हे बंध रेशमाचे भाग २७
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील
बारशाचा कार्यक्रम सुरू आहे. उमा समाधानाने बाळाकडे पाहत आहे. तिथून पुढे...
बाळाला पाळण्यात घातल्यावर पाळणागीताच्या आवाजाने की इतर कशाने माहीत नाही मृणालने जोरजोराने रडायला सुरवात केली. बायका गात होत्या, त्यात बाळाच्या रडण्याचा आवाज प्रकर्षाने जाणवत होता. ते पाहून तिचा जीव कासावीस झाला. कधी एकदा पाळणा गीत संपतेय अन् मी बाळाला जवळ घेतेय असे तिला झाले. बाळाच्या काळजीने तिच्या हृदयात कालवाकालव झाली आणि तिला पान्हा फुटला. गळणाऱ्या दुधामुळे ब्लाऊज चिंब भिजला. काय करावे तिला सुचेना. ती आतल्या रूममध्ये गेली.
बाहेरून गीताचा आवाज येत होता, ती आत वेगळ्याच कामात गुंतली होती. थोड्यावेळाने तिच्या नावाचा गजर सुरू झाला. मामी तिला बोलवायला आत आली. ती बाहेर आली तोवर पाळणा म्हणून झाला होता. ती पटकन पाळण्यावर वाकून बाळाला उचलू लागली तशा पारूबाई म्हणाल्या,
"बाळाला उचलू नगंस. आदी नाव घी की."
रडणाऱ्या बाळाकडे पाहून तिचा जीव कासावीस झाला, तिने आत्याबाईंचे न ऐकता बाळाला पाळण्यातून उचलले आणि ती बाळाला शांत करण्यासाठी आत निघून गेली. सगळ्या बायका पारूबाईकडे पाहू लागल्या. चार बायकांत तेही सुनेच्या माहेरात सुनेने सर्वांसमोर आपला शब्द डावलला याचा पारूबाईला राग आला. जे काही घडले ते निमिषार्धात, त्यामुळे पाळण्यापासून दूर असलेल्या बायकांना तिथे काय घडले ते समजले नव्हते.
वास्तविक पाहता रडणाऱ्या बाळाला उमाचे उचलून घेणे स्वाभाविक होते. एक आई म्हणून तिचे कृत्य इतर कुणाला खटकले नाही. पारूबाईला मात्र तो आपला अपमान वाटला. आजपर्यंत आपल्या शब्दांच्या बाहेर नसलेली सून बाळामुळे बदलली असा तिचा ग्रह झाला. ती पाळण्यापासून दूर झाली व एका कोपऱ्यात जाऊन बसली.
उमाने आत नेऊन बाळाला अंगावर पाजले आणि मग ती बाळाला घेऊन बाहेर आली. पुढचा आईने बाळाचे मुख पाहण्याचा विधी त्यानंतर झाला. पारूबाई काही तिथून उठली नाही. जेवणाच्या पंगती अंगणात बसल्या तशी सारजा आईजवळ आली.
"आई, चल की जेवायला. भूक लागलीया. दुपारी इकडं यायचं म्हणून गडबडीत जेवलो होतो." सारजाच्या या वक्तव्यावर पारूबाई म्हणाली,
"कदी आन् न मिळाल्यासारखे जा जाऊन बस जा पंगतीत. आपुन पावन्याच्या दारात आलुया, लेकाच्या सासुरवाडीत. उगं आपलं आसंच जाऊन बसायचं का जेवाय. त्यापरास म्या बिन जेवता जाईन परत." आईचे काहीतरी बिनसलेय हे सारजाच्या लक्षात आले म्हणून तीही आईशेजारी बसून राहिली. त्यांना तिथे बसलेल्या बघून तिकडून आलेल्या इतर बायका पण त्यांच्याजवळ येऊन बसल्या.
लेकीच्या सासरच्या त्या सगळ्याजणी तिथे बसलेल्या पाहून उमाची आई जवळ आली व म्हणाली,
"आता फुडच्या पंगतीला तुमी बसा जेवाय. उरकत आली या पयली पंगत." यावर पारूबाईंनी मान हलवली. बाहेरची पंगत उठली पण पारूबाई काही जागची हलली नाही. हे पाहून उमाची आई पुन्हा त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली,
"चला की इनीबाई जेवाय. परत गावातल्या बायका बसल्या मंजी कसं उटवायचं?" यावर पारूबाई म्हणाली,
"आमी समद्या इतंच बसतो जेवाय. आमास्नी आत वाडाय सांगा." जेवण वाढणाराला आतबाहेर करणे अवघड होते, पण अधिक काही न बोलता उमाच्या आईने त्यांना बसायला बसकरं टाकली व ती बाहेर गेली. आत येताना ती पत्रावळी व द्रोण घेऊन आली. तिनं सगळ्यांच्या पुढ्यात पत्रावळी टाकल्या.
अजून बाहेरून कुणी वाढायला आले नव्हते. पुन्हा एकदा बाहेर जाऊन ती भात वाढणाराला आपल्यासोबत घेऊन आली. त्याने भात वाढला. मागोमाग मग भाजी, आमटी, बुंदी घेऊन सगळे आले. त्यांनी जेवायला सुरुवात केली तेव्हा उमाची आई समोर उभी राहून त्यांना काय हवं नको जातीने पाहत होती.
तेवढ्यात उमाचे वडील आत आले व त्यांनी खुणावले म्हणून उमाची आई आत गेली. आत जाताना तिने सूचना केली होती की, या बायकांच्या ताटाकडं लक्ष ठीवा. पाव्हण्या बायकांसाठी आणलेल्या साड्या पुरेशा आहेत की कमी पडतील याची विचारपूस ते करत होते. उमा जाताना द्यायची दुरडी भरली आहे का हे त्यांनी विचारले.
शंका आली म्हणून उमाच्या आईने आत जाऊन साड्या मोजल्या. साड्या पुरतील एवढ्या होत्या, पण चुकून जावयासोबत सासऱ्यांना पोशाख आणायचा विसरला होता. तशी सूचना आपल्या नवऱ्याला देऊन ती पाव्हण्यांच्या पंगतीकडं आली तर बायका हात आखडून बसल्या होत्या. त्यांच्या पुढ्यात काहीच नव्हते. ते पाहून तिने स्वतः लगबगीने बाहेर जाऊन भाताचं घमेलं उचललं व ती आत आली. सगळ्यांच्या पुढ्यात वाढू लागली. पारूबाई उसाणली,
"पावन्यांकडं लक्ष देता येत न्हाई तर बोलवू नई. उगा अपमान कराय बोलिवलंय व्हय आमास्नी. लेकीच्या सासरची मानसं हायेत याचं तरी ध्यान ठिवावं माणसानं." हे ऐकून उमाच्या आईचा चेहरा पडला.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
