Login

हे बंध रेशमाचे... भाग २५

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग २५

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

महेशरावांनी त्यांच्या आईचा निरोप उमाच्या आईबाबांना सांगितला आहे. आता पुढे...

सकाळी उठल्यावर महेशरावांची परतीची गडबड सुरू झाली. खरंतर बाळापासून आणि उमापासून त्यांचा पाय निघत नव्हता. उमा म्हणाली,

"आजचा दिवस थांबा की. आला अन् लगेच निघालात."

"काल थांबलो ना? सांगून आलो नाही शाळेत, त्यामुळे गेले पाहिजे." महेशराव म्हणाले.

"परत कधी येणार?" उमाने विचारले.

"बघू, जमले की येईन. वाट बघत बसू नकोस." हे शब्द ऐकून उमाला समजले की महेशराव आता परत येणार नाहीत.
ती पुढे काहीच बोलली नाही.

"बाळाकडे लक्ष दे. स्वतःची ही काळजी घे." असे तिला सांगून महेशराव बाहेर पडले.

महेशरावांनी बाळाचे टोपणनाव परी ठेवले होते, त्यामुळे आता ती बाळाला परी म्हणू लागली. परीसोबत खेळत आणि विश्रांती घेत घेत महिना कसा गेला हे तिला समजले देखील नाही. आता घरात बारशाचे बेत सुरू झाले. भटजींकडे जाऊन बाळाचे नावरस नाव व बारशाचा मुहूर्त काढून आणला. तिच्या सासरी बारशाबाबत कळवण्यासाठी व आमंत्रण देण्यासाठी बाबा स्वतः गेले.

आठ तारीख निश्चित करण्यात आली. दाद्याच्या जन्मानंतर घरात पाळणा हलला नव्हता, त्यामुळे बारसे जोरदार करायचे बाबांनी ठरवले होते. आदल्या दिवशी आचाऱ्याला बोलावून बुंदी पाडली होती. घरात सर्वांची लगबग सुरू होती.

उमा या सगळ्या लगबगीकडे पाहत होती. आपल्या बाळाच्या बारशाची चाललेली तयारी पाहून तिला आनंद होत होता तसेच बारसे झाले की लगेचच आपल्याला सासरी जायचे आहे या विचाराने डोळ्यात पाणीही दाटत होते.

लग्नानंतर सासर हेच स्त्रीचे घर असते, पण माहेराशी असलेली तिची नाळ कधीच तुटत नाही. जन्मानंतर नाळ कापून बाळ आईपासून वेगळे केले जाते, पण तरीही ते भावनिकदृष्ट्या आईशी अखंडपणे जोडलेले राहते. तशीच स्त्री जरी नाव आडनाव बदलून नवऱ्याशी आयुष्यभराचं नातं जोडून सासरी नांदत असली तरी तिच्या हृदयात तिने माहेरचे आपलेपण जपलेलं असतं. त्यामुळे अगदी काठी टेकणारी म्हातारी असली तरी माहेरचा विषय निघाला की भरभरून बोलायला लागते. मग उमा तर...

बघताबघता बारशाचा दिवस उजाडला व घरात एकच गडबड सुरू झाली. हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली. मामी सकाळी लवकरच आली होती. घरात कामाची धावपळ बघत बघत आई अधूनमधून तिच्याकडे येऊन तिला सूचना देऊन जात होती. मामींनी ही दोन मिनिटं जवळ बसून सासरी गेल्यावर स्वतःची व बाळाची काळजी घे असे सांगितले.

उमा तिच्या रूममधला पसारा आवरत होती. तिला उद्या सासरी जाताना जे सामान न्यायचे आहे त्याची बांधाबांध करत होती. यासोबतच आता तिला महेशरावांना भेटायची ओढ लागली होती. एकीकडे माहेरी लवकर येता येणार नाही ही मनात बोच होती, तर दुसरीकडे संसारवेलीवर फुललेल्या फुलाचे नवऱ्याच्या सोबतीने संगोपन करण्यासाठी ती उत्सुक होती.

तिच्या सासरची गाडी आली. गाडीतून आत्याबाईंना उतरताना पाहून तिला हायसे वाटले. आत्याबाई बारशाला येतात की नाही अशी धाकधूक तिला वाटत होती. गाडीतून कोण कोण उतरतेय हे ती पाहू लागली. तिच्या तिन्ही नणंदा, त्यांची मुले आणि तिच्या दोन चुलत सासवा एवढीच माणसं गाडीतून उतरली. महेशराव बारशाला आले नाहीत हे तिला कळून चुकले.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."