Login

हे बंध रेशमाचे... भाग ३२

एकत्र कुटुंबाची कथा

हे बंध रेशमाचे भाग ३२

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

उमाचा शाळेचा पहिलाच दिवस आहे. ती बाळाच्या आठवणीने अस्वस्थ असतानाच तिला हेडमास्तरांनी बोलावणे पाठवले आहे. आता पुढे...

"काय बाई, बाळ काय म्हणतंय? बर्फी दिली नाही आम्हाला." हसत हसत हेडमास्तर म्हणाले. ते ऐकून उमा म्हणाली,

"हो आणते उद्या."

"बाळ लहान आहे, तुमचे घरही फार लांब नाही. त्यामुळे तुम्ही बाळाला पाजण्यासाठी दर दोन तासांनी घरी गेलात तरी चालेल. तेवढी पंधरा मिनिटे मी तुमच्या वर्गावर लक्ष ठेवत जाईन. ज्यादिवशी मी नसेन त्यादिवशी शिपायाला लक्ष ठेव असे सांगतो. बाळाची हेळसांड होऊ नये म्हणून." हेडमास्तरांचे हे बोलणे ऐकून उमाला आनंद झाला. एक पुरूष एवढे समजून घेतोय हे पाहून तिला समाधान वाटले.

"खूप खूप धन्यवाद मास्तर! आपले खूप उपकार होतील. मी आत्ता जाऊ का घरी? खूपच अस्वस्थ झाले आहे. पहिलीच वेळ आहे बाळापासून इतका वेळ दूर राहण्याची." हेडमास्तरांनी मान डोलावली व ते खुर्चीतून उठून उमाच्या वर्गाकडे चालू लागले.

उमा धावतपळत घरी आली तर बाळ नुकतेच जागे झाले होते व मुठी चोखत होते. तिने लगेच बाळाला दूध पाजायला जवळ घेतले. आत्याबाई डोकावल्या पण काहीच बोलल्या नाहीत. तिने दूध पाजून झाले की बाळाला खाली ठेवले आणि आत्याबाईंना सांगून ती शाळेकडे तरातरा निघाली.

हेडमास्तरांनी यंदा तिच्याकडे स्काॅलरशिपचे काम सोपवले नव्हते, त्यामुळे ती निवांत होती. तिचा आता व्यवस्थितपणे दिवसाचा दिनक्रम सुरू झाला होता. सकाळी लवकर उठून घरातील सगळी कामे आवरायची आणि शाळा गाठायची. मधून मधून धावतपळत बाळासाठी घर गाठायचे आणि परत शाळा. घोडं मेलं वझ्यानं आन् शिंगरू मेलं येरझाऱ्यानं अशी तिची गत झाली होती, पण त्यातही वेगळाच आनंद होता.

आत्याबाई मृणालकडे लक्ष द्यायच्या, पण ती रडायला लागली तरच उचलून घ्यायच्या. अंगाची ऊब लागली की पोरगी सारखी घेऊन बसा म्हणंल असे त्यांचे म्हणणे होते. त्या मृणालकडे लक्ष देतात एवढेच उमासाठी महत्वाचे होते. त्यामुळे त्यांना घरातील इतर काही कामे करावी लागू नयेत यासाठी उमा दक्ष असे.

संध्याकाळी आणि सकाळी घरात असेतोवर महेशराव मृणालजवळ बसत. तिची जबाबदारी घेत. मृणालने शी सू केली तर बाळुती बदलत. तिला खेळवत. त्यामुळे आत्याबाईंवर जास्त ताण येत नसे. अशा पध्दतीने मृणाल एक वर्षाची झाली आणि उमाला हायसे वाटले.

मृणाल दीड वर्षाची झाली की उमा तिला आपल्या सोबत शाळेत घेऊन जाऊ लागली. छोट्या शिशुत ती तिला बसवत असे. अर्थातच आईवडील दोघेही तिथेच असल्याने तिच्याकडे आपसूकच लक्ष राहत होते. त्यात बाईंची मुलगी म्हणून मुले कौतुकाने तिच्यावर लक्ष ठेवत.

मृणाल दीड वर्षाची झाली आणि आत्याबाईंनी दुसऱ्या मुलासाठी आडून आडून बोलायला सुरुवात केली.

"ही काय पोरीची जात. एक दिस जाईल उडून सोत्ताच्या घरट्यात. पोरगा पायजेल.त्योच वंश चालवंल." अशी सूचक बडबड सुरू केली. अजून एक वर्ष तरी दुसऱ्या बाळाचा विचार करायचा नाही असे उमा व महेशरावांनी ठरवले होते. त्यामुळे सासुबाईंचे बोलणे ऐकून ती कानाडोळा करत असे.

मृणाल तीन वर्षांची झाली आणि उमाला पुन्हा दिवस गेले.


क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all