी आईने तिच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवला व ती म्हणाली,
"यवडं सोस बाय माजे." ती मान हलवत आत गेली. आत गेल्यावर पुढचा किती वेळ गेला या जाणीवेच्या पलिकडे ती पोहोचली होती, कारण वेदनांची तीव्रता काय असते हे ती क्षणोक्षणी अनुभवत होती. एकदाची जोराची कळ दिली आणि ती एकदम शांत झाली. आता कुठल्याही वेदना तिला जाणवत नव्हत्या. काही अवधीतच बाळाचा रडलेला आवाज तिच्या कानावर पडला आणि अतीव श्रमाने तिने डोळे मिटले. आत्ता याक्षणी कुठलाही, कुणाचाही विचार तिच्या मनात आला नाही.
थोड्यावेळाने सिस्टर बाळाला स्वच्छ करून घेऊन आली. आईने घरातून आणलेल्या बाळुत्यात ते बाळ गुंडाळले होते. सिस्टरने बाळ आणून तिच्या कुशीत ठेवले. बाळाकडे अतीव समाधानाने ती पाहू लागली. दिवसभरात झालेला त्रास ती पूर्ण विसरली. त्याक्षणी ते बाळ तिच्यासाठी महत्वाचे होते. तो मुलगा आहे की मुलगी याच्याशी तिला काहीही देणेघेणे नव्हते. आपल्या पोटात नऊ महिने वाढलेला आपला अंश पाहून ती हरखली.
क्रमशः ® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा