Login

हे बंध रेशमाचे... भाग ४७

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग ४७

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.


मागील भागात आपण पाहिले, उमा आत्याबाईंच्या विरोधाला न जुमानता जबरदस्तीने राजूला आपल्यासोबत शाळेत घेऊन गेली आहे. आता पुढे...

बालवाडीची सुट्टी झाली की, उमा मधल्या सुट्टीत राजूला घरी घेऊन आली. पारूबाई अस्वस्थपणे आतबाहेर येरझारा घालत होती. उमा राजूला घेऊन आलेली पाहताच पारूबाईने उमाकडून राजूला जवळजवळ हिसकावून घेतले व त्याला आपल्या छातीशी कवटाळले. ते पाहून उमा अचंबित झाली.

"आत्याबाई, एवढं काय झालं? राजूला बालवाडीत घेऊन गेले होते, काय कुठे वनात सोडले नव्हते. तो काय रोज रोज पडणार आहे का? किती काळजी करायची माणसानं! मी त्याची आई आहे, मला त्याची काळजी नाही का?"

"तर तर...आली मोठी काळजी करनारीन. काळजी आस्ती तर लेकराला घिऊन ग्येली नस्ती तू."

"असं का म्हणता आत्याबाई? लेकराची काळजी आहे म्हणून त्याला शाळेत घेऊन गेले होते. आता सांभाळा त्याला मी शाळेतून येईपर्यंत. मी याला सोडायला आले होते." असे म्हणत उमा माघारी फिरली.

पारूबाईला राजूला पाहून प्रेमाचे भरते आले. त्याला खाली ठेवू नये असे तिला वाटत होते. ते पाहून उमा मात्र विचारात पडली. आत्याबाईंचे हे नातवावरील प्रेम जास्तच ऊतू चालले आहे, याबाबत काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे असे तिला वाटले.

मुलगा घराण्याचा कुलदीपक आहे म्हणून त्याचे अतिशय लाड करणे, त्याच्यावर प्रचंड माया लावणे हे पारूबाईचे वागणे बदलले पाहिजे. यासाठी असा काय उपाय करायचा की ज्याने साप ही मेला पाहिजे आणि लाठीही तुटता कामा नये अशा उपायाच्या शोधात उमा होती.

याबाबत ती महेशरावांशी बोलली. त्यांनाही आईचे वागणे खटकत होते. मुलाचा जास्त लाड त्याला बिघडवू शकतो यावर दोघांचेही एकमत झाले. पारूबाईला कितीही समजावून सांगितले तरी ती त्या मायेच्या पडद्याआआडून बाहेर येतच नव्हती.
यावर उपाय असा शोधला पाहिजे, की राजू पेक्षाही तिला जास्त प्रिय असेल अशी वस्तू तिच्यासमोर आणली पाहिजे.

अशी कुठली गोष्ट आहे ज्याची आत्याबाईंना जास्त आवड आहे याचा विचार करताना उमाच्या डोक्यात एक विचार वीजेसारखा लखकन चमकून गेला. तिच्या गालांवर हसू आले. आता आपण राजूपासून त्यांना दूर ठेवू शकतो हे तिला समजले.

प्रेम माणसाला पझेसिव्ह बनवते. त्या व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात गुंतले तर फक्त त्याच व्यक्तीचा विचार डोक्यात घोळत राहतो. मग यातून ती व्यक्ती आपली खाजगी मालमत्ता आहे, तिच्यावर फक्त आपलाच अधिकार आहे, कारण आपण सर्वात जास्त तिच्यावर प्रेम करतो, तिची काळजी घेतो असे वाटते. यामुळे सदासर्वकाळ तिच्याच विचारात व्यक्ती राहते.

हे समोरच्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी घातक आहे याची कल्पना त्या व्यक्तीला नसते. तिला फक्त आपले प्रेम, आपली माया दिसत असते. नातवाच्या मायेत अखंड बुडालेल्या पारूबाईला त्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत याची उमाला जाणीव होती म्हणूनच गेले दोन दिवस उमा आणि महेशरावांची खलबते सुरू होती. शनिवारी दोघे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आले. त्यानंतर दोघे बॅंकेतही जाऊन आले. त्यांनी बेत आखला होता, आता तो पध्दतशीरपणे राबवायचा होता त्यांना. तिला खात्री होती, यामुळे पारूबाईंची राजूवरची आसक्ती कमी होईल.
पाहूया उमाने काय बेत आखलाय ते पुढील भागात...


क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all