हे बंध रेशमाचे भाग ३४
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले उमा साशंक आहे, वंदूसारखी आपल्याला पण दुसरी मुलगी झाली तर.... यामुळे. बघूया आता पुढे...
मागच्या वेळी ती जेव्हा वंदूला भेटायला गेली होती तेव्हा तिला समजले होते की, वंदूच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले आहे. उमा खूप चिडली होती. ती वंदूच्या मागे लागली होती,
"चल, मी तुझ्याबरोबर येते. माझ्या ओळखीच्या एक वकील मॅडम आहेत. त्यांच्याकडे जाऊया. पहिली पत्नी हयात असताना, घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. तुझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करूया. त्याने तुला इतका त्रास दिलाय, त्याला असेच सोडायला नको." वंदू या गोष्टीला तयार झाली नाही. ती फक्त एवढेच म्हणाली,
"तसे करून काय होणार? थोडेच मला परत नांदायला नेणार आहेत? माझ्या दोन मुलींचा बाप आहे तो. जाऊदेत. मी आणि माझे नशीब." हे वंदूचे बोलणे ऐकून उमाला खूप राग आला, पण वंदूचीच तयारी नसल्याने तिला शांत बसावे लागले.
नववा महिना लागला आणि पहिल्या आठवड्यातच उमाच्या पोटात दुखायला लागले. पूर्ण दिवस जातील असे तिला वाटत होते, पण अचानक दुखायला लागल्यावर ती सरकारी दवाखान्यात तपासण्यासाठी आली. कळा सुरू झाल्या आहेत असे सिस्टरने सांगितले. मग ती दवाखान्यातच थांबली. महेशराव तिच्या सोबतीला थांबले. पारूबाई घरात मृणालसोबत थांबल्या.
यावेळी तिने भरपूर हालचाल केली होती, तसेच दुसरी वेळ होती. यावेळी तिला पहिल्यांदा झाला तितका त्रास जाणवला नाही. अगदी मोठ्या कळा यायला लागल्या तेव्हा ती लेबररूममध्ये गेली. त्यानंतर अर्ध्या तासातच बाळाचा जन्म झाला. मुलगा झाला असे बाळ जन्मल्या जन्मल्या सिस्टरने सांगितले. ते ऐकून तिने सुस्कारा सोडला व डोळे मिटले.
महेशराव बाहेर उभे होते. सिस्टरने बाहेर येऊन सांगितले. त्यांनी घरी सांगावा धाडला. घरचे सगळे दवाखान्यात आले. तोपर्यंत सिस्टरने बाळाला आंघोळ घालून कपड्यात गुंडाळून आणले होते. आत्याबाई सुहास्य मुद्रेने तिच्याजवळ आल्या. पुढे होऊन त्यांनी तो मांसाचा गोळा आपल्या हातात घेतला व त्याच्याकडे निरखून पाहू लागल्या. त्याच्याकडे पाहत असताना त्यांचा ऊर भरून आला व त्यांनी त्या बाळाला छातीशी कवटाळले.
खाटेवर पडून उमा हे उघड्या डोळ्यांनी पाहत होती. तिच्यासाठी तो मांसाचा गोळा फक्त तिचा अंश होता, ना मुलगी ना मुलगा!
मुलगा झाला त्यामुळे पुढे भविष्यात घडणाऱ्या घटनांना आपोआपच चाप बसला असे तिला वाटले. मुलगा आणि मुलगी या भेदभावातून आपला समाज कधी पुढे सरकणार असे तिला वाटले.
मुलगा झाला त्यामुळे पुढे भविष्यात घडणाऱ्या घटनांना आपोआपच चाप बसला असे तिला वाटले. मुलगा आणि मुलगी या भेदभावातून आपला समाज कधी पुढे सरकणार असे तिला वाटले.
महेशराव मृणालच्या हाताला धरून दूर उभे राहून उमाकडे पाहत होते. त्यांना तिच्याजवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवावासा वाटतोय हे तिने नजरेनेच जाणले. सगळ्यांसमोर असे कृत्य ते करू शकणार नाहीत हे उमाला ही समजत होते. तिने नजरेनेच मृणालला जवळ घेऊन या असे सांगितले. मृणाल जवळ येताच आईच्या गालावरून हात फिरवत म्हणाली,
"आई, तू माझ्याशी खेळायला दवाखान्यातून भाऊ आणलास? आजी म्हणत होती."
"हो बाळा. तू एकटीच खेळताना कंटाळत होतीस ना!" असे म्हणत तिने लेकीला जवळ घेतले.
बाळाला न्याहाळून मन भरल्यावर पारूबाई बाळाला तिच्याकडे घेऊन आली. तिच्या शेजारी बाळाला ठेवून म्हणाली,
"आक्षी महेशवर गेलायां." उमा काहीच न बोलता बाळाकडे पाहू लागली. तिचा एक हात मृणालच्या हातात होता व दुसरा हात ती बाळावरून फिरवत होती.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा