Login

हे बंध रेशमाचे... भाग २१

एकत्र कुटुंबाची कथा

हे बंध रेशमाचे भाग २१

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

सिस्टरने बाळ तिच्या कुशीत आणून ठेवले. बाळाकडे कृतार्थतेने पाहत असताना ते मुलगा आहे की मुलगी याच्याशी तिला काहीही देणेघेणे नव्हते. आता पुढे...

आई आत आली. बाळाला हातात घेऊन तिने आपल्या हृदयाशी अशा पद्धतीने घट्ट धरले की तिच्या हृदयाशी बाळाचे हृदय जोडले जाईल. थोड्यावेळाने तिने बाळाला खाली ठेवले. हे सिस्टरने पाहिले. तिने विचारले,

"मावशी, तुम्ही असे का केले?"

"बाळ जन्माला आल्याव ज्येच्या हृदयाबर बाळाचं हृदय जोडलं जातं, बाळ तसंच हुतं."

"काहीही हं मावशी तुमचे. असं कुठं असतं का?"

"आस्तं. आमची समदी बाळातपनं घरातच झाली. सुईन इचरायची, बाळ कुनासारकं झालं पायजे त्येनं बाळाला छातीशी धरा."

आईच्या बोलण्यावर हसत सिस्टर बाहेर गेली. आईने उमाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या स्पर्शामागची माया तिला आज जरा जास्तच जाणवली‌. तिने हसून आईकडे बघितले.

"पोरगी अक्षी बापावर गेलीया. नाक, डोळं समदं अक्षी बापावानी हाय." हे आईचे उद्गार ऐकून तिला आपल्याला मुलगी झाली आहे हे समजले. आत्याबाईंचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला, पण आज तिला भीती वाटली नाही. बाळाचा स्पर्श तिला बाकी काही सुचू देत नव्हता.

बाबा, दाद्या तिला व बाळाला बघून बाहेर गेले. आईने तिला झोप असे सांगितले व बाळाला पाळण्यात टाकून तीही बाहेर गेली.

"वसंता, दुकानातनं बर्फी घे किलोभर, आन् उमाच्या सासरी दिऊन ये. सांग पोरगी झाली म्हनून."
आईने दाद्याला उमाच्या सासरी ही बातमी कळवायला पिटाळले.

दवाखान्यातून पाचव्या दिवशी घरी सोडले. त्या चार दिवसांत सासरहून कुणीही आले नव्हते. आईने पाचवीची सगळी तयारी केली होती. आज उमाच्या सासुबाई पाचवीची पूजा करण्यासाठी येतील म्हणून आईने स्वयंपाक लवकरच उरकला होता. आळीतल्या पाच पोरींना हळदीकुंकवाला बोलावले होते. त्यांची पूजा करून झाली तरी उमाच्या सासरच्या कुणाचा पत्ता नव्हता.

उमाने आईला सांगितले,

"तू पूजा करून घे. सासरहून कुणीही येणार नाही. आले तर परत पूजा करता येईल." नाईलाजाने आईने पूजाविधी करून घेतले.
कुणीही आले नाही याचे घरातील सर्वांना वाईट वाटले, पण उमाने ते गृहीत धरले होते. आत्याबाई आल्या नाहीत याचे तिला फारसे काही वाटले नाही, पण नवरा आला नाही याचे मात्र वाईट वाटले. आईचे ऐकणाऱ्या मुलाकडून यापेक्षा वेगळे काय अपेक्षित आहे अशी तिने मनाची समजूत घातली.

त्यानंतरच्या रविवारी दाद्या घाईघाईने आत आला व तिला म्हणाला,

"अगं दाजी आलेत." तिचा विश्वास बसला नाही, पण आईने दाद्याला सांगितलेले तिने ऐकले,

"वसंता, पावण्यास्नी म्हणाव बादलीतल्या पाण्यानं पाय धून आत या. लांबनं आलायसा, तसंच घरात यिऊ नगा. लहान बाळ हाय घरामंदी."

थोड्यावेळाने नवऱ्याचा आवाज कानावर पडला आणि तिला हायसे वाटले.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all