Login

हे बंध रेशमाचे... भाग २२

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग २२

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, पाचवीची पूजा करण्यासाठी उमाच्या सासरहून कुणीही आले नाही. आता महेशराव आले आहेत. तिथून पुढे...

आईने महेशरावांना चहा बनवून दिला व ती बाहेर आली.

"कसं काय पाव्हणं, बरं हाय ना समदं घराकडं?"

"हो, बरं आहे. तुम्ही कशा आहात मामी?"

"मी पन बरीच हाय. भायेरनं आल्या आल्या बाळातनीपाशी जाऊ नयी म्हनून तुमास्नी आत न्हेलं नाय. आता च्या पिऊन झाला की जावा बाळाला बगाय. मी जरा परड्यात जळान आनाय जातीया, म्होरलं दार वढून घीन." असे म्हणत त्यांनी जावयाच्या हातातील रिकामी कपबशी आत नेऊन ठेवली व जावईबापूंना आतल्या रूममध्ये जायला सांगितले. बाहेरचे दार ओढून त्या जळण आणायला निघून गेल्या.

उमा बाहेरचा कानोसा घेत पडून राहिली होती. बाळंतीण होऊन आठवडा झाला होता. फक्त बाळाला अंगावर पाजण्यासाठी आणि जेवणासाठी उठायचे, इतरवेळी खाली बाजल्यावर पडूनच रहायचे अशी आईची सक्त ताकीद होती. महेशराव आत आल्यावर ती उठून बसू लागली तसे महेशराव म्हणाले,

"नको उठूस, पडून रहा. मी इकडे बाजूला बसतो. बाळ झोपले आहे का?"

"हो, आत्ताच झोपलीय. तिची झोप चिमणीसारखी. उठेल थोड्या वेळात."
महेशराव तिच्या बाजल्याशेजारी ठेवलेल्या स्टूलवर बसले. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले,

"कशी आहेस? खूप त्रास झाला का?"

यावर तिचे डोळे भरून आले. आपल्या डोळ्यात का पाणी आले हे तिला समजेना. महेशरावांनी प्रेमाने हात फिरवला म्हणून डोळ्यात पाणी आले की, तो बाळंतपणाच्या वेळचा त्रास आठवला म्हणून पाणी आले हे तिला समजेना.

तिचे तोंड आपल्याकडे वळवत महेशरावांनी तिच्या डोळ्यातील पाणी पुसले.

"रडू नकोस गं. ओल्या बाळंतीणीने रडायचे नसते, मग डोकं आयुष्यभर दुखतं म्हणतात." तरीही तिला भावनांचा दाटून आलेला उमाळा आवरला नाही. ती स्फुंदतच होती. ते पाहून महेशराव म्हणाले,

"अशी रडायला लागलीस तर मी लगेच परत जाईन बरं का!" असे म्हणत ते स्टुलवरून खरंच उठू लागले तसे त्यांचा हात घट्ट धरत तिने दुसऱ्या हाताने आपले डोळे पुसले.

"कसे आहात?" तिने विचारले.

"तुझ्याशिवाय कसा असणार? तुझी खूप आठवण येते." हे ऐकून तिने त्यांच्या मांडीवर आपले डोके टेकवले. त्यांनी तिच्या केसांतून हात फिरवत तिला थोपटले.

"आठवण येते म्हणता, मग इकडे यायला एवढा उशीर का लावला?" तिने मनातील बोचरी सल उलगडली.

"कुठे उशीर? पाचवीला आई येईल असे मला वाटले होते. ती येऊन गेल्यावर आपण जाऊ असे म्हटले, पण ती आलीच नाही."

"आत्याबाई का आल्या नाहीत पाचवी पूजनाला? आम्ही खूप वाट पाहिली त्यांची." उमा म्हणाली.

" अगं, तिच्या अचानक पोटात दुखायला लागलं. तिनं सगळी तयारी करून ठेवली होती यायची‌."

"खरंच?"

"हो, खोटं का सांगेन मी."

"मग आज का त्यांना घेऊन आला नाही?"

"मी आज शाळेच्या कामानिमित्त तालुक्याला गेलो होतो, तिथूनच परस्पर आलोय, मग तिला कसा आणणार?" महेश रावांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसला नाही, पण तिने बोलणे पुढे वाढवले नाही.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all