Login

हे बंध रेशमाचे... भाग ३०

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग 30

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

उमा सासरी आली, आणि पहिल्याच दिवशी तिला सासुबाईंनी डबा करण्यासाठी सकाळी लवकर उठवले. आता पुढे...

उमाने भाजी पोळी बनवली. महेशराव डबा घेऊन शाळेला निघून गेले. जाताना बहिणींची विचारपूस करायला विसरले नाहीत. डबा बनवून झाल्यावर उमा आतल्या खोलीत डोकावली. मृणाल नुकतीच जागी झाली होती. तिचे ते हातपाय हलवणे बघून उमा तिच्यापाशी आली. सासुबाई म्हणाल्या,

"खेळू दी की बाळाल वाईच. लगीच पाजायला घिऊ नगंस. बाळाला जरा रडू देकी. अजाबात रडू देत न्हाईस. आजून ल्हान हाय, रडलं तर जरा भूक लागंल त्येला." आत्याबाईंचे हे सांगणे ऐकून तिला नवल वाटले. बाळ रडण्याने त्याला कसला व्यायाम होणार? असे तिला वाटले. यामुळेच काल बारशाच्या वेळी आत्याबाई बाळाला लगेच घेऊ नको म्हणाल्या असाव्यात आणि आपण ऐकले नाही याचा त्यांना इतका राग आला असावा.

खरं तर गोष्टी किती सोप्या होऊन जातात नाही? दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे जर जाणून घेता आले तर एकमेकांविषयी होणारे गैरसमज टळतात. हेच तर इंगित आहे नाती जपण्याचे! हे कौशल्य साधले तर सगळेच सोपे होऊन जाते.

उमाच्या लक्षात आत्याबाईंची दुखरी नस आली. त्यामुळे तिने
त्यांची नाराजी ओळखली. आता ही नाराजी दूर करणे उमाच्या हातात होते. तिने त्यांच्या आज्ञेचे पालन केले. बाळाला जरा रडू दिले. त्यांनी स्वतःहून जोपर्यंत सांगितले नाही की बाळाला घे तोपर्यंत तिने बाळाला उचलले नाही. तिला खूप वाईट वाटत होते. बाळाचे रडणे पाहून डोळ्यांत पाणी आले होते तरीही ती स्तब्ध राहिली. मग त्याच कडाडल्या,

"आगं आई हायस का हैवान? उचल की पोरीला. किस्तं रडतीया ती. टाळू पडंल की अशानं." हे शब्द ऐकले की उमाने ताबडतोब मृणालला उचलले व छातीशी लावले. बाळ चुटूचुटू दूध पिऊ लागले तसे तिच्या डोळ्यांना धारा लागल्या.

नणंदा जेऊन खाऊन आपापल्या मार्गाला लागल्या. घरात ती आणी पारूबाई दोघीच उरल्या.

"व्हय गं तुजी रजा अजून कितींदी हाय?"

"अजून दीड महिना आहे."

"तोपतुर तुला बी बाळाला घिऊन घरातली कामं करायंची सवं लागंल. बाळाला बी सवं लागंल आमची. तू साळंला ग्येली तर माज्यापाशी ऱ्हाईल पोरगी." सासुने नोकरी सोड असे सांगितले नाही हे पाहून उमाला हायसे वाटले. नाही तर मी बाळाकडे बघणार नाही, तुझे तू बघ असे आत्याबाई म्हणाल्या असत्या तर तिच्यासाठी यक्षप्रश्न उभा राहिला असता. त्याकाळी खेडेगावात बाळाला सांभाळायला बाई मिळणे दुरापास्त होते. पाळणाघर तर दूरचीच गोष्ट!


क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all