हे बंध रेशमाचे भाग ४६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, राजूला पडल्याने डोक्याला जखम झाली म्हणून पारूबाई उमाला टाकून बोलली. आता पुढे...
आज जी घटना घडली त्याचा उमाच्या मनावर फार परिणाम झाला. पारूबाई राजूसाठी जर अशीच प्रमाणापेक्षा जास्त संवेदनशील होत असेल तर ते राजूच्या सर्वांगीण विकासासाठी घातक आहे. आजीच्या मायेच्या पंखांखाली त्याची वाढ खुरटेल. त्यासोबतच त्याला दटावणे, शिस्त लावणे आपल्यासाठी अवघड होईल. यावर काहीतरी उपाय लवकरच केला पाहिजे. असा विचार तिच्या मनात आला.
हे महेशरावांना सांगावे असे वाटले, पण तिने ते टाळले. आपल्याला वाटणारे गांभीर्य त्यांना पटणार नाही. मातृभक्त मुलगा इथे पण आईचीच बाजू घेऊन बोलणार याची तिला खात्री होती. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा तो आपल्यालाच घ्यावा लागणार आहे हे तिला समजून चुकले.
हळूहळू राजूला आजीपासून दूर करावे लागणार होते. लगेचच हे शक्य नव्हते कारण राजूला आजीचा खूप लळा होता. दोन महिन्यांचा असल्यापासून तो आजीला चिकटला होता. त्याला शाळेत दररोज नेऊन हळूहळू त्याचा आणि आजीचा सहवास काही तासांपुरता का होईना कमी करणे एवढा एकच पर्याय सध्या तिच्यासमोर होता.
चार दिवसांनी राजूच्या डोक्याची जखम पूर्ण बरी झाली. तिने त्याचा ही खाऊचा डबा सोबत घेतला व ती त्याला शाळेत घेऊन निघाली. ते पाहताच पारूबाई चवताळून तिच्यासमोर आली.
"आता काय पोराचा जीव घेनार हायस का? आई हायस का कैदाशीन? यवडं पडलं पोरगं, तरी बी त्येला घिऊन निगालीयास.
ठिव त्येला आदुगर खाली. अजाबात साळंत न्येयाचा न्हाय, सांगून ठिवते."
ठिव त्येला आदुगर खाली. अजाबात साळंत न्येयाचा न्हाय, सांगून ठिवते."
"आत्याबाई,नाही तिथं लाड करायचा नाही. मी त्याला शाळेत घेऊन जाणार. त्याशिवाय त्याला शाळेत बसायची सवय कशी लागणार? त्याच्या वयाच्या मुलांमध्ये त्याला खेळू द्या, बागडू द्या. पडला तरी इतकी काळजी करू नका. तुमची मुले लहानपणी पडली असतीलच की. राजूचा इतका विचार करू नका. या वयात तो पडून उठायला शिकला पाहिजे." उमा म्हणाली.
आजपर्यंत उमाने त्यांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट डावलली नव्हती. आज मात्र तिच्यातील मातृत्व बंड करून उठले होते. मुलाच्या भवितव्यासाठी आज आत्याबाईच काय सगळ्या जगासमोर उभी ठाकायची तिची तयारी होती. तिचा हा ठामपणा पारूबाईसाठी नवीनच होता. आज तरी तिने तिच्या वाटेतून बाजूला होणेच पसंत केले. आपण जर जास्त बोललो तर आज सुनेचे चार शब्द ऐकून घ्यावे लागतील असे तिला वाटले. असा अपमान झालेला तिला सहन झाला नसता. त्यापेक्षा बाजूला झालेले बरे असा विचार करून ती मुकाट्याने घरात गेली.
उमाला त्यांना बोलायची अजिबात इच्छा नव्हती, पण त्यांनीच वेळ आणली होती. मुलांसाठी आई काहीही करू शकते याचेच उदाहरण होते ते. हिरकणी आपल्या जीवावर उदार होऊन रात्रीच्या अंधारात एवढा मोठा कडा उतरून आपल्या बाळाकडे आली. मग उमासाठी तर हे अगदीच सोपे काम होते. आता रोजच राजूला शाळेत घेऊन जायचे असे तिने ठरवले.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा