Login

हे बंध रेशमाचे... भाग ४२

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग ४२

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, पारूबाई आणि तिचा नातू यांचे आपापसातील रेशमी बंध. यामुळे आपला मुलगा आपल्याला विसरणार तर नाहीस ना? अशी उमाला भीती वाटते. आता पुढे...

बघता बघता राजू एक वर्षाचा झाला. त्याचा पहिला वाढदिवस अगदी दिमाखात साजरा झाला. तो पाहून मृणालचे वाढदिवस तिला आठवले. तिच्या वाट्याला एवढे प्रेम कधी आलेच नाही आजीचे. उमाने मात्र ठरवले की, मृणालचा पाचवा वाढदिवस अगदी थाटात करायचा.

उमाला सकाळी कामे आवरताना राजू आपल्या अवतीभवती नाही हे बरेच वाटे. कामे पटापटा उरकली जात. नाही तर मधूनच बाळाकडे पाहायचे मग कामं उरकायची म्हटले की वेळ होणारच! पण राजू समोर असला तरी कधी तिच्याकडे झेपावत नसे. सध्या ती फक्त दुधाची आई ठरली होती. त्याची आई त्याची आज्जीच बनली होती.

उमा मग मृणालचे सगळे आवरे. एकतर मुलीची जात, त्यात केस वाढविलेले, मग ती तिची वेणी घालत असे. तिला गंध पावडर लावले की ती खुश होऊन आरशात आपले रूपडे निरखायची. ते पाहून उमा गालातल्या गालात हसे. राजूला आजीकडूनच आंघोळ करायची असायची. तिने आंघोळ उरकून घेण्यासाठी त्याला उठवायचा प्रयत्न केला तरी आत्याबाई रागवायच्या.

"झोपलंया ना लेकरू, का मन उटवीत आसचील? जा की तुजी तू कामं आवर जा. म्या घालीन त्येला आंगुळ. झोपू दे की त्येला वाईच. अंगी तरी लागंल." यावर उमा म्हणायची,

"तुमचंच थोडं काम हलकं झालं असतं, म्हणून उठवत होते. "

"त्येला आंगुळ घालनं काय काम हाय व्हय?" असे पारूबाई म्हणाली की उमा गालातल्या गालात हसायची.

राजू एक वर्षाचा झाला आणि तिने त्याचे अंगावरचे दूध तोडले. आता तर त्याला दुधासाठी पण तिच्यावर अवलंबून राहावे लागत नव्हते. त्यामुळे तो सदा सर्वकाळ आजीच्या अवतीभवती असे. एवढेच काय पारूबाई कुठे गावाला, लेकींकडे जायला निघाल्या की राजू पण सोबत असायचा. पारूबाई चार दिवस माहेरी जाणार असल्या तरी त्याला आपल्या सोबत घेऊन जात. त्यामुळे त्या गावाला गेल्यावर राजूला कसे सांभाळायचे हा प्रश्न तिच्यापुढे कधीच उभा राहिला नाही.

बाळाचे अंगावर दूध पिणे बंद झाले म्हणून पारू बाईने एक दुभती म्हैस घेतली. पोराला घरचं दूध मिळेल हा उद्देश होता, पण यामुळे उमाचे काम वाढले. सकाळी लवकर उठून महेशराव म्हशीसाठी वैरणीचे ओझे आणत. तिच्यामागे गोठा साफ करणे, वैरण टाकणे, म्हशीला पाणी दाखवणे, दोन वेळा धार काढणे वैगेरे कामांचे लचांड उमाच्या मागे लागले.

आधी घरातले स्वयंपाक पाणी, झाडलोट, कपडे धुणे, भांडीकुंडी हे सगळं ती पटापटा आपटत असे. आता म्हशीमुळे बरीच कामे वाढली. बरं ती रोजच्याच यादीत येऊन पडली. धारा, शेणपाणी या गोष्टी रोजच कराव्या लागतात. त्याऐवजी राजूसाठी एक लिटर दूध विकत घेणे परवडले असते असे उमाला वाटायचे, पण तो निर्णय घेणे तिच्या हातात थोडेच होते?


क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all