हे घर पण तुमचंच आहे भाग ३
ठरल्याप्रमाणे सुमेधा आणि समीर नेहाच्या सासरी आले. सुमेधाने समीरला आधीच तंबी देऊन ठेवली की तिथे उगाच अघळपघळ वागू नका. सकाळी अकराच्या सुमारास दोघे तिथे पोहोचले. दारात रागिणी ताईंनी दोघांचे हसतमुखाने स्वागत केले. त्यांचा आवाज ऐकून नेहा, सुमित आणि तिचे सासरे बाहेर आले. नेहाने आईबाबांना मिठी मारली आणि दोघांनी आई बाबांना वाकून नमस्कार केला. सुमेधाचे डोळे पाणावले. लगेचच रागिणी ताईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. सुमेधाला त्या स्पर्शात खूप माया आणि आधार जाणवला. इतक्यात सुमितचे आजी आजोबा बाहेर आले. सुमेधा आणि समीर त्यांना वाकून नमस्कार करू लागले. आजींनी दोघांना प्रेमाने जवळ घेतले.
नंतर चहापाणी झाल्यावर थोड्या गप्पाटप्पा झाल्या. सुमेधा थोडी अवघडल्यासारखी वाटत होती. सुमितची आजी ते ओळखून वातावरण हलकं करण्याच्या उद्देशाने म्हणाली,
"सुमेधा तू नेहाच्या सासरी आली आहेस. अगदी नवीन नवीन तुझ्या सासरी आल्यासारखी अवघडलेली का वागतेस?"
ह्या वाक्यामुळे सुमेधासह सगळेच हसायला लागले. सुमेधाने रागिणी ताईंना विचारले,
"रागिणीताई मी आधी भाज्या निवडायला घेऊ का?" त्या लटक्या रागाने तिला म्हणाल्या,
"सुमेधा मी तुला किती वेळा सांगितलं की मला फक्त रागिणी म्हणायचं. माझ्या नावापुढे ताई लावून तू मला जाणीव करून देतेस का मी तुझ्याहून मोठी आहे. आता ताई म्हणालीस तर मी बघणारच नाही. आणि अगदी आल्या आल्या कामाला लागायची गरज नाही. कमलाबाईंनी ते काम करून ठेवलं आहे."
"बरं मी दुसरं काही करू का?"
"सुमेधा अशी परक्यासारखी विचारतेस काय! तुला जे पण करावंस वाटतंय ते बिनधास्त कर. अगदी तुझ्या पद्धतीने कर. मला पण नवीन काहीतरी शिकायला मिळेल." रागिणी समजुतीच्या सुरात म्हणाली.
"बरोबर आहे तुझं. पण लेकीच्या सासरी त्यांच्या पद्धतीने करायला हवं ना. उगाच अगोचरपणा करून कसं चालेल?"
"सुमेधा काय म्हणालीस तू! लेकीच्या सासरी. अगं हे नेहाचं सासर जरी असलं तरी हे तिचं घरच आहे आणि तिचं घर म्हणजे पर्यायाने तुमचं पण घर आहे."
ह्या वाक्यामुळे सुमेधाच्या मनावरील ताण अजून हलका झाला. तिच्या मनात आलं तरी पण आपण ह्यांच्या रितीभाती जाणून घेऊन त्याप्रमाणेच वागायला हवं. त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला तरीही आपण काळजी घ्यायला हवी. तिने समीरकडे हळूच पाहिले. तो गालातल्या गालात हसत होता. जणू काही तो सांगत होता मी सांगितलं ना सगळीच माणसं सारखी नसतात. इतक्यात सुमेधाला गप्प बसलेली आणि समीरकडे पाहत असलेली पाहून रागिणी म्हणाली,
"अगं तू भाऊजींकडे काय पाहतेस. मी म्हणाले ते अगदी खरं आहे. अगं ह्या घरची हीच परंपरा आहे. मी लग्न होऊन ह्या घरात आले तेव्हा आईनी मला पहिल्या दिवशीच हे सांगितलं. जेव्हा माझे आईबाबा पहिल्यांदा घरी आले तेव्हा त्यांना आईनी सांगितलं की हे घर पण तुमचंच आहे. आता माझे आई बाबा कधीही येतात. ते दोघं आणि हे दोघं कुठे कुठे फिरायला पण जातात."
"हे सगळं ऐकून खूप छान वाटलं."
सुमेधाची री ओढत समीर म्हणाला,
"खरंच नाती अशीच असायला हवीत. हल्ली तर रक्ताच्या नात्यांमध्ये पण हेवेदावे असतात."
"खरं तर तुम्हाला दोघांना आदल्या दिवशी बोलावण्याचा हाच उद्देश आहे. आता आपण चौघे पण नेहमी भेटायचं. कधी बाहेर, कधी घरी. कधी ट्रीपला जायचं. त्यामुळे सुमित आणि नेहाला पण थोडी प्रायव्हसी मिळेल. आपल्यातल्या चांगल्या संबंधांमुळे त्यांचे रेशमी बंध पण मजबूत होतील."
"रागिणी खरं सांगू का आता माझ्या मनावरचं दडपण पूर्णपणे उतरलं आणि मनोमन पटलं ह्या घरात नेहा नेहमीच खुश, सुखी राहील."
"सुमेधा तू काळजीच करू नकोस. नेहा आमची लेक आहे. अगं पूर्वीच्या काळी मुलीच्या सासरी असं करायचं नाही, तसं करायचं नाही असं सगळं होतं. अर्थात हे सर्व आपल्यावर असतं. म्हणून तर आमच्या आई बाबांनी त्यावेळी सुद्धा माझ्या आईबाबांना विश्वास दिला. हल्ली सुद्धा काही जण आपण मुलाकडचे म्हणून आयुष्यभर तोरा मिरवतात आणि मुलीच्या माहेरच्यांना कायम कमी दर्जा दिला जातो. हल्ली बऱ्याच ठिकाणी एक अथवा दोन अपत्य असतात. अशा वेळी हेवेदावे करण्यात काहीच अर्थ नसतो. प्रत्येक लेकराला आपले आईबाबा प्रिय असतात. माझे आईबाबा, तुझे आईबाबा ह्यावरून त्यांच्यात कडवटपणा यायला नको. म्हणून समोरच्यांनी त्यांना योग्य आदर आणि प्रेम दिलंच पाहिजे."
"रागिणी वाहिनी तुम्ही अगदी लाखातलं बोललात. सर्वांनी असा विचार केला तर लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला पण सासू सासऱ्यांबद्दल आदर आणि विश्वास वाटेल."
"त्यामुळे सुमेधा आणि समीर भाऊजी आता तुमच्या लक्षात आलं ना की हे घर पण तुमचंच आहे."
इतक्यात सुमित आणि नेहा बाहेर आले आणि एकदमच बोलले,
"आता दोन्ही घरात असाच जिव्हाळा कायम राहील. काही कार्यक्रम नसतानासुद्धा आपण सगळ्यांनी ठरवून एकत्र यायचं बरं का!"
समाप्त
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा