Login

हे बंध रेशमाचे... भाग २९

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग २९

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले उमा बारसे झाले की लगेच सासरी निघाली आहे. तिच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर आला आहे. आता पुढे...

गाडी जसजशी पुढे पुढे निघाली तसतशी उमा थोडी शांत झाली. शांत न होऊन कुणाला सांगणार? मांडीवरची तान्हुली जबाबदारीची जाणीव करून देत होती. तिला हातांची घट्ट मिठी घालून उमा शांत बसली होती. बाकीच्या बायकांची बडबड सुरू होती. पारूबाई पण गप्प बसली होती. बायका पारूबाईला संभाषणात ओढण्याचा प्रयत्न करत होत्या पण तिच्या तोंडातून चकार शब्द ही निघत नव्हता.

आत्याबाई चांगल्याच रागावलेल्या आहेत हे उमाच्या लक्षात आले. आता हा रूसवा किती दिवस राहील कुणास ठाऊक? असा विचार उमाच्या मनात आला. घरी गेल्यावर आपल्याला माहेरचा उध्दार ऐकून घ्यावा लागणार आहे.याची तिने मनाशी खूणगाठ बांधली.

अशा विचारात असतानाच गाडी गावात पोहोचली. सगळ्याजणी पटापटा उतरल्या. सारजेनं बाळाला घेतलं व उमा खाली उतरली.
घरात जाण्यासाठी तिने सामानाची एक पिशवी उचलली आणि ती घराकडे चालू लागली. ती आत पाऊल ठेवणार तोच मागून पारूबाई कडाडली,

"नव्हं बाळातीन हायस का भिताड? बाळाला घिऊनशान हुभी ऱ्हा मुकाट्यानं. निगाली तरातरा आत." हे ऐकून उमा जागीच थबकली. पारूबाई घरात गेली. तिच्या पाठोपाठ इतर बायका आत गेल्या. सारजेनं आत जाता जाता बाळाला उमाच्या सुपूर्द केले.

आतून पारूबाई भाकरी आणि पाण्याचा तांब्या भरून घेऊन आली. बाळावरून व तिच्यावरून तिने भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला आणि मग तिला आत घेतले. आत आल्यावर उमा परक्यासारखी एका कोपऱ्यात बाळाला मांडीवर घेऊन बसली. पूर्ण प्रवासात आत्याबाई तिच्याशी एका शब्दानेही बोलल्या नव्हत्या. त्यामुळे ती बावरून गेली होती.

"आत बाजल्यावं टाक जा बाळाला जा. तु बी पड जा जरा तितं."
पडत्या फळाची आज्ञा मानून उमा बाळाला घेऊन आत गेली व बाजल्यावर आडवी झाली. बाकीच्या बायका घरी गेल्या. मायालेकींचे बोलणे सुरू होते. ते कानावर पडत होते, ते ऐकत ऐकत कधीतरी उमाची झोप लागली.

रात्री बाळ कुरकुर करू लागल्यामुळे उमाला जाग आली तेव्हा तिने पाहिले, सासुबाई तिच्या खोलीत येऊन झोपल्या होत्या. तिच्या ओठांवर हलकेच स्मितरेषा उमटली. आता त्यांनी कितीही बडबड केली तरी त्याची पर्वा करायची नाही. माहेरचे उणेदुणे त्यांनी काढले तरी आपण शांतच रहायचे. आपण जर तोंडाला लागलो नाही तर बडबड करून त्या शांत बसतील. किती दिवस बडबड करतील? ऐकून घ्यायचे मुकाटपणे, असे तिने मनाशी ठरवले. त्यानंतर तिला गाढ झोप लागली.

सकाळी तिला आत्याबाईंच्या हाका मारण्याने जाग आली. तिला माहेरी उशिरापर्यंत झोपायची सवय लागली होती, त्यामुळे जाग आली नव्हती. महेशरावांचा डबा करायचाय म्हणून त्या तिला उठवत होत्या. तीही पटकन उठली. सरावाने तिने कणीक भिजवून भाजीची तयारी करायला घेतली.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."