Login

हे बंध रेशमाचे... भाग ४३

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग ४३

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, राजूच्या दुधासाठी पारूबाईने दुभती म्हैस घेतली होती. त्यामुळे उमाच्या रोजच्या कामात वाढ झाली होती. आता पुढे...

उमा न दमता, न कंटाळता घरातील सर्व कामे करून आपल्या शाळेत वेळेवर जात होती. कितीही कष्ट करण्याची तिची तयारी होती. आपल्या कुटुंबाविषयी तिला आस्था होती. जसा राजू तिच्या अंगावर दूध प्यायचे बंद झाला, तसतसे हळूहळू आत्याबाईंच्या वागण्यात बदल होत आहे हे तिला जाणवू लागले.
तिच्याशी मृदू भाषेत बोलणाऱ्या आत्याबाई आता पूर्वीसारखेच रागावून बोलू लागल्या.

गेले एक, सव्वा वर्ष त्यांच्या तोंडून येणारी मवाळकीची भाषा ऐकून आपल्या आत्याबाईंचा स्वभाव मुलगा झाल्याने बदलला असे तिला वाटले होते. आता मात्र त्यांच्या बोलण्यातून पुन्हा तोच त्रागा, तीच चीड दिसून येऊ लागली तेव्हा तिला आश्चर्य वाटले. हे खरे की गेले सव्वा वर्ष अनुभवतोय ते खरे? असा तिला प्रश्न पडला. खरंच स्वभावाला औषध नसते का? की सून ही कधीच मुलगी होऊ शकत नाही? असे उलटसुलट विचार तिच्या मनात डोकावू लागले.

एकदा तर कहरच झाला. तिला शाळेत जायला उशीर झाला होता, म्हणून तिने सांगितले,

"आत्याबाई, आजचा दिवस फक्त म्हशीला पाणी दाखवा. मला वेळ होतोय, आज इन्स्पेक्शन आहे." महेशराव तर तासापूर्वीच शाळेत गेले होते. यावर पारूबाई कडाडल्या,

" हुकूम कुनाला सोडतीस गं? सून तू हायस का म्या? आपुन आपलं काम करून जायाचं. म्या काय करनार न्हाय. व्हत नसंल तर नोकरी सोड." हे शब्द ऐकून उमाला आश्चर्य वाटले. बाळाला दूध पाजायला रोज शाळेत घेऊन येणाऱ्या याच आत्याबाई आहेत का असा तिला प्रश्न पडला. तिने पुढे काही न बोलता पटकन घागर उचलली आणि नळाखाली लावली. म्हशीला पाणी दाखवून ती धावतपळतच शाळेकडे गेली.

तिचे नशीब बलवत्तर म्हणून हेडमास्तरीण बाई समोर नव्हत्या. तिने हळूच मस्टरवर सही केली. तसा तिला फक्त पाच मिनिटेच उशीर झाला होता, पण आज तरी कुणालाच उशीर होणे अपेक्षित नव्हते. इन्स्पेक्शनसाठी केंद्रप्रमुख आणि इतर शाळेतील मुख्याध्यापक अशी पाच- सहा माणसे आली आणि मग पुढचे चार-पाच तास त्यातच गेले.

उमा आपल्या कामाबाबत सजग होती. मुलांना शिकवण्यासोबतच ती स्वतःला अद्ययावत माहिती, ज्ञान आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण होण्यासाठी नेहमी नवनवीन पुस्तके वाचत असे. आपले ज्ञान वाढविण्याचे काम करत असे. सभोवताली चौकस बुध्दीने वावरत असे. त्यामुळे इन्स्पेक्शनच्या वेळी ती सगळ्या प्रश्नांची उत्तरे धडाधड देत होती. तिची उत्तरे ऐकून हेडमास्तरीण बाई पण अवाक झाल्या होत्या.

तिच्याबद्दल आलेल्या परीक्षण मंडळाचे मत अनुकूल झाले. त्यांनी शाळेला उत्तम असा शेरा दिला व एकदाचे मंडळ बाहेर पडले. सगळ्या शिक्षकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. हेडमास्तरीण काळोखे बाईंना उमाच्या हुशारीची, हजरजबाबीपणाची चुणूक दिसली. महेशरावांना आपल्या बायकोच्या हुशारीची आधीपासूनच जाणीव होती. त्यांनी फक्त डोळ्यांनी खुणावत तिचे कौतुक केले. तिच्यासाठी ते मोलाचे होते.


क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all