हे बंध रेशमाचे भाग ३५
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, उमा बाळंत झाली आहे. तिला मुलगा झाला त्यामुळे पारूबाई खुश झाली आहे. आता पुढे...
उमाच्या माहेरी सांगावा धाडण्यात आला. तिचे आई वडील आणि दाद्या सगळेच हातातील कामे सोडून धावत पळत तिला भेटायला आले. येताना पेढ्याचा पुडा आणायला विसरले नाहीत.
पारू बाईने उमाच्या आईला आग्रह करून ठेवून घेतले. दवाखान्यात रात्री उमाच्या आई थांबत.
पारू बाईने उमाच्या आईला आग्रह करून ठेवून घेतले. दवाखान्यात रात्री उमाच्या आई थांबत.
पारूबाई खुश होती, सकाळी लवकरच ती दवाखान्यात येत असे. येताना हळीवाची खीर, बदाम, काजू, भरपूर साजुक तूप घालून केलेला शिरा ती घेऊन येत असे. आल्या आल्या बाळाचा ताबा घेत असे. त्याला पाणी पाजणे, दूध पाजणे सगळे करत असे.
पाचव्या दिवशी त्या बाळ बाळंतीणीला घरी घेऊन आल्या. उमाच्या आईला त्यांनी आज पाचवी पुजून मग उद्या जा असे सांगितले होते.विहिणबाईंचे बोलणे कसे डावलायचे म्हणून उसाची आई कामांची तारांबळ असूनही राहीली होती. पाचवीसाठी पारूबाईंनी लगबगीने जाऊन बाळासाठी दोन तोळ्याचे सोन्याचे कडे बनवून आणले. ते पाहून उमाच्या आईला समाधान वाटले. विहिणबाई आनंदी आहेत हे पाहून तिलाही आनंद झाला.
राहून राहून उमाला मृणालच्या जन्माच्या वेळचे त्यांचे वागणे आठवत असे. तिच्या पाचवीला न फिरकलेल्या त्यांनी नातवाची पाचवी मात्र अगदी जोरदारपणे पुजली. घराण्याचा कुलदीपक होता ना तो! पूजन करताना पारूबाईने अभ्यासाची पुस्तके, वही पेन तर ठेवलेच पण शेतीची औजारे ही ठेवली. उमाने विचारले,
"हे कशाला आत्याबाई?"
"आगं, माझा नातू हाय. घराण्याची परंपरा त्योच फुडं न्हेनार हाय. मंग शेतीत त्येनं ध्यान ठिवाय नगं?" यावर उमा काहीच बोलली नाही.
अजून नीटसे डोळे ही न उघडणारा बालजीव, त्याच्याबाबत काय काय मनोरथ रचले जात होते! खरंच वंशाचा दिवा इतका महत्वाचा असतो? उमाचे लक्ष आपल्या चुणचुणीत असलेल्या लेकीकडे जात होते. काय कमी आहे तिच्यात? ती मुलगी आहे हाच तिचा दोष.
खरं तर पारूबाई पण स्त्रीच होत्या. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ...आपणच स्त्री असून जर स्त्रीच्या जन्माबाबत उदासीन असू तर आपल्याला मातृत्वाचा अभिमान बाळगण्याचा काय अधिकार? मुलगा असो की मुलगी दोघांनाही पोटात नऊ महिने वागवलेले असते. मग जन्माला आल्यावर दोघांमध्ये असा भेदभाव का? असे विचार तिच्या मनात येत होते.
खरं तर लहान होती तोपर्यंत हा भेदभाव उमाला कधी जाणवला नव्हता. पदर आला आणि आईचे तिच्याबाबतीतील वागणे बदलले. आता तिच्यावर बाहेर जाण्याबाबत बंधने आली. त्यावेळी तिला खूप राग यायचा. दाद्या कधीही मनात येईल तेव्हा बाहेर उंडगत असतो, अन् मलाच बंधने घातली जातात म्हणून तिला आईचा राग यायचा.
आई आपल्यात आणि दाद्यात भेदभाव करते म्हणून ती दाद्यावर चिडायची. "आला मोठा घराण्याचा कुलदीपक!" असे म्हणत चिडवायची. आता पारूबाई पण तेच करत होत्या. तिच्याबाबत जे घडले होते ते तिला आपल्या मुलांबाबत घडू द्यायचे नव्हते. दोन्ही मुलांना ती समानतेने वाढवणार होती. याची तिने आजच मुलाच्या पाचवीच्या दिवशी मनाशी घट्ट खूणगाठ बांधली.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा