Login

हे बंध रेशमाचे... भाग २४

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग २४

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

महेशरावांनी बाळासाठी चेन आणलीय हे पाहून उमाला खूप आनंद झाला. आता पुढे...

आईची स्वयंपाकघरात गडबड चालली होती. तेवढ्यात सुमीकाकी आली तीच बाहेरून हाका मारत.

"व्हय आक्का, आज अंगणात पाट मांडलं न्हायती, बंब पेटिवला न्हाय. आज बाळाला आंगुळ घालायची न्हाय व्हय?" समोरच बसलेल्या जावयाला पाहून तिने आपल्या डोक्यावरचा पदर सावरला व जीभ चावत ती स्वयंपाकघरात गेली. तिची आक्का जेवण बनवण्यात गढून गेली होती.

"सांगायचसा तरी पाव्हणं आलेती म्हनून. यड्यावानी रोजच्यागत बडाबडा करत आले व्हते म्या. पाव्हणं काय म्हनलं आसतील?"

"आता मला घावलंय व्हय तू येशील म्हनून! जा बंब पेटीव जा. मला सैपाक उरकायचा हाय."

"बर बर, द्या चुलीतलं इंगुळ, पेटिवती म्या बंब. " असे म्हणत ताटलीतून चुलीतील लालभडक फुललेले कोळसे घेऊन ती बाहेर गेली व तिने बंब पेटवला. पाणी तापेपर्यंत ती आत येऊन लसूण बोलत बसली. आक्कानं सांगितलं म्हणून खोबरं खवणून दिलं. मग दोघींनी मिळून बाळाला आंघोळ घातली. महेशराव कौतुकाने परीची आंघोळ पहात होते. आंघोळीनंतर बाळाला ओवा व बाळशेपवाच्या धुरीने शेकवले आणि बाळाच्या आईच्या स्वाधीन केले. आता त्या दोघींची ड्युटी संपली होती. सुमीकाकीनं बाहेरचं सगळं आवरून ठेवलं आणि ती निघून गेली‌.

उमाने बाळाला अंगावर पाजले आणि झोपवले. अंगावर उबदार शालीची घडी घालून ती पण तिच्या शेजारी कलंडली. महेशराव पाय मोकळे करायला बाहेर पडले. रात्री जेवताना विषय निघाला,

"बारसं कधी करायचं? बाराव्या दिवशी उरकून घेऊया का?" बाबांनी महेशरावांना विचारले.

"आई म्हणत होती, बाळ सव्वा महिन्याचं झाल्यावर करूया बारसं. बारसं झालं की लगेच उमाला व बाळाला घरी घेऊन जाता येईल." महेशरावांनी आईचे काय म्हणणे आहे ते सांगितले.

"यवडं लगीच तिला घिऊन जाणार हायसा व्हय? बाळातनीला चार म्हैनं तरी ऱ्हाऊंद्या की." आई म्हणाली.

"आईचं म्हणणं आहे, परत नोकरी पण करायची आहे, तर बाळाला आईची सवय होईल." महेशरावांनी तिला लवकर नेण्यामागचा उद्देश सांगितला पण आई नाराज झाली होती. ती मुर्वतीने पुढे काही बोलली नाही.

उमा आतून ऐकत होती. "मुलगा झाला असता तर एवढ्या लवकर त्यांनी आपल्याला नेले असते का?" असा विचार तिच्या मनात आला. उशिरा सुट्टी काढल्यामुळे तिची सुट्टी शिल्लक होती, पण आत्याबाईंनी निर्णय घेतला असेल तर तो मोडण्याची हिंमत तिच्यात नव्हती. तरीही ती रात्री याबाबत महेशरावांशी बोलली. त्यांनी सांगितले,

"तुला माहीत आहे ना तिचा स्वभाव? तिनं ठरवलेय तर तसेच होईल. यात बदल केलेला तिला चालणार नाही." महेशरावांनी एवढ्यावरच ही चर्चा थांबवून त्यावर शिक्कामोर्तब केले. उमा मात्र उदास झाली होती.

क्रमशः ® सौ. हेमा पाटील.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."