हे जीवन सुंदर आहे! (भाग १)
जुलै महिन्यातला दिवस होता. सकाळी सकाळी एक पावसाची सर येऊन गेली होती. हवेत एक वेगळाच गारवा होता. आभाळात काळ्या ढगांचा पाठ-शिवणीचा खेळ सुरू होता. त्यात कधी मध्येच सूर्य नारायण डोकावत होता. कम्पाउंड वॉलच्या बाहेरचा गुलमोहर अगदी दिमाखात उभा होता. गुलमोहराची अर्धी फुलं गळून पडली होती, त्याजागी हिरवीगार पानं आली होती. खाली हिरवीगार पानं आणि वर केशरी-लाल रंगांची फुलं… गुलमोहराचं हे रूप मानसीला फार आवडायचं. मानसी गॅलरीतून वातावरणाचा आनंद घेत होती. तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं.
"बापरे! उशीर होईल पुन्हा!" स्वतःशीच पुटपुटत ती आत आली.
"स्वरा… ए स्वरा… अगं उठ ना. किती वाजलेत बघ? आवरेपर्यंत बस यायची वेळ होईल. स्वरा… उठ लवकर." मानसी आपल्या लाडक्या लेकीला, स्वराला झोपेतून उठवत होती.
"ए आई, थांब ना गं… दोनच मिनिटं झोपू दे ना." स्वरा तोंडावर पांघरूण ओढत बोलली.
"काही दोन मिनिटं वगैरे नाही. उठ आता. पुन्हा उशीर झाला ना तर मला बोलू नको." मानसीने स्वराच्या तोंडावरचं पांघरूण ओढून काढलं.
"आई तू पण ना… दोन मिनिटं तर म्हटलं होतं मी." स्वरा मानसीच्या गळ्यात हात टाकत लाडिकपणे बोलली.
"पुरे पुरे… आता माझ्या अंगावर आळस नको टाकू. चल, आवर लवकर. पांघरुणाची घडी घालून ठेव." मानसी.
"ए आई… तू घाल ना गं घडी, प्लिज." स्वराचं आळस देणं सुरू होतं.
"आता एवढं लेकरू प्लिज म्हणतंय तर पांघरुणाची घडी घाल की." तिकडून राघव बोलला.
"तू तुझ्या पांघरुणाची घडी घातलीस का? की आला तसाच उठून? मला माहितीये नक्कीच घातली नसशील." मानसी.
"स्वरा, दुर्गा माता जागृत व्हायच्या आधी पांघरुणाची घडी घाल बघू, मी पण घडी घालून आलो." राघव मानसीला चिडवत आत गेला.
"हो बाबा, दुर्गा माता जागृत झाली तर उगी अजून बोलणे बसतील." त्याचं बघून स्वराही मानसीला चिडवू लागली.
"दोघं बाप-लेक सारखेच. कधी कोणत्या गोष्टीचा आळस करतील आणि कधी कोणत्या गोष्टीवरून चिडवणं सुरू करतील काही सांगता येत नाही." स्वतःशीच बडबड करत मानसी स्वयंपाकघरात आली. तयार केलेला उपमा तिने प्लेटमध्ये वाढला. त्यावर छान कोथिंबीर टाकली, बाजूला एक लिंबाची फोड ठेवली. प्लेट्स् डायनिंग टेबलवर ठेवल्या आणि त्रिशलाबाईंना आवाज दिला; देवघरात पोथी वाचत बसलेल्या त्रिशलाबाई डायनिंग टेबलवर येऊन बसल्या. त्रिशलाबाईंना सगळे "माई" म्हणायचे. मानसी पुन्हा स्वयंपाक घरात गेली, चहा ठेवला, दूध गरम करायला ठेवलं आणि गीताला पुढची कामं समजावून सांगितली. गीता मानसीची कूक, मदतनीस आणि माईंची केअर टेकर म्हणून दिवसभर घरी राहायची. माई सत्तरीच्या जवळपास होत्या; पण तब्येतीने चांगल्या धडधाकट होत्या. माईंना सोबत म्हणून गीता दिवसभर असायची.
राघव आणि स्वरा डायनींग टेबलवर येऊन बसले. मानसीने उपम्याची प्लेट त्यांच्याकडे सरकवली.
"शी sssssss! काय गं आई, परत उपमा केलास. कधी तरी कॉर्न फ्लेक्स् वगैरे देत जा ना. माझ्या सगळ्या मैत्रिणी कॉर्नफेक्स् चा नाश्ता करून येतात." स्वरा नाक मुरडत बोलली.
"काय धड लागतं गं ते. त्यापेक्षा आपले तळलेले मक्याचे पोहे तरी चांगले लागतात. गीते, अगं हिला जरा मक्याचे पोहे दे तळून." माई.
"ए आजी, मक्याचे पोहे वेगळे अन् कॉर्नफ्लेक्स् वेगळं. कॉर्नफ्लेक्स् दुधात मिसळून खात असतात." स्वरा.
"हो हो. माहितीये मला. चव ना धव त्याला. उगी पेशंट असल्यासारखं वाटतं ते खाल्ल्यावर. त्यापेक्षा हा आपला उपमाच बरा. किती चव आहे तुझ्या आईच्या हाताला!" माई उपम्याचा घास घेत बोलल्या.
"एक… एक मिनिट माई, तू कधी कॉर्नफ्लेक्स् खाल्लंस?" राघव.
"ते खाल्लं होतं एकदा. त्या टी. व्ही. वर खूप जाहिरात येत होती. म्हटलं खाऊन तर बघावं. मग गीताला दुकानात पाठवून आणलं." माई जीभ चावत बोलल्या.
"माई, कशाला उगी नसत्या उठाठेवी करता!" मानसी.
"मग एकटा म्हातारा जीव काय करणार दिवसभर घरात? राघवचं ऑफिस असतं, स्वराची शाळा आणि तुझ्या मागेही बाकीची कामं असतात. आता काय? वय झालंय…! म्हटलं स्वर्गात जायच्या आधी खाऊन बघावं कसं लागतं ते. उगी मरताना पुन्हा वाटायला नको "हे खायचंच राहिलं ", म्हणून खाल्लं… बेचव एकदम!" माई.
"पुरे झालं ब्लॅकमेल करणं. चला पटापट नाश्ता करा. स्वरा, वेण्या घालायच्या बाकी आहेत अजून. बसची वेळ होईल." मानसी बोलत होती. सगळ्यांनी आपला चहा नाश्ता उरकला.
"किती तो गुंता! थोडं तेल लावते थांब." मानसी स्वराचे केस विंचरत बोलत होती.
"नको… नको… तेल नको लावू. तसेच विंचर. सगळ्या पोरी मग चिप्पू चिप्पू म्हणून चिडवतात. तसं पण तू सॅटर्डेला रात्री लावतेस ना तेल. आता नको लावू प्लिज." स्वराचं भणभण करणं सुरू होतं. मानसीने तिच्या लांबसडक काळ्या केसांच्या मस्त दोन वेण्या घालून दिल्या. स्वराची शाळेची तयारी सुरू होती. राघव पेपर वाचत बसला होता.
"स्वरा… आवरलं का? चल पटकन… ही घे टिफिन बॅग… सगळा टिफिन संपवायचा बरं… आणि ही छत्री, पावसात भिजू नको." मानसीचं स्वराला सांगणं सुरू होतं. तोपर्यंत स्वराने शूज वगैरे घातले. मानसी स्वराची टिफिन बॅग घेऊन तिच्यासोबत निघाली.
"आई दे ती बॅग इकडे. तू राहू दे गं… माझं मी जाते ना." स्वरा.
"अगं येते की बसपर्यंत… चल... " मानसी.
"अगं, जाते मी. जाऊ दे मला एकटीला. मी काय लहान राहिले का आता?" स्वरा.
स्वरा स्कूलबसमध्ये चढेपर्यंत घराच्या गेटमधून मानसी तिच्याकडे बघत होती. स्वरा शाळेत गेली आणि मानसी घरात आली. राघव बेडरूममध्ये ऑफीसला जायची त्याची तयारी करत होता. आरशात बघून टायला नॉट पाडायचे त्याचे व्यर्थ प्रयत्न सुरु होते.
"राघव, मला आजकाल असं वाटतंय की स्वरा मला टाळतेय." मानसी त्याची टायची नॉट बांधत बोलत होती.
"म्हणजे?" राघव.
"म्हणजे बघ आधी मी तिला स्कूलबसमध्ये बसवायला जायचे तिला किती आवडायचं ते. आता सोबत येऊ नको म्हणून हट्ट करते. एक महिना झाला, मी रोज बघतेय, जूनमध्ये शाळा सुरू झाली तेव्हापासून तिचं असंच सुरू आहे. गोष्ट फक्त बसमध्ये सोडण्याची नाहीये… अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत… मला वाटतं मी स्वराला आवडत नाही." मानसी.
"कमॉन मानसी, मोठी झालीये ती! दहावीत आहे! तू अजून तिला लहानच समजतेस का? किती दिवस असं तिला तू तुझ्या पंखाखाली झाकून ठेवणार? उडू दे आता तिला, थोडं पडू दे, लागू दे." राघव मानसीला समजावत होता.
"हो. खरंच, मोठी झाली ना स्वरा! किती लवकर! तू म्हणतोस तसंच असावं. माझ्या मनात उगीच शंकेची पाल चुकचुकत होती." मानसी
"हाकलून दे द्या पालीला! स्वरा झाल्यापासून बघतोय, तुला माझ्यासाठी वेळच नसतो." राघव.
"हो का? अजून किती बरं वेळ पाहिजे." मानसी राघवच्या गळ्यात हात टाकत बोलली. तेवढ्यात राघवचा फोन वाजला. तो फोनवर बोलण्यात बिझी झाला.
"अन् मलाच वेळ नसतो म्हणे!" मानसी स्वतःशीच पुटपुटली.
"चला मॅडम, निघावं लागतंय. हा चंदू आला नाही का अजून? हे असं होतं, म्हणून मला ड्रायव्हर नको होता. ज्या दिवशी महत्त्वाचे काम त्या दिवशी नेमका ड्रायव्हर वेळेवर येणार नाही; पण होम मिनिस्टरची आज्ञा सर आँखोपर." राघव.
"हो मग, आज्ञाच! एवढ्या मोठ्या कंपनीचा सी. ई. ओ. झालास. डोक्यामागचं काम वाढलं, नाही का? ही मिटिंग, ती मिटिंग, ऑफिसचं टेंशन वेगळंच. म्हणून म्हटलं ड्रायव्हर ठेव. म्हणजे गाडी चालवायचं टेन्शन नाही; पण म्हणतात ना ज्याचं करायला जावं भलं तो म्हणे माझंच खरं!" मानसी नाक मुरडत बाहेर आली. तोपर्यंत चंदू आला होता. राघव ऑफिसला जायला निघाला.
"चंदू, गाडी नीट चालवायची, जास्त फास्ट चालवायची नाही. सर कितीही म्हटले तरी गाडी सावकाशच न्यायची. मिटिंगला पाच मिनिटं उशीर झाला तरी काही नाही होत. हा सरांचा डब्बा... नीट ठेव. गाडी सर्व्हिसिंग कधी आहे ते बघून करून घे. गाडीच्या टायर ट्यूब मधली हवा तपासून घेत जा…." मानसीचं चंदूला सूचना देणं सुरू होतं.
"अगं, त्याच्यावर तरी दया कर जरा…! चल, निघतो आता. गाडी हवी आहे का तुला? चंदूला माघारी पाठवून देतो हवं असेल तर. तसं पण आज बाहेरच्या मिटिंग्स् नाहीयेत. ऑफिसमध्येच असेन मी दिवसभर." राघव बाहेर निघत बोलत होता.
"तसं बाहेर जायचं आहे मला. पण मी दुसरी गाडी घेऊन जाईल. माई येत असतील तर त्यांना पण नेईन सोबत." मानसी मागे येत बोलत होती. मानसी दारापर्यंत राघवला सोडायला गेली. राघव कार मध्ये बसून निघून गेला. मानसीचं लक्ष दाराच्या बाजूला लावलेल्या नेम प्लेट वर गेलं, सकाळच्या पावसामुळे त्यावर पाण्याचे थेंब होते. मानसीने साडीच्या पदराने ते पाणी पुसले. नेम प्लेट स्वच्छ दिसत होती आणि त्यावरची नावं लक्ख चमकत होती….मोठ्या अक्षरात "सरपोतदार्स्" लिहिलेलं… त्याखाली त्रिशला… राघव… मानसी आणि स्वरा… सगळ्यांची नावे एकाखाली एक...
मानसीने नेम प्लेटवरून मायेने हात फिरवला, एक गोड हसू तिच्या चेहऱ्यावर आलं आणि मानसी घरात आली. गीताला एक कप स्ट्रॉंग कॉफी बनवायला लावली आणि कॉफीचा मग घेऊन ती गॅलरीत येऊन उभी राहिली. तितक्यात पावसाला सुरुवात झाली. पाऊस पण खट्याळ… थोडा तिरपा पडायला लागला. मानसीच्या अंगवार पावसाच्या सरी पडू लागल्या. सुख आणि दुःखाचे संमिश्र भाव मानसीच्या चेहऱ्यावर होते. पाऊस मानसीला खूप आवडायचा… अगदी लहानपणापासून… या पावसाने मानसीला खूप काही दिलं होतं आणि खूप काही ओरबडून घेतलं होतं. तरी मानसीचं पावसावरच प्रेम तसंच होतं…
कॉफी घेत घेत मानसी गुलमोहरकडे बघत होती. तिचा तिच्या मनाशीच संवाद सुरू होता, "गुलमोहरकडून शिकावं रखरखत्या उन्हात फुलणं… पानांचीही साथ नसताना डौलात उभं राहणं… आपण पण कसे असतो ना, संकटांना घाबरतो… पण हीच संकटं आयुष्यात पुन्हा उभं राहायची, पुन्हा बहरण्याची ताकद देतात… म्हटलं तर हे जीवन एक संघर्ष आहे आणि म्हटलं तर याच संघर्षांमुळे हे जीवन सुंदर आहे….!"
क्रमशः
(खरंच स्वरा तिच्या आईला टाळत होती का? की मानसीचा गैरसमज होता. कोण होती मानसी? काय घडलं होतं तिच्या आयुष्यात? जाणून घेण्यासाठी वाचत राहा… हे जीवन सुंदर आहे …!)
प्रिय वाचक,
"मधुरीमा"वर भरभरून प्रेम केलंत त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार. आजपासून ही एक नवीन कथामालिका सुरू करतेय, मधुरीमा प्रमाणेच या कथामालिकेवर प्रेम कराल ही आशा करते. कसा वाटला आजचा पहिला भाग, नक्की सांगा. आवडला तर like आणि comment नक्की करा. तुमचं एक लाईक, एक कमेंट लिखाणाची प्रेरणा वाढवणारं आहे.
© ® डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा