Login

हे बंध रेशमाचे... भाग ३९

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग ३९

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.


मागील भागात आपण पाहिले, उमा व पारूबाईचे बोलणे सुरू आहे. पोराला वाताचा त्रास होऊ नये म्हणून पारूबाई घेत असलेली काळजी पाहून उमा दुसाणली. आता पुढे...

"आत्या, मुलगा, मुलगी दोघेही मासांचा गोळाच असतात. असे असताना मुलाला वेगळा न्याय आणि मुलीला वेगळा असे का? दोघांचीही काळजी घेतली तर काय वाईट आहे? मुलगा वंशाचा दिवा असला तरी सून ही पण कुणाची तरी मुलगीच असते ना? स्त्रीच्या पोटीच हा कुलदीपक जन्माला येतो ना? मग त्या मुलीची वाढ व्यवस्थित व्हायला नको?" उमाने आपल्या मनातील ठसठस ओठांबाहेर काढली.

तरीही आपला हट्ट सोडेल ती पारूबाई कुठली? ती म्हणाली,

"बाईच्या जातीचं कामंच हाय पोरास्नी जलम देनं. यात ती येगळं काय करती?"

"वेगळं नाही आत्याबाई! तिची वाढ जर सशक्तपणे झाली तर जन्माला येणारे बाळ पण सुदृढ जन्माला येईल. आईच जर अशक्त असेल तर बाळाची तरी पोटात व्यवस्थितपणे वाढ होणार आहे का? यासाठी मुलींच्या वाढीकडे पण लक्ष दिले पाहिजे."

"बर, पन आता पोराकडं लक्ष देनं गरजचं हाय ना. बिट्टी तर आता हिंडतीया, फिरतीया, हातानं खातीया. आजून म्हयनाबर तरी गार पाण्यात हात घालू देयाची न्हाय म्या तुला, सांगून ठिवते."

आपल्या बोलण्याने आत्याबाई आत्ता तरी शांत बसल्या हे पाहून उमाला बरे वाटले.बदल चटकन होणार नाही हे तिलाही माहीत होते, अनेक घाव घालावे लागणार होते. आजचा घाव बरोबर मोक्याच्या ठिकाणी बसलाय याचे उमाला समाधान वाटले. अधिक काही न बोलता तीही शांत बसली.

तिला शक्य होईल तेवढी मदत ती आत्याबाईंना करत होती. वाळलेले कपडे घरात आणून घड्या घालून ठेवणे, झाडून काढणे, भाज्या निवडणे, दळणे करणे ही सगळी कामे ती करत असे. आत्याबाईंच्या इच्छेविरुद्ध तिला थंड पाण्यात हात घालता आला असता, पण तिने त्यांच्या भावनेचा मान राखला. नाती अजिबात न ताणता तिला बदल घडवायची इच्छा होती.

बघता बघता शाळेला जायचा दिवस उजाडला. महेशराव रोज शाळेला जाताना मृणालला आपल्यासोबत घेऊन जात असत. उमाने सकाळी लवकर उठून सगळी कामे आवरली आणि बाळाची बाळुती, लंगोट, कपडे भरलेले बास्केट तिने समोर आणून ठेवले. बाळाला अंगावर पाजले आणि आत्याबाईंच्या स्वाधीन करून ती शाळेकडे निघाली.

आज शाळेकडे जाताना ती निर्धास्त होती. आत्याबाई पोराची स्वतःच्या डोळ्यात तेल घालून काळजी घेतील याबद्दल ती आश्वस्त होती. यापुढे ही आपल्याला मृणालच्या खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवावे लागेल, आत्याबाई त्यांच्या लाडक्या नातवाची पूरेपूर काळजी घेतील याची तिला खात्री होती. मात्र नातू आजीच्या लाडाने येडा होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागणार आहे याची तिला जाणीव होती.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all