हे घर पण तुमचंच आहे भाग २
नेहा आई बाबांची एकुलती एक लेक अगदी लाडाकोडात वाढलेली. तशी तीला घरातली कामं करायची आवड होती. परंतु नंतर तिला करायचंच आहे म्हणून सुमेधा शक्यतो तिला कोणतंही काम करू देत नव्हती. नेहाच्या सासरचे सगळेच खूप समजूतदार होते. तरीही सुमेधाला वाटायचे सुरुवातीला सगळेच छान वागतात. नंतर एकेकाचा स्वभाव कळायला लागतो. नेहाचा संसार सुखाचा होईल ना. तिथे तिचा निभाव लागेल की नाही असे उलटसुलट विचार तिच्या मनात यायचे. त्याचं कारण तिच्या जावेच्या म्हणजेच नीताच्या नंदिनीच्या बाबतीत घडलेला प्रसंग होता.
नंदिनीचा पण प्रेमविवाह झाला होता. नीताचे व्याही आणि विहिणबाई खूप चांगल्या स्वभावाचे होते. दोन्ही कुटुंबात खूप छान घरोबा निर्माण झाला होता. नीता आणि तिचा नवरा नितीन यांचं बऱ्याच वेळा नंदिनीच्या घरी येणं जाणं होतं. खूप छान गप्पाटप्पा व्हायच्या. कधी ते सर्व नीताच्या घरी यायचे.
एक दिवस असेच नीता आणि नितीन नंदिनीच्या सासरी गेले होते. जेवणं झाली आणि सर्व गप्पा मारत होते. बोलता बोलता नितीनच्या तोंडून चुकून आमच्यात तुमच्यात असं काहीतरी जातीवाचक बोललं गेलं. क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि नंदिनीचे सासरे तिच्या बाबांना वाटेल तसे बोलू लागले. मग ह्यांचा आवाज पण चढला. नंदिनीची सासू तिच्या बाबांना म्हणाली,
"मुलीच्या सासरी कसं वागायचं ते पण तुम्हाला कळत नाही का? तुम्ही तुमच्या घरी काहीही करा. इथे नीट वागायचं." नंदिनीच्या बाबांचा अपमान झाल्यावर ते म्हणाले,
"आता इथे पाय पण ठेवणार नाही."
नंदिनीचा नवरा पण तिच्या बाबांना लागेल असं बोलला. बिचारी नीता काहीच बोलत नव्हती. दोघांच्या आई बाबांमुळे नंदिनी आणि तिच्या नवऱ्यामध्ये पण वाद झाला. तिच्या बाबांचा अपमान झाला म्हणून ती दुखावली गेली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये कडवटपणा निर्माण झाला तो कायमचाच. नंदिनी माहेरी एकटीच येऊन जायची.
ह्या प्रसंगामुळे सुमेधाने ठरवलं होतं की नेहाचे सासू सासरे कितीही चांगले असले तरी थोडं अंतर राखूनच वागायला हवं. नेहा आणि सुमितचे थाटामाटात लग्न झालं. सुमितचे आजी आजोबा पण खूप प्रेमळ होते. लग्नात सुमितच्या घरातील सर्वच जण नेहाच्या नातेवाईकांशी अदबीने वागत होते. स्मितहास्याने बोलत होते. नेहाचे सर्व नातेवाईक तिच्या सासरच्या मंडळींवर खुश होते. लग्न आणि त्यानंतरच सारे विधी आटोपल्यावर एक दिवस सुमेधा समीरला म्हणाली,
"नेहाच्या सासरची माणसं सगळी चांगली असली तरी आपण त्यांच्याशी वागताना मोजून मापून वागलेलं बरं. माझ्या मनात कायम नंदीनीच्या सासरी घडलेला प्रसंग असतो आणि एक अनामिक भीती माझं मन खात असते."
"सुमेधा तू थोडी वेडी आहेस का. सगळ्याच माणसांना एकच तराजूत तोलू नकोस. तिथे घडलं तसंच आपल्या बाबतीत घडेल असं नाही ना"
समीरने समजावल्यावरसुद्धा सुमेधा सावधगिरीने वागत होती. विहिण बाई रागिणीला सुमेधा नेहमी रागिणी ताई म्हणायची. नेहाच्या सासरी जाणं येणं झालं तरी मोजके च बोलायची. रागिणीने तिला त्याबाबत सांगितलं सुद्धा. ईतकंच काय तर दोन तीन वेळा त्या सुमेधाला म्हणाल्या की मला रागिणीच म्हण. पण सुमेधा आपल्या मतावर ठाम होती. काही दिवसांनी नेहाच्या घरी एक कार्यक्रम होणार होता म्हणून रागिणीने सुमेधाला फोन केला,
"सुमेधा तुला नेहा बोललीच असेल ना येत्या दहा तारखेला आपल्या घरी एक घरगुती स्नेहभोजन आहे त्याचं आमंत्रण द्यायलाच मी फोन केला आहे. दुसरं म्हणजे तू आणि समीर भाऊजींनी
आदल्या दिवशीच यायचं आहे."
आदल्या दिवशीच यायचं आहे."
"रागिणीताई आम्ही दहा तारखेलाच येऊ. घरी इतर नातेवाईक पण असतील ना."
"हे बघ सुमेधा बाकी सगळ्यांना मी त्या दिवशीच बोलावलं आहे. आपली चांगली ओळख व्हावी म्हणून फक्त तुम्हाला आदल्या दिवशी बोलावलं आहे."
"अहो आम्ही पूर्ण दिवस असू म्हणजे आपल्याला बोलता येईल."
"ते काही नाही तुम्ही दोघांनी आदल्या दिवशी यायलाच हवं. अगं मला जरा तुमची मदत लागेल म्हणून तरी या. आणि चांगले दोन दिवस राहण्याच्या बेताने कपडे आणा. मी जरा खात्यापित्या घरची म्हणजे जाडी आहे त्यामुळे माझे कपडे तुला होणार नाहीत. नक्की याच. आम्ही वाट पाहतोय. नेहाला पण आनंद होईल."
रागिणी ताईंच्या आमंत्रणामुळे सुमेधाची द्विधा मनःस्थिती झाली. ती समीरला म्हणाली,
"आता काय करायचं? त्या म्हणाल्या आपली त्यांना मदत हवी आहे म्हणजे आपल्याला जावं लागेल नाहीतर त्यांना वाटेल की मदतीला आपण नाही म्हणतोय."
"अगं आपण जाऊया. तू निश्चिंत रहा. आपल्याला पण थोडा बदल मिळेल. शिवाय नेहाचा सहवास मिळेल. तिला सुद्धा आनंद होईल."
(नेहाच्या सासरी सुमेधाला कसा अनुभव येईल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा