Login

हे बंध रेशमाचे... भाग ५०

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग ५०

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

जुन्या घराशी जोडलेल्या आठवणींमुळे पारूबाई खूपच भावूक झालेत. आता सामान घेऊन शांतारामच्या घरी त्यांचा काही दिवस मुक्काम असणार आहे. तिथून पुढे...

भाड्याने घेतलेल्या घरी सामान उतरवण्यात पारूबाई अगदी गढून गेली. आयुष्यभर केलेल्या संसारात जमविलेले किडूकमिडूक व्यवस्थितपणे येतेय ना हे ती डोळ्यात तेल घालून पाहत होती.

कसं असतं ना माणसांचं मन? माणसाच्या आयुष्यात चार आश्रम असावेत असे अध्यात्म सांगते. आपली सर्व सांसारिक कामे पूर्ण झाली की संसारातून अलिप्त व्हावे आणि संन्यासाश्रम घ्यावा असे सांगितले जाते.

संन्यास याचा अर्थ वनात राहायला जाणे हे पूर्वीच्या काळी अभिप्रेत होते. आजच्या घडीला हे शक्य नाही. त्यामुळे संसारात राहून संसारातून अलिप्त व्हावे हाच संन्यासाश्रम! पण बायकांना तो तरी जमतो का? वीस- पंचवीस वर्षांपूर्वी घेतलेल्या पातेल्यात आजही त्यांचा जीव अडकतो. हा माझा संसार आहे या विचारातून त्या बाहेरच येत नाहीत.

यामुळे लग्न होऊन आलेल्या सुनांना हा संसार आपला वाटत नाही, कारण त्यावर सासूचेच वर्चस्व असते. पारूबाईही त्याला अपवाद नव्हती. आज या सामान हलविण्याच्या प्रक्रियेमुळे ही गोष्ट जास्त अधोरेखित झाली.

उमा समजूतदार होती, त्यामुळे सासूची संसाराप्रती असलेली आसक्ती ती समजून घेत होती. कुटुंबावर आपलं वर्चस्व नसले तरी काही हरकत नाही, सर्व कुटुंब एका धाग्याने बांधलेले असावे अशी तिची इच्छा होती. आज ना उद्या या घरावर आपली सार्वभौम सत्ता असेल हे तिला माहीत होते. तोपर्यंत आज्ञापालन करणे एवढेच आपले काम आहे असे ती मानत होती.

आत्याबाई आज घर सोडताना किती भावूक झाल्या होत्या ते तिने पाहिले होते. त्यांना आठवांचे उमाळे येत होते. त्या उमाजवळ आपले मन मोकळे करत होत्या. कितीतरी अशा गोष्टी त्यांनी उमाला सांगितल्या ज्या उमाने याआधी ऐकल्या नव्हत्या.
त्यांच्या काळात त्यांनी भोगलेल्या सासुरवासाच्या कहाण्या ऐकून उमा अचंबित झाली होती.

शांत पाण्याचा तळ जेव्हा ढवळला जातो तेव्हा तळाशी असलेल्या गोष्टी वर येतात. आज नेमके तसेच झाले होते. पारूबाई बोलत होत्या, मन रिते करत होत्या, मनाच्या तळाशी रूतलेल्या असंख्य आठवणींचे मोहोळ मुक्त करत होत्या. उमा त्या प्रवाहात उभी राहून चिंब भिजली होती.

माणूस जसा दिसतो, जसा वागतो त्यामागे असंख्य गोष्टी त्याच्या आयुष्यात घडलेल्या असतात. त्यामुळे तो तसा बनत जातो हे उमाच्या लक्षात आले. वरून कठीण आणि खडबडीत फणसासारख्या दिसणाऱ्या सासूचे हृदय मात्र कोमल आहे याची तिला जाणीव झाली. आज एका वेगळ्याच बंधाने त्या दोघी बांधल्या गेल्या. मनाने एकरूप झाल्या. सासूने भोगलेल्या दुःखाची तीव्रता उमाने जाणली. त्यामानाने आपण फार सुखी आहोत असा विचार उमाच्या मनात आला.


क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all