हे बंध रेशमाचे भाग ४९
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय :- कौटुंबिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, घर बांधण्याचा मनसुबा उमा व महेशरावांनी घरात सर्वांसमोर उघड केला आहे. आता पुढे...
आपले घर बांधण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाणार या विचाराने पारूबाईला खूप आनंद झाला. गेले काही दिवस चाललेली मुलांची व सुनेची लगबग घर बांधण्यासाठी होती हे आत्ता तिला समजले. चालणाऱ्या चर्चेत ती सहभागी झाली. घराचा प्लॅन समजावून घेऊ लागली.
तो आठवडा अतिशय गडबडीत गेला. उमा काही आता सुट्टी घेऊ शकत नव्हती, कारण तिने बाळंतपणात आधीच रजा घेतली होती, त्यामुळे तिच्या रजा शिल्लक नव्हत्या. सकाळी आणि रात्री जेवढी आवराआवर करता येईल तेवढी ती करत होती.
पारूबाईवरच सगळ्या कामाचा बोजा येऊन पडला होता. घरातील सामान उचलून दुसरीकडे न्यायचे होते. त्याचवेळी त्यातील नको असणारे सामान बाजूला काढून भंगारमध्ये टाकायचे होते. लागणारे सामान व्यवस्थित भरून ठेवायचे होते. माळ्यावरचे सामान, रोजच्या वापरातले सामान आणि कधीतरी लागणारे सामान अशी तीन प्रकारे वर्गवारी करायची होती.
पारूबाई कामाने वैतागून गेली. आता उमाचे लग्न झाल्यापासून पारूबाईला जास्त कामाकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. सगळी कामे उमाच करे. उमा शाळेत गेल्यावर राजूकडे लक्ष देणे एवढेच तिचे काम असायचे. आता कामाचा आ वासलेला डोंगर पाहून ती बावचळली. तिने उमाला सांगितले,
"राजूला साळा सुटस्तंवर साळंतच बशीव. म्या कामं बगू का त्येच्याकडं बगू? चार दिसानं शांतारामच्या घरी ऱ्हायाला गेलो की मंग आनून ठीव मदल्या सुट्टीत."
उमाच्या मनासारखं झालं होतं. तिने होकार दिला. चार दिवस तिने राजूला शाळेतच बसवले. रविवारी सगळे सामान भरून टेंपो शांतारामच्या घरी निघाला तेव्हा पारूबाई घराकडे एकटक बघत बसली. तिच्या डोळ्यांत पाणी आले.
"का रडताय आत्याबाई?" उमाने विचारले.
"नांदायला आल्यापास्नं याच घरात ऱ्हायले. समदी बाळातपनं इथंच झाली. सासूचा सासुरवास इथंच भोगला. लेकरांची लग्नं, त्येस्नी पोरं बी इथंच झाली. आता हे घर नदरंआड हुनार म्हनून वाईट वाटतंया पोरी. समदा सौसार इतंच झाला."
"आत्याबाई, घर तिथेच असणार आहे, पण काळानुसार नवीन बांधकाम करणे गरजेचे आहे. काही दिवसांनी हे घर पडायला आले असते. त्यावेळी एखादी भिंत कुणाच्या अंगावर पडून अपघात होण्यापेक्षा आपण ते पाडून नवीन बांधतोय. तुमचेच स्वप्न होते ना, आपला बंगला झाला पाहिजे असे. मग काही हवे असेल तर काही गमवावे लागतेच." उमा म्हणाली.
"व्हंय गं पोरी. खरं हाय, पर मन गुततं गं. घर मंजी चार भिती नसतेती फकस्त. समदं आयुष्य याच्या संगतीनं जगलीया म्या. किस्त्या संकटास्नी त्वांड दिलंया. लक्षुमीच्या येळंस म्या जगीन अशी काय कुनालाबी खात्री नवती. माझ्या मागारी पोरांचं कसं हुनार या काळजीनं मालकांच्या जीवाला घोर लागला हुता. खंडुआईची किरपा म्हनून आज जिती हाय म्या. नायतर तवाच माजं बरंवाईट झालं आस्तं."
" आत्याबाई, आठवणी कायमच सोबत असतात. आयुष्य म्हटले की, काळानुसार येणारी संकटे, दुःखाचे क्षण, आनंदाच्या गोष्टी हे सगळे आलेच. यालाच तर जीवन म्हणतात ना! तर आता हा भावनांचा पसारा आवरा आणि पुढे चला. पुढचा पसारा आवरण्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. घराचा मेढ्या आहे तुम्ही." हे उमाचे बोलणे ऐकून पारूबाईने आपल्या डोळ्यांत आलेले पाणी पुसले व ती घरापासून पाठमोरी झाली. जणू तिने मागील आठवणींवर पाठ फिरवली होती.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा