हे बंध रेशमाचे भाग ४४
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, पारूबाई आता उमावर चिडचिड करू लागली आहे. उमाची कामेही वाढली आहेत. आता पुढे...
त्यादिवशी शाळेतून घरी आल्यावर उमा फारच दमली होती. शारिरीक थकव्यासोबत मानसिक थकवा असल्याने ती जास्त दमली होती. डोकं खूप दुखत होतं, थोडावेळ पडावं म्हणून ती आतल्या खोलीत गेली व पलंगावर जरा आडवी पडली. दमल्यामुळे तिला लगेच झोप लागली. पारूबाईच्या दंग्याने तिला जाग आली. ती मोठमोठ्याने बडबड करत होती.
"बाईसाब झोपल्याती आजून. सैपाकाचा तर पत्त्या बी नाय. पोरास्नी जलम दिलाया, त्येस्नी तरी येळंवर जेवान घालावं मानसानं. पार कडुसं पडंस्तवर झ्वाॅप कशी लागती कुनाला ठावं. जीवाला कुणाचं भ्या न्हाय म्हनून ही थेरं चाललेती." हे ऐकून उमा चटकन उठून बसली.
ती रोज शाळेतून आली की, हातपाय धुवून लगेच स्वयंपाकघरात येत असे. एकीकडे चहा ठेवून भात करण्यासाठी तांदूळ काढत असे व चहा होईपर्यंत कालवणाची तयारी करत असे. आज पहिल्यांदाच ती दमल्यामुळे आडवी झाली होती. महेशराव आईला म्हणाले,
"अगं, दमली असेल म्हणून झाली असेल जरा आडवी. उठल्यावर करेल की तिची ती. इतकी का आगपाखड करतेयस? आज शाळेत इन्स्पेक्शन होते. तिकडेही दिवसभर धावपळ झाली आहे तिची."
"हुतं नसंल तर नोकरी सोड म्हणावं. बाईमानसानं असं दिवंलागणीला झोपल्यालं मला चालनार न्हाय." पारूबाई म्हणाली तेवढ्यात उमा उठून आली होती. तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकत ती पुढे म्हणाली,
"घ्या, आलेती उटून रानीसायब. च्या मिळंल का आजच्याला?" उमा काहीच न बोलता स्वयंपाकघरात गेली व तिने चहाला आधण ठेवले. तिलाही चहाची फार आवश्यकता होती. डोके खूप दुखत होते.
तिने सगळ्यांना चहा दिला, मुलांना दूध दिले व ती स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाला की ती म्हशीची धार काढून आली. महेशराव रतीबाचे दूध घालायला गेले. तिने मृणालला जेवायला वाढले आणि तिने राजूला भरविण्यासाठी ताट वाढून घेतले. ती राजूच्या मागे मागे पळत होती, पण राजू तोंडच उघडत नव्हता. तिची चाललेली कसरत पाहून पारूबाईला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. शेवटी थोड्या वेळाने तिने उमाला सांगितले,
"आन इकडं त्ये ताट. आली मोठी चारनारीन." उमाला ही राजूच्या मागे पळण्याचा कंटाळा आला होता. तिने ते ताट पारूबाईंच्या हातात दिले. आजीने हाक मारली की राजू मुकाट्याने आजीसमोर आला आणि त्यानं तोंड उघडून घास खाल्ला. उमाला आश्चर्य वाटले. उमाकडे पाहत पारूबाई म्हणाली,
"लेकराला लळा लावाय लागतुया. उगाच प्वार आजी आजी करत न्हाय." त्यावेळी पारूबाईच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. यावर उमा काहीही बोलली नाही. आपलं लेकरू आपल्यापेक्षा आजीवर जास्त जीव टाकतंय याचा तिला आनंदच झाला, कारण शाळेत जाईपर्यंत दिवसभर तो आजीजवळच असणार होता. मात्र हाच लळा त्यांनी मृणालला सुध्दा लावला असता तर तिला जास्त आनंद झाला असता. अधिक काही न बोलता ती स्वयंपाकघराकडे वळली.
जेवणे होऊन मागचे सगळे आवरून झोपायला जायला तिला अकरा वाजले. अंथरूणावर पाठ टेकताच तिची एका मिनिटात झोप लागली. रोजचे रहाटगाडगे चालूच रहाणार होते.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा