Login

हे बंध रेशमाचे... भाग ५१

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग ५१

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, पारूबाईने आठवणींची पोतडी उघडलीय. उमा त्यात वाहवत गेलीय. आता पुढे...

पारूबाईने नातवाला मांडीवर घेत आठवांचा पसारा आवरला. उमाही कामाला लागली. नवीन घरात सामानाच्या पसाऱ्यात जेवण बनवणे तिला अवघड जात होते, पण ते करणे आवश्यक होते.

दुसऱ्या दिवशी घर पाडण्यासाठी जेसीबी मशीन आले. काही मिनिटांतच घर जमीनदोस्त झाले. पारूबाईच्या डोळ्यातून दोन अश्रू ओघळले. हे होणारच हे तिन आता स्वीकारले होते.

घराचा पाया काढणे सुरू झाले. आता पारूबाईला घराच्या कामाकडे लक्ष द्यावे अशी इच्छा निर्माण झाली. उमा शाळेत गेल्यावर ती कामाच्या ठिकाणी येऊन बसू लागली. कामगार कामं व्यवस्थित करतात की नाही हे जातीने पाहू लागली. मधल्या सुट्टीत उमाचे राजूला आणून सोडणे तिला नकोसे वाटू लागले. राजूवर लक्ष ठेवावे लागत होते. त्याला घरात एकट्याला ठेवून घराच्या कामाकडे येणे तिला शक्य होत नव्हते.

चार दिवस असेच गेले आणि तिने उमाला सांगितले,

"व्हय गं, राजूला सांचीपारा तुज्याबरंच साळंतनं आनलंस तर बरं हुईल. मला त्येला घरात ठिवून इकडं येता येत न्हाय. तुमी दोगं बी दिसभर नसता. कामगारांवर ध्यान ठिवाय लागतं. लै कामचुकारपणा करतेती. आता राजूला सवं बी लागलीया साळंत बसायची. घर बगावं बांधून, हीर बगावी खनून अन् लगीन बगावं करून आसं म्हननेती त्ये काय खोटं न्हाय. ध्यान ठिवाया होवं."

स्वतः आत्याबाईंच्या तोंडूनच हे तिला हवे असलेले शब्द आलेले पाहून उमाला आनंद झाला. तो न दाखवता ती म्हणाली,

"होय. तुम्ही म्हणता ते खरे आहे. घराच्या कामावर आपली देखरेख हवीच. तुम्ही काळजी करू नका. मी राजूला माझ्यासोबत घरी आणत जाईन. तशीही त्याला आता शाळेत बसायची सवय लागली आहे."

आता संध्याकाळी सगळे घरात असताना राजू आत्याबाईंच्या अवतीभवती खेळायचा. त्यावेळी मृणालही तिथे असायची. आता आत्याबाईंचे राजूला चाॅकलेट देणे, त्याचे अवाजवी लाड करणे बंद झाले होते. त्याऐवजी त्यांच्या डोक्यात, तोंडात कायम घराचाच विषय असे. राजूच्या बाबतीतील त्यांचा पझेसिव्हनेस आता कमी होत चालला होता.तो घराकडे वळला होता. हे पाहून उमाला आनंद होत होता.

आपण योग्य वेळी घर बांधण्याचा निर्णय घेतला असे उमाला वाटले. राजूच्या बिघडण्याला आत्याबाईंचे वागणे कारणीभूत झाले असते, आणि आपण काहीच करू शकलो नसतो असे तिला वाटले. तिचा स्वभाव आक्रमक नव्हता. भांडणे, वाद करणे तिच्या स्वभावात नव्हते.

आपल्या मुलासंदर्भात जो पेच निर्माण झाला होता तो तिने अत्यंत हुशारीने सोडवला होता, आणि या कानाची त्या कानाला खबर होऊ न देता. तसेच नात्यांमधील गोडवा ही टिकून राहिला होता. घर एकसंघ ठेवण्याचे कसब तिला बेमालूमपणे जमले होते. आता आपल्याला राजूच्या संदर्भात काळजी करण्याचे कारण नाही अशा विचाराने उमा आश्वस्त झाली.

एकत्र कुटुंबामुळे होणारे तोटे तिने प्रयत्नपूर्वक दूर केले होते. आता त्यांचे कुटुंब अभेद्य राहील याची तिला खात्री पटली होती, कारण यापेक्षा अधिक कुठलीही अपेक्षा तिला नव्हती. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, मुले या देशाचे उत्तम नागरिक बनवावेत यासाठी ती प्रयत्न करणार होती. आपले स्वप्न नक्की पूर्ण होईल याची तिला खात्री पटली होती.

समाप्त. ©® सौ. हेमा पाटील.

सदर दीर्घकथेचे सगळे भाग पोस्ट झालेले आहेत. कथा मालिका कशी वाटली हे कमेंट द्वारे नक्की कळवा ही वाचकांना विनंती.

0

🎭 Series Post

View all