Login

हे बंध रेशमाचे... भाग २३

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग २३

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, महेशराव आले आहेत. त्यांच्याशी बोलताना उमा भावनिक झाली होती. आता पुढे...

दोघे बोलत होते तेवढ्यात बाळ उठले. बाळाला अंगावर पाजण्यासाठी उमा उठली व तिने बाळाला मांडीवर घेतले. महेशरावांच्या समोर बाळाला दूध पाजताना तिला संकोच वाटला, त्यामुळे ती त्यांच्याकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून बसली. बाळाला दूध पाजून झाल्यावर तिने त्याचे तोंड पुसले व त्याला महेशरावांच्या मांडीवर दिले.

ती छोटीशी परी पाहून महेशराव हरखले. तिच्या बंद मुठीला सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते, अन् ती काही मूठ उघडत नव्हती. दोघांची चाललेली जुगलबंदी पाहून उमा हसत होती. महेशरावांनी तिच्या मुठीत अलगद आपले बोट सरकवले. तिने मूठ बंद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे बोट तिने पकडले. त्या इवल्याशा बोटांचा मुलायम स्पर्श त्यांना जाणवला आणि त्यांचे मन एकदम भावनिक झाले. त्यांनी पटकन बाळाला उचलून छातीशी धरले व ते तोंडातल्या तोंडात पुटपपुटले,

"माझी परी गं तरी. माझी शोनुली." हे ऐकून उमाचे डोळे भरून आले. ती छोटुली पण बापाच्या मांडीवर आरामात खेळत बसली होती ‌आणि उमा त्या दोघांकडे समाधानाने पाहत होती. आई त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून मुद्दामच बाहेर गेली आहे हे उमाने ओळखले. तिने महेशरावांच्या खांद्यावर डोके टेकवले व त्यांच्या हातावर हात ठेवून ती शांतपणे बसून राहिली.

याक्षणी तिच्या मनात फक्त त्या तिघांशिवाय इतर कुठला विचार नव्हता. सासू पाचवीला आली नाही याचे शल्य नव्हते. नवरा लवकर आला नाही याचे दुःख ही ती विसरली होती. आत्ताची घडी ती नजरेत साठवत होती. असा बराच वेळ गेला आणि पुढचे दार उघडल्याचा आवाज आला. तो ऐकून ती बाजूला सरकून बसली. महेशरावांनी बाळाला तिच्याकडे दिले व ते उठून बाहेर गेले.

त्यांनी आणलेल्या पिशवीतील सामान त्यांनी सासुबाईंच्या हवाली केले. त्यांनी येताना खारीक, खोबरं, डिंक, सुका मेवा आणला होता.

"मामी, याचे लाडू बनवा उमासाठी. तूप तेवढं मी आणलं नाही. इथं मिळतं का विकत तूप?"

"नगं विकतचं. हाय घरात. म्या साटीवलं हुतं पोरीसाटी."

हातातली पिशवी घेऊन ते परत आत गेले. हातातली डबी त्यांनी उमाच्या हातावर ठेवली. उमाने ती मखमली डबी उघडली. आत चेन आणि लाॅकेट होते.

"हे परीसाठी आणलंय मी. त्यामुळं मला सकाळी यायला उशीर झाला." उमाचे डोळे चमकले. त्यांनी एक छोटासा गुलाबी रंगाचा फ्रॉक ही आणला होता. अतिशय सुरेख होता.

"तुमच्याच हातानं घाला की चेन बाळाच्या गळ्यात." उमा म्हणाली.

"नको, मी आणली असली तर तो अधिकार तुझाच आहे. बाळासाठी तू खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे तूच घाल. कशी दिसते ते मला पाहायचेय." हे ऐकून तिने बाळाच्या गळ्यात चेन घातली.

"कपडे मात्र बारशानंतर घालीन. बारशाच्या आधी नवे कपडे घालत नाहीत बाळाला."

"घाल कधीही." असे महेशराव म्हणाले व बाळाकडे अनिमिष नेत्रांनी पाहू लागले. ते बाळाकडे पाहत होते आणि उमा त्यांच्याकडे पाहत त्यांची ही बापाची छबी डोळ्यात साठवून ठेवत होती. तिच्या मनावरील मळभ दूर झाले होते.

क्रमशः
©® सौ. हेमा पाटील.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all