Login

हे घर पण तुमचंच आहे भाग १

एका विहिणीने दुसऱ्या विहिणीला दिलेला विश्वास
हे घर पण तुमचंच आहे भाग १

"आई तुला आमच्या ग्रुपमधला सुमित कसा वाटतो ग?"

"कसा वाटतो म्हणजे! तुझ्या इतर मित्रांसारखाच वाटतो."

"आई तुला ना काही कळतंच नाही. इतर मित्रांपेक्षा हा वेगळा नाही वाटत का?"

खरं तर सुमेधाला नेहा कोणत्या अर्थाने विचारते त्याचा रोख कळला होता. पण तिला नेहाच्याच तोंडून ऐकायचं होतं म्हणून तिने काही कळत नसल्याचा आव आणला होता. सुमेधाला नेहाच्या इतर मित्र मैत्रिणींपेक्षा सुमित खूपच आवडायचा. स्वभावाने तो खूपच चांगला होता. कधीही कोणाला दुखवायचा नाही. पूर्ण ग्रूपमध्ये तो खूप समजूतदार होता. शिवाय दिसायला देखणा होता. त्याचं आणि नेहाचे एकमेकांवर खूप प्रेम असल्याचं सुमेधाला जाणवलं होतं. सुमितचे बाबा एक नावाजलेले वास्तू शास्त्रज्ञ होते. मुख्य म्हणजे त्याच्या घरी त्याचे आजी आजोबा होते. त्यांच्या संस्कारात तो लहानाचा मोठा झाला होता. त्याची आई पेशाने शिक्षिका होती. केवळ मुलांना शिकवण्याच्या उदात्त हेतूने ती नोकरी करत होती. सुमेधाला नेहमीच वाटायचं की आपल्या नेहाला हा जोडीदार म्हणून लाभला तर ती खऱ्या अर्थाने सुखी होईल. सुमेधाच्या चेहऱ्यावरील भाव पाहून नेहाने थेटच विचारले,

" अगं जावई म्हणून तुला सुमित कसा वाटतो?" आणि नेहा चक्क लाजली.

"अगं बाई माझी लेक स्वतःसाठी जोडीदार शोधण्याएव्हढी मोठी झाली तरी कधी? आणि काय गं गधडे, सरळ सरळ सांग ना तुला सुमित आवडतो ते. खरं सांगू का मी तुझ्या बाबांना त्याच्या घरी तुझं स्थळ घेऊन जायला सांगणारच होते अर्थात तुझ्या मनाचा कौल घेऊन."

" आई त्याची काही गरज नाही. सुमितचे आई बाबाच तुम्हाला भेटायला येणार आहेत. तू आधी बाबांशी बोल आणि मग ठरवा त्यांना कधी बोलवायचे ते. आता आम्ही दोघेही नोकरीत पण सेटल झालो आहोत. सुमित काही वर्ष नोकरी करून नंतर बाबांच्या व्यवसायात लक्ष घालणार आहे."

"बापरे तुमचं तर सगळं ठरलं आहे. लबाड उगाचच विचारण्याचं नाटक करतेस ना!"

नेहा आणि सुमित कॉलेजमध्ये असल्यापासूनच एका ग्रूपमध्ये होते. कॉलेज संपल्यावर पण ते सर्व अधूनमधून भेटत होते. नेहाला तो दिवस आठवला जेव्हा समीरने पहिल्यांदाच त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं. ग्रुप मधल्या एका मैत्रिणीचे लग्न होते. त्या दिवशी नेहाने अंजिरी रंगाची सिल्कची साडी नेसली होती. अटकर बांध्याची, गव्हाळ वर्णाची नेहा साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिचे रेशमी सरळ केस तिने पाठीवर मोकळे सोडले होते. मोत्यांचा सेट घातला होता. त्यातले डूल बोलताना एका लयीत डुलत होते. ती हालचाल खूप मोहक दिसत होती. ती हॉल मध्ये आली तेव्हा सुमितची नजर तिच्यावरून
हटतच नव्हती. पावणे सहा फूट उंची, सावळा वर्ण, कोरीव दाढी, बोलके डोळे असलेला सुमित पण खूप राजबिंडा दिसत होता. त्याने ग्रे कलरचा ब्लेझर घातला होता. काही क्षण नेहा आणि सुमित एकमेकांकडे पाहतच राहिले.

सगळे जण गप्पा गोष्टी करत असताना सुमित नेहाला म्हणाला,

"चल नेहा तिथे तुझे एकटीचे फोटो काढतो."

नेहाला पण त्याच्या सहवासात रहायचे होते. ती लगेच तयार झाली. त्यावेळी सुमितने आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केलं.

"नेहा तुला आयुष्यभर मी तुझे फोटो काढलेले आवडेल का?"

"म्हणजे तू आता फोटोग्राफर होणार की काय!"

"नेहा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे."

"अरे सुमित हे एक वाक्य बोलायला किती दिवस लावलेस. मी कधीची वाट बघत होते."

दोघांच्याही घरून लग्नाला परवानगी मिळाली आणि दोन महिन्यांनी त्याचं लग्न करायचं असं ठरलं. लग्नाची तारीख ठरल्या दिवसापासूनच सुमेधाच्या मनात एक अनामिक भीती होती. सर्व काही आलबेल असताना सुमेधाच्या मनात तिच्या जावेने सांगितलेला किस्सा घर करून होता.

(असा कोणता किस्सा सुमेधाच्या जावेने सांगितला होता की ज्यामुळे सुमेधाच्या मनात अनामिक भीती होती पाहूया पुढील भागात)