हे बंध रेशमाचे भाग २८
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील
पारूबाई जेवताना मनाला लागेल असे बोलल्याने उमाच्या आईचा चेहरा पडला. आता पुढे...
"ईनीबाय, पोटभर जेवा. मी जावंला सांगून ग्येले हुते, ती कुटं खपली कुनास ठावं? राग मानू नकासा. यास्नी बी किती दिस झालं सांगिटल्यालं, पर ऐन वक्तालाच जाग येती." इतक्या अजीजीने बोलून सुध्दा पारूबाईच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. मान खाली घालून पुन्हा पुन्हा विनवण्या केल्या तरी त्यांनी अजिबात काहीच ताटात घेतले नाही. त्या घेत नाहीत मग आपण कसे घ्यायचे म्हणून बाकीच्या बायकांनी ही हात आखडता घेत काहीच जेवण ताटात घेतले नाही.
सगळ्याजणी अर्ध्या जेवणावरून उठल्या. उमाच्या आईला काय करावे तेच समजेना. मामीने उमाला जाऊन सांगितले म्हणून ती बाहेर आली. पारूबाईजवळ जाऊन ती म्हणाली,
"आत्याबाई, काय झालं? चला जेवायला. असं उपाशीपोटी उठू नका."
"न्हाय, झालं आमचं जेवान. तू येनार हायस ना? आवर तुझं, तोवर आमी येसुच्या भनीकडं जाऊन येतो वरच्या आळीला." असे म्हणत पारूबाईने येसुबाईला हाक मारली. आत्याबाई काय ऐकणार नाहीत हे उमाला समजले. तिने आत आल्यावर आईला काय झाले ते विचारले.
"जाऊदे आई, तू त्रास करून घेऊ नकोस. कार्यक्रमात होतं थोडं इकडं तिकडं. समजून घेतलं पाहिजे. घालेन मी आत्याबाईंची समजूत." आईच्या चेहऱ्याकडे पाहून उमाला फार वाईट वाटले. आत्याबाईंनी थोडं समजूतीने घ्यायला हवे होते असे तिला वाटले.
आईने तिला जेवायला वाढले. आता सासरी गेली की पोरगी लवकर माघारी येणार नाही म्हणून आईचा जीव तुटत होता, त्यात हा प्रकार घडला होता. पोरीला सासरी गेल्यावर याबद्दल ऐकून घ्यावे लागणार या काळजीने त्या माऊलीच्या जीव थाऱ्यावर नव्हता.
आपण आता सासरी जाणार आहोत. माहेरी मुक्त फुलपाखरासारखे बागडणाऱ्या जीवाला आता रोजच्या संसाराच्या चक्रात अडकावे लागणार आहे याची तिला जाणीव झाली आणि जेवणावरची वासना उडाली. आई, मामी खूप आग्रह करत होत्या पण कसेतरी चार घास खाऊन ती ताटावरून उठली. आतल्या रूममध्ये जाऊन काही सामान राहिले आहे का तिने पुन्हा एकदा पाहिले.
सासरचा लवाजमा वरच्या आळीने परत आला आणि परतीची धांदल सुरू झाली. तिकडच्या सगळ्या बायकांना साड्या नेसवणे सुरू झाले. सासुबाईंनी साडी फक्त हातात घेतली.
"नेसा की ईनीबाय आमची पांडरी दशी," चहाची आई म्हणाली.
"नगं, नव्या साडीनं गरम हुईल लय. म्या परत नेशीन." बाकीच्या बायकांनी मात्र नेसल्या साड्या. उमा आपले आवरून बाहेर आली. तोपर्यंत दाद्याने पाळणा सोडून बाहेर नेऊन ठेवला. तिची बॅग, दुरड्या त्याने गाडीत टाकल्या. गाडीच्या ड्रायव्हरने आणि त्याने मिळून पाळणा गाडीच्या टपावर बांधला. पाव्हण्या बायका निरोप घेऊन गाडीत बसल्या.
उमाचा माहेराहून पाय निघत नव्हता. पायात मणामणाच्या बेड्या पडल्यासारखी ती सावकाश एक एक पाय उचलून चालत होती. गाडीजवळ आल्यावर तिने आईला मिठी मारली व ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली.
आईचे ही डोळे भरून आले, पण तिला समजावत आईने तिचे डोळे पुसले. ती गाडीत बसली तसे मामीने मृणालला तिच्याकडे दिले. मांडीवर असलेल्या जबाबदारीची जाणीव झाल्यावर उमाने आपले रडणे आवरले. बाळाला आपल्या हातांच्या मिठीत घट्ट धरत ती गाडीत बसून राहीली.
बाबा, दाद्या, चुलता, चुलती सगळेच गाडीपाशी जमा झाले होते. गाडी सुरू झाली तसे सगळ्यांकडे पाहून निरोपाचा हात हलवत ती डोळ्यातून येणारे पाणी अडवण्याचा प्रयत्न करू लागली.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा