Login

हे बंध रेशमाचे... भाग ३८

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग ३८

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.


दोघी मैत्रीणींच्या गप्पा मुलगा वंशाचा दिवा यावर रंगल्या होत्या. आता पुढे...

माहेरी उमा चांगली रमली. आत्याबाई बाराव्या दिवशी आल्या. त्यांना पाहून उमाला मृणालचा पाचवीचा विधी आठवला. आपण किती आतुरतेने वाट पाहत होतो पण सासरहून कुणीच आले नव्हते. आज मात्र आमंत्रण न देताही आत्याबाई हजर! तिच्या मनात मुलगा मुलगी भेदाचा विचार येणे साहजिकच होते.

उमाने आत्याबाईंना काही दर्शवले नाही. आत्याबाई त्यादिवशी मुक्कामी राहिल्या. त्यानंतर ही त्या आठवड्याच्या फरकाने पुन्हा आल्या. महेशराव ही आले. एकंदरीत मुलगा झाल्याने सगळेजण आनंदात होते. उमानेही मग उगाचच नाराजीचा सूर आळवणे बंद केले. आपण आपल्या मुलांवर चांगल्या पद्धतीने संस्कार करायचे असा तिने मनाशी निश्चय केला.

बारसे तिकडे आल्यावर करायचे असे त्यांनी ठरवले होते. बारशाची तारीख ठरली आणि महेशराव उमाला परत न्यायला आले. उमा त्यांच्यासोबत सासरी जायला निघाली. तिला मृणालच्या वेळी आपण मृणालच्या बारशादिवशीच सासरी परतलो होतो हे आठवले. त्यावेळी मुलगी झाल्याची नाराजी आत्याबाईंनी दुसऱ्या एका क्षुल्लक प्रसंगावरून काढली होती. आपण सासरी परतताना अजिबात आनंदी नव्हतो हे तिला आजही आठवले.

संसार म्हटले की काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. तेच कवटाळून बसले तर नात्यांमध्ये फूट पडायला वेळ लागत नाही. तेवढी चाणाक्ष ती नक्कीच होती. आत्याबाईंच्या हेकेकोरपणाकडे दुर्लक्ष केले नाही तर आपल्याला फार त्रास होईल हे उमा जाणून होती. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, त्याची जास्त चिंता करू नये हे उमाला चांगले माहीत होते.

सासरी आल्यावर दोनच दिवसांनी बारशाचा जंगी का र्यक्रम पार पडला. त्यानंतर उमाच्या शाळेत जाण्याबाबतच्या चर्चेत आत्याबाईंनी सुट्टी वाढवून घे असे उमाला सांगितले. मृणालच्या वेळी हेडमास्तरांनी तिला माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केले होते. आता हेडमास्तर बदलले होते. आत्याबाई म्हणतात तशी आणखी एक महिना सुट्टी वाढवावी असे तिलाही वाटले. या विचारातच ती झोपी गेली.

सकाळी उठल्यावर उमाने सासुबाईंना विचारले,

"मी थंड पाण्यात हात घालू का आज? झाला की सव्वा महिना आता."

"न्हाय म्हनून तुला कालच सांगिटलंय ना! गप घुमान त्यो च्या घे अन् जा तिकडं."

"आत्या, मृणालच्या वेळी मी सव्वा महिन्यानंतर सगळंच काम करत होते. आता मी झोपायचे अन् तुम्ही काम करायचे, बरे नाही वाटत."

"आन् तुझ्या गार पान्यात हात घालन्यानं पोराला वात झाला म्हंजी? त्येच्यासाटी म्या तुला जपतीया." आत्याबाईंचे हे बोलणे ऐकून मात्र उमाला राहवले नाही. ती म्हणाली,

"मग मृणालला वात होईल अशी भीती वाटली नव्हती का तुम्हाला? तेव्हा तर मी सगळीच कामं करत होते."

"पोरीची जात चिवट असती. तसं पोराचं नसतं."

"हे मात्र काहीतरीच हं तुमचं आत्याबाई. असं काही नसतं."

" अगं माजे बाय, घराण्याचा वंशज चालिवनार हाय त्यो. पोरगी काय जाईल दुसऱ्याच्या घरी." पारूबाई म्हणाली.

यावर उमा काय म्हणाली ते वाचा पुढच्या भागात...
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all