आदरणीय लेखिका हेमा पाटील : शब्दांना मृदगंधाची किनार ..!!
प्रचंड उन्हामुळे वातावरण तापले होते. हवेत उष्णतेच्या लाटा वाहत होत्या. आभाळ हळूहळू काळे होत होते. भेगाळलेली जमिन पाण्यासाठी तरसली होती. अचानक विजेंचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होतो. सोसाट्याचा वारा सुटतो. मेघगर्जनेसह पावसाला सुरवात होते. धुवांधार पाऊस पडतो. धरती तृप्त होते. जमिनीला चांगला वाफसा येतो आणि सर्जा राज्याची पावले धरतीला लागतात. भेगाळलेली जमिन आता खुसखुशीत होते. नांगरट होऊन जमिनीची मशागत होते. शेतकरी आता दिमाखात पेरणीसाठी सज्ज होतो. जमिनीत धान्य पेरलं जातं आणि ज्या मायेनं , कष्टानं जमिनीची सेवा केली जाते त्या मातीतून नवा अंकुर जन्म घेत होता. तो शेतक-यांच्या उभ्या आयुष्याला नवी आशा देत होता.त्यामुळे त्याचं घर धान्यानं भरणार होतं.अशीच समृद्ध मनाची मशागत केली असता लेखणीतून प्रतिभेला नवे अंकुर फुटतात व अजरामर साहित्यकृती जन्माला येते. अशाच शेतीतून लेखनकला जपणा-या आदरणीय हेमा पाटील या नवलेखकांना प्रेरणा देणाऱ्या लेखिका आहेत.
शेतीची प्रचड आवड,मातीशी नाळ जोडलेली ,इथल्या कणाकणात मन रमलेलं असलेमुळे शेतातील पिकाबरोबर प्रेमळ नातं निर्माण होते. हेमाजी या स्वतः शेतीत काम करत असून ऊस , भात व फळझाडे यामध्ये नव्या तंत्रांच्या साहाय्याने त्या शेती करतात.मातीचा गंध त्यांना वेड लावतो त्यातूनच त्याचा परिस्पर्श लेखणीशी होतो आणि शब्दांचा सुरेल प्रवास सुरु होतो. मातीशी इमान राखणारे शब्द बेमालुपणे बरसतात आणि वाचकांना समृद्ध करतात. सकाळी शेतात फेरफटका मारायचा , थकल्या भागल्या जीवाला जरा विसावा घ्यायचा आणि प्रतिभेतून फुललेल्या शब्दातून कथा , कविता लिहायच्या असा दिनक्रम म्हणजे हेमाजी यांची माती व लेखणी यांचे अजोड नाते. लेखनाच्या निरंतरतेतून ईरा व्यासपीठाची ओळख झाली येथूनच त्यांच्या लिखाणाला गती मिळाली.
लेखनातील विविधता जपत त्यांनी ईरावर आपली लेखनसंपदा वृद्धीगंत केली.कानपिचक्या , माहेरचे अंगण ,समझोता,चूक कोणाची,लेक , नणंद सखी,गैरसमज,किस्से सुगरणीचे, स्वप्नपूर्ती,बाबा तुसी ग्रेट हो ,सुखाचे डोहाळे ,निःसंग ,हक्काची परिभाषा ,शोध प्रतिशोध ,घर की मुर्गी, नणंदबाई माझी लाडाची,जाऊबाई जोरात, प्रेमा तुझा रंग कसा ,जावे त्याच्या वंशा, रुममेट , एकदा पहावे मरुन , समर्पण ,लव्हबर्डस् ,कॕनव्हास ,नटरंग अशा कथामालिकेतून व अनेक लघूकथामधून त्यांचा लेखनाचा दर्जेदारपणा स्पष्ट होतो.ओघवत्या भाषेतून लेखनाची निरंतरता स्पष्ट ,शेतीतील विविध गुणांचे लेखनात पडसाद , निवडलेल्या विषयात समरसतेने लेखन,संवादामुळे कथांना वेगळा साज ,समाजातील अनेक विषयांची पद्धतशीर हाताळणी यामुळे त्यांचे लेखन वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
ईराच्या विविध स्पर्धेत त्यांचा सहभाग सक्रिय असतो.जलदकथेत त्यांना बक्षीसस्वरुपात यश मिळाले आहे. अष्टपैलू स्पर्धेत त्यांची घोडदौड चालूच आहे. चॕम्पियन स्पर्धेत त्यांचे लेखन अतिशय उठावदार झाले आहे. नेहमीच हसतमुख असणाऱ्या , सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या , मनमिळावू तितक्याच आपल्या कुटुंबात रमणा-या शेतीशी एकरुपतेने राहून लेखणीचा छंद जपणा-या आदरणीय हेमाजी यांना पुढील लेखनप्रवासासाठी व आरोग्यदायी जीवनासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..!
©नामदेव तुकाराम पाटील
