Login

हे बंध रेशमाचे... भाग ३६

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग ३६

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.


उमाच्या बाळाच्या पाचवी पूजनाचा विधी संपन्न होत आहे. आता पुढे...

रात्री वरण भात, मेथीची भाजी, कणकेची फळे बनवून पाच छोट्या मुलांना जेवायला बोलावले होते. मृणाल पण त्यांच्यासोबतच पंगतीत जेवली. त्यांचे जेवण उरकल्यावर बाकीचे सगळे जेवले. उद्या परत जाणार असल्याने उमाच्या आईने विहिणबाईंसमोर प्रस्ताव मांडला.

"व्हय, उमाला घिऊन जाऊ का तिकडं? बाळातपन झालंया, ऱ्हाईल चार दिस. महिन्याभरानं पाटीवते माघारी."

"नगं नगं. ऱ्हाईल हितंच. म्या काय तुमच्या लेकीला काम लावनार न्हाय. सव्वा महिन्याचं प्वार हुईस्तवर गार पान्यात बी हात घालू देयाची न्हाई. पोरीस्नी एकवर एकवर बोलीवनार हाय. आत्या काय मंग नुस्तंच बाळाचं नाव ठिवायच्या हक्कदार का? करू दे की त्यास्नी बी वाईच काम." पारूबाई म्हणाली.

"आत्याबाई, त्यांना कशाला त्रास? त्याऐवजी मी महिनाभर माहेरी जाते. म्हणजे तुमची पण तारांबळ होणार नाही. असं पण दवाखान्याची तारांबळ तर तुम्हीच केलीय." उमा म्हणाली.

"बर, तू म्हनतीयास तर जा बाई. पर बाळाची अजाबात हेळसांड करायची न्हाय हे ध्येयात ठीव." आत्याबाईंनी परवानगी दिली हे पाहून उमाला हायसे वाटले. मृणालचे व तिचे कपडे तिने आईला एका बॅगेत भरायला लावले. महेशरावांनी त्यांना घेऊन जाण्यासाठी गावातली जीपगाडी सांगितली.

सकाळी चहापाणी झाल्यावर नऊ वाजता त्यांची निघायची लगबग सुरू झाली. पारू बाईंनी खोबरं, खारका, डिंक ,तूपाची बरणी आणून ठेवली.

"बारावीला खारीक खोबरं पूजलं की लाडू करा ईनीबाय. मला जमलं तर मी यीनच, पर न्हाय आले तर तुमी बनवा." पारू बाईंचे हे बोलणे ऐकून उमाने आईकडे पाहिले. सासू लेकीची घेत असलेली काळजी पाहून त्या माऊलीच्या डोळ्यात समाधानाची लकेर उमटली.

उमाला मात्र ही सगळी काळजी फक्त मुलगा झाला त्यामुळे घेतली जातेय असेच वाटत होते. तसे नसते तर मृणालच्या वेळी त्या का आल्या नव्हत्या? आपल्या नातवाचीच काळजी यामागे आहे हे उमा पक्के जाणून होती. ज्याप्रमाणे दुभत्या म्हशीची काळजी घेतली जाते, तिने दूध जादा द्यावे म्हणून बैलांसोबत दुभत्या म्हशीला पेंड चारली जाते, त्याप्रमाणे आपली काळजी घेतली जातेय याची तिला खात्री होती. आत्याबाईंच्या मनात फक्त नातवाची काळजी आहे, त्यासाठी आपली काळजी घेणे सुरू आहे हे तिने मनातच ठेवले. काही काही गोष्टी मनातच ठेवायच्या असतात हे ती आता अनुभवावरून शिकली होती.

उमा जीपमध्ये बसल्यावर आत्याबाईंनी बाळाला आधी आपल्या छातीशी कवटाळले. त्यानंतर उमाच्या मांडीवर बाळ देताना त्या म्हणाल्या,

"बाळाला जप. सोत्ताची पर काळजी घे." उमा होकारार्थी मान
हलवत असतानाच जीप हलली. मृणालची त्यांना काहीच काळजी वाटली नाही की मृणाल त्यांच्या खिजगणतीतही नाही असा प्रश्न उमाला पडला. तिने शेजारी बसलेल्या मृणालच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला तसे ते लेकरू आईला बिलगले.
ते पाहून आज्जीने तिला आपल्याकडे ओढले.

"आई, मला तुझ्याजवळ बसायचेय." मृणाल म्हणाली.
छोट्या बाळाच्या येण्याने तिच्या वाट्याला आई येतच नव्हती‌ हे दुःख कुणाला सांगायचे असा त्या बालजीवाला प्रश्न पडला होता.
त्यामुळे आता आईजवळ बसायची मिळालेली संधी तिला दवडायची नव्हती. लेकीच्या मनातील भावना जाणून त्याने छोट्या बाळाला आईच्या मांडीवर दिले व ती मृणालला जवळ घेऊन बिलगून बसली. मृणाल ही तिला घट्ट चिकटून बसली.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all