Login

हे बंध रेशमाचे... भाग १७

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे भाग १७

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

उमा बाळंतपणासाठी माहेरी आली आहे. इकडे आई सुध्दा सासुबाईंसारखीच तिच्यावर करडी नजर ठेवून आहे याचा उमाला त्रास होतोय. आता पुढे...

सकाळी उठल्यावर उमा शेताकडे निघाली. आईला न सांगताच ती बाहेर पडली. फर्लांगभर अंतरावर असलेल्या बाभूळटेकात ती पोहोचली आणि थेट बिब्ब्याच्या झाडाकडे गेली. झाडांवर अजूनही काही बिब्ब्या शिल्लक होत्या. पक्ष्यांनी बिया खाल्ल्याने झाडाखाली बिब्बे पडले होते. पानांमधून अधूनमधून पिवळी रशरशीत फळे दिसत होती. ते पाहून तिला आनंद झाला.

घरी परत आली तर आई ओरडली. रानातून फिरून आले असे सांगितल्यावर आणखी रागावली.
"अशा अवघडलेल्या बाईनं जाऊ नी कुटं. जागा खराब आस्ती." हे ऐकून तिच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे आपल्या काळजीपोटी आई आपल्याला कुठे जाऊ देत नाहीय. आईची अशी काळजी घेणे पाहून ती सुखावली.

तिला आठवण झाली म्हणून तिने आईला विचारले,

"आई, वंदु बाळंत झाली असेल ना! वंदुला काय झाले गं?"

"दुसरी पन पोरगीच झाली."

वंदुला दुसरी पण मुलगीच झाली. हे ऐकून उमाला तिचा व वंदुचा मध्यंतरी झालेला संवाद आठवला.

"कुठं आहे वंदु?"

"इथंच हाय की. कुटं जाणार?"

ती म्हणाली,

"मला चहा दे लवकर. मी जाते वंदुला भेटायला."

ती वंदुच्या घरी आली तर शरयू बाहेर अंगणात खेळत होती. तिने शरयुच्या हातात बिस्कीटचा पुडा ठेवला. शरयू हरखली. तिने शरयूला जवळ घेतले व ती म्हणाली,

"आई कशी आहे गं? आणि छोटं बाळ कसंय?"

"छान आहे मावशी, पण ते बाळ सारखंच झोपतं. आई माझ्या मांडीवर देतच नाही, सारखी स्वतःच घेऊन बसते. मला पण आता मांडीवर घेत नाही. मी आपली एकटीच बसते खेळत." त्या बालजीवाने आपली व्यथा मांडली.

"आता मी घरी जाताना तुला माझ्यासोबत घरी घेऊन जाते. मी खेळीन तुझ्याशी. चालेल?"

शरयूला झालेला आनंद तिच्या डोळ्यांत दिसला. ती पळतच आत गेली व आईला म्हणाली,

"आई, आई मी मावशीकडे जाणार आहे. मावशी मला न्यायला आली आहे." तिच्या पाठोपाठ उमा खोलीत शिरली. उमाला पाहून वंदुला आनंद झाला.

"कधी आलीस गं? बरी आहेस ना?"

"परवा आले. सकाळी आईने सांगितले म्हणून आले तुला भेटायला." बाळ झोपले होते, त्यामुळे दोघींचे बोलणे सुरू झाले.

"दाजी आले होते का बाळाला बघायला?" तिने हा प्रश्न विचारला आणि वंदुच्या डोळ्यांना धारा लागल्या. उमा उठून तिच्याजवळ गेली व तिचे डोळे पुसत तिचे सांत्वन करू लागली. तेवढ्यात वंदुची आई चहा घेऊन आली. वंदुला रडताना पाहून म्हणाली,

"हजारदा सांगिटलंया रडायचं न्हाई म्हनून. रडून काय फरक पडनार हाय का? यकदा शरीरात वात शिरला तर तुलाच निस्तराय लागंल. ना यिऊदे कुनी. आमी तर तुला टाकनार न्हाय. बाळातपन म्हंजी पुनर्जनम असतुया बाईचा. कुनाचा बी इचार करायचा न्हाय. उमा तू तरी सांग बया तुज्या मैतरनीला समजून."

उमाने मान हलवली. वंदुला आलेला उमाळा जरा कमी झाला होता. आईने तिच्या हातात चहाचा कप ठेवला व दुसरा कप उमाला दिला. वंदुच्या शेजारी बसत उमाने चहाचा कप तोंडाला लावला. तिला हळुवार शब्दांत समजावत उमा तिच्याशी बोलत राहिली. वंदुचा हात हातात घेऊन ती प्रेमाने म्हणाली,

" आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. तुझ्या सासरची माणसं आली नाहीत तरी हरकत नाही. तू पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न कर, तुला नोकरी लागेल. हिरकणी आपल्या बाळासाठी एवढा अवघड गड उतरून गेली, मग तू का करू शकणार नाहीस? सासरच्या माणसांचा विचार डोक्यातून काढून टाक. तुझ्या व मुलींच्या भविष्याचा विचार करायचा आता."

हे ऐकून वंदू जरा शांत झाली. थोड्यावेळाने बाळ जागे झाले म्हणून वंदुने तिच्या मांडीवर दिले.

"नको नको, मला सवय नाही एवढ्या छोट्या बाळाला घेण्याची." उमा म्हणाली.

"आता स्वतःचं येईल पंधरा दिवसांत, मग ते कोण घेणार आहे मांडीवर?" हे वंदुचे बोलणे ऐकून ती खुदकन हसली. बाळाकडे कुतुहलाने पाहू लागली. ते बाळाचे छोटे छोटे हात, पाय, डोक्यावरचं भरगच्च जावळ पाहून तिला छान वाटले. तिने बाळाची बंद मूठ उघडण्याचा प्रयत्न केला, पण बाळ पुन्हा मूठ आवळत होते. बाळाकडे पाहून उमा म्हणाली,

"नक्षत्रासारखी आहे पोर. तिच्याकडे नीट लक्ष दे. सारखी रडत बसू नकोस. समोर आलेल्या परिस्थितीला स्वीकारून पुढे चालायचे. हार मानायची नाही."

हे ऐकून वंदूने मान हलवली. बाळाकडे पाहत उमा म्हणाली,

"बाळाची आई जरा वेडीच आहे ना? समजतच नाही तिला. जरा माझ्याकडं बघ म्हणावं. मी कशी हसते तशी हसत रहा." हे ऐकून वंदू हसली.

बाळाला तिच्याकडे देऊन उमा परत निघाली. शरयू तिची वाटच पाहत होती. उमा तिच्या आज्जीला सांगून शरयूला घेऊन तिथून निघाली.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."