हे बंध रेशमाचे भाग ४५
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, पारूबाई उमावर रागावून तिला बडबड करते. राजूला आजीचा किती लळा आहे हे उमाच्या लक्षात येते. आता पुढे...
रोजच्यासारखीच धावपळीची सकाळ उगवली. शाळेत जायची वेळ होईपर्यंत उमा पायाला चक्रे बांधल्यासारखी गरागरा फिरत होती. सगळी कामे उरकली आणि पाच मिनिटांत तयारी करून ती शाळेकडे निघाली. जाताना ती म्हणाली,
"आत्याबाई, राजूला पण शाळेत घेऊन जायला सुरुवात करते आता. कानावर पडले की ऐकून ऐकून सवय लागेल. त्याला शिक्षणाची गोडी लागेल मग आपसूकच. मृणाल आहेच त्याच्यावर लक्ष ठेवायला, अन् आम्ही दोघं पण आहोतच."
"ल्हान हाय आजून तो. यवड्यात कशापायी त्येला साळंत कोंडतीयास?"
"मृणाल पण याच वयात शाळेत येत होती माझ्यासोबत. तसाच हा पण बसेल. मुलांच्यात खेळला म्हणजे त्याला माणसांची पण सवय होईल. घरात एकटाच असतो." उमा म्हणाली.
"म्या हाय की घरात. एकटा कशानं?"
"आज घेऊन जाते मी शाळेत. बघते कसा करतोय?" असे उमा म्हणाली तसे पारूबाई अस्वस्थ झाली. तिला राजूला आपल्या नजरेसमोरून दूर करायचे नव्हते, पण तिचे उमापुढे काहीच चालले नाही. उमा राजूला घेऊन शाळेत आली. राजू शाळेत गेल्यावर बावरला व रडू लागला. तसे उमाने त्याच्यापुढे खेळणी ठेवली. नवीन खेळणी पाहून तो थोडासा शांत झाला, खेळण्यांसोबत खेळू लागला. बालवाडीच्या मावशींना त्याच्यावर जरा लक्ष ठेवा अशी सूचना देऊन ती तिच्या वर्गात आली.
थोड्यावेळाने राजूचा जोरात रडण्याचा आवाज ऐकून ती बालवाडीच्या वर्गाकडे गेली तर राजू खेळताना पडला होता व त्याच्या कपाळावर लागले होते. त्या जखमेतून रक्त येत होते. तो कसा पडला हे विचारण्याच्या भानगडीत न पडता तिने त्याला पटकन उचलले व त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेली. तिथे डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर मलमपट्टी केली. जखम फार खोल नाही, दोन तीन दिवसात भरून येईल असे सांगितले.
ती राजूला घेऊन घरी आली. राजूच्या कपाळावर पट्टी पाहून पारूबाईने उमाच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली.
"नव्हं, लेकराला साळंत न्हीऊ नगं म्हनत हुते म्या. कसं लागलं पोराला? तुझं ध्यानच कुठं असतं पोरावर? घरातबी तसंच, साळंत तर काय सतराशे साठ पोरं." राजूला तिच्याकडून जवळजवळ हिसकावून घेत पारूबाई म्हणाली.
"एवढं काय झालेलं नाही. खेळताना पडला, अन् लागलंय. डॉक्टरांनी सांगितलं, दोन दिवसांत होईल बरी जखम." उमा म्हणाली.
"पर रगात ग्येलं आसलंच की."
"मृणाल पडली की, पडं झडं माल वाढं, असं तुम्हीच म्हणायचात ना? बारकं पोर पडणारच. त्याचा किती बाऊ करायचा?" उमाला आता खरं तर आत्याबाईंचा राग येऊ लागला होता. त्यांचे राजूमध्ये इतके गुंतणे तिला अवाजवी वाटत होते. अशाने राजूची वाढ खुंटेल असे तिला वाटत होते.
तिच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष करत पारूबाई राजूला घेऊन बाहेर गेली. उमा शाळेत परत निघाली होती तेव्हा तिला वाटेत पारूबाई भेटली. राजूच्या हातात दोन दोन लाॅलीपाॅप होते. एक तो चोखत होता आणि दुसऱ्यावरचे आवरण काढलेले नव्हते. ते पाहून तिच्या रागाचा पारा अजून चढला, पण रस्त्यात काय बोलायचे म्हणून ती निमूटपणे काहीच न बोलता पुढे गेली, पण तिच्या डोक्यात राग मावत नव्हता.
राजूवर आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे हे तिला कळून चुकले. याच विचारात आज तिचे वर्गात शिकवण्याकडेही लक्ष लागले नाही.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा