हे बंध रेशमाचे भाग ४८
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले महेशराव व उमा दोघांचेही पारूबाई व राजूच्या बाबतीत एकमत झाले आहे. आता पुढे...
असा काय उपाय शोधला होता उमाने?
शनिवारी सकाळची शाळा असते. शाळेतून उमा आणि महेशराव घरी आल्यावर जेवणखाण झाले की थोड्यावेळाने दारासमोर एक गाडी येऊन उभी राहिली. उमा व महेशराव बाहेर गेले. आत खाटेवर राजूला घेऊन बसलेली पारूबाई बाहेर डोकावून बघत होती. आपल्याकडे गाडीतून कोण माणसं आली आहेत याची तिला उत्सुकता होती.
उमा व महेशराव त्या माणसांना घरात घेऊन आले. चहापाणी झाला, त्यानंतर उमाने त्यांना आपले संपूर्ण घर दाखवले. अगदी संडास बाथरूमकडे पण नेले. मागील बाजूस असलेली मोकळी जागा दाखवली. आपल्या लेकाचं आणि सुनेचं काय चाललंय याचं कोडं पारूबाईला पडलं होतं, पण बाहेरच्या माणसासमोर कसं काय विचारायचं या विचाराने ती गप्प होती.
सगळे घर बघून झाल्यावर त्यातील एका माणसाने टेप काढला व दोघे मिळून मोजमापे घेऊ लागली. सगळ्या कानाकोपऱ्यापासून त्यांनी मोजमापे घेतली. उमा व महेशरावांशी थोडी चर्चा करून ती माणसे निघून गेली.
"व्हय रं, कोन हुती ती मानसं? समदं घर का म्हनून दावलं त्येस्नी? मी कोंबड्या बशिवल्या हैती तिथं पर गेली हुती ती गाबडी. आता शिवताशिवत झाली तर अंडी उबतीलं का? वीस अंडी ठेवल्याती कोंबडीखाली." कुणाला कशाची काळजी तर कुणाला कशाची? त्याही अवस्थेत महेशरावांना हसू आले.
त्यांनी आईला काहीच उत्तर दिले नाही.
त्यांनी आईला काहीच उत्तर दिले नाही.
दोन दिवसांनी त्यापैकी एक माणूस कागदाची भेंडोळी सोबत घेऊन आला व महेशरावांच्या ताब्यात देऊन गेला. उमा व महेशराव ते कागद समोर मांडून बराचवेळ त्यावर उलटसुलट चर्चा करत बसले होते. हेच चित्र गेले दोन दिवस पारूबाईला दिसत होते. त्या कागदाच्या बाडात एवढे काय आहे हे पारू बाईला समजत नव्हते.
दोघांची चर्चा पूर्ण झाली आणि त्यांचे सारखे बाहेर जाणे सुरू झाले. पारूबाईला त्याच्याशी काही देणेघेणे नव्हते. त्यांचे शाळेचे काहीतरी काम सुरू असेल असे तिला वाटले. ती आपली नातवात रमून गेली होती.
आठवडाभराने रात्रीची जेवणे झाल्यानंतर महेशराव व उमाने सासू सासऱ्यांसमोर एक प्रस्ताव मांडला.
"आई, आपण हे घर पाडून इथे नवीन घर बांधतोय. गेले काही दिवस मी आणि उमा त्याच गडबडीत होतो. घराचा प्लॅन आखला आहे. खर्चाचे पूर्ण नियोजन केले आहे. माझी व उसाची बचत होती त्यातून हे घराचे स्वप्न पूर्ण होईल. फारसे कर्ज काढावे लागणार नाही. आता लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तोपर्यंत राहण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे. मी शांतारामला विचारलेय. त्याचे जुने घर रिकामेच आहे. आपलं घर बांधून होईपर्यंत आपले सगळे सामान तिकडे हलवायचेय.उद्याच्या शनिवारी रविवारी आपण हे घर मोकळे करायचे आहे."
मुलगा व सुनेने पारूबाईसमोर अचानक बाॅम्ब फोडला होता. पारूबाई हे सगळं ऐकून खूप हरखली होती. तिचे नवीन घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार होते. तिच्या आनंदाने फुललेल्या चेहऱ्याकडे पाहून समजत होते की, तिला किती आनंद झाला आहे. आपला प्लॅन यशस्वी होणार यात उमाला अजिबात संदेह नव्हता. तिच्याही चेहऱ्यावर हसू पसरले. ते हसू मातृत्वासोबतच कर्तव्यपूर्ततेचे ही होते.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा