Login

सरकारी मेहंदी भाग 1

इलेक्शन ड्युटीचा थकवणारा, थरारक तरीही मनोरंजक अनुभव माझ्या रंजक शब्दात
सरकारी मेहंदी 1

ऑक्टोबरच्या 18 तारखेला कळले की परत एकदा आपल्यावर इलेक्शन कमिशन मेहरबान झाले आहे. कशाला खोटं बोलू? खरंच इच्छा तर नव्हतीच परत एकदा तेच दिवसभर उभे रहा, पहाटेपासून जावे ते रात्री बे रात्री कधीतरी तीन चार वाजता घरी यावे. काम करता करताच, ज्या हाताने इतरांच्या बोटांना शाई लावतोय, समोर उभी असलेली ती जनता बघूनही आपलं त्याच सरकारी मेहंदी लागलेल्या हाताने कसंतरी पोट भरावं. वर नजर हट्टी की दुर्घटना घटी, म्हणजे चुकीला माफी नाही. तुम्ही एक चूक करा अन गलबला झालाच समजा. तरीही आलेली जबाबदारी लोटून देणाऱ्या मधून आपण नाही असं स्वतःला सांगत जीवाचा हीय्या करून एक एक करून सर्व ट्रेनिंग पार पडले.

बरोबर एकोणवीस नोव्हेंबरला आम्हा चार जणांची, आमच्या टीमची एकमेकांशी प्रथम गाठ पडली. सर्व बरेच उत्साही दिसत होते. त्यांना पाहून माझ्यातही उत्साह संचारला. परंतु व्यवस्थापन बघून तो काही क्षणातच कुठल्या कुठे पळूनही गेला. कारण तिथे बांधलेल्या तंबूत मावणार त्यापेक्षा डबल माणसं बायका तिथे आपल्या इलेक्शन ड्युटी साठी जमलेली होती. त्यातील बरीच मंडळी सकाळी सहा सात वाजता पासून तिथे आलेली होती. होईल तसं मिळेल त्या जागी आम्ही जाऊन बसलो. बाजूलाच चहा वाटप सुरू होते. हवेत गारवा असल्यामुळे माझ्या सहकारीने मला चहा घे म्हटले. तिथेच मी चुकले. चहाचा कप हातात घेतला तसं कोणाचा तरी धक्का लागला आणि सर्व चहा अंगावर. आता कपडे बदलण्यासाठी म्हणून घरी जाणे परवडणारे नव्हते. कारण थोड्या वेळातच इलेक्शन साठी लागणारे सामान वाटप केल्या जाणार होते. मी कसंतरी चहा सांडलेला भाग पाणी लावून लावून धुवून घेतला.

दुपारी बारा वाजता आम्हाला सामान मिळाले. आता सूर्य चांगलाच डोक्यावर आला होता. तंबूच्या आत थांबावे तर आजूबाजूला असलेल्या गर्दीत जीव गुदमरू लागला. बाहेर थांबावे तर उन्हाने अंगाची लाही लाही होऊ लागली. शेवटी आमच्या प्रिसायडिंग ऑफिसरने झोनल मॅनेजरला गाठले व कोणत्या बस मध्ये आम्हाला बसायचे आहे ते सांगायची विनंती केली. बस बघताच आमच्या जीवात जीव आला. कारण बसमध्ये एसी होता. आमच्या सोबतच्या इतर पोलिंग बूथ चे मंडळ येताच बस आमची ड्युटी असलेल्या शाळेकडे निघाली. सर्वांनी आपापल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. त्यातून असे कळून आले की कोणालाच ही ड्युटी हवी नव्हती. परंतु आलिया भोगाशी, असे समजून सर्व प्रामाणिकपणे आपली ड्युटी पार पाडायच्या प्रयत्नात होते.

एकदाचे पोहोचलो शाळेत. शाळा बघताच आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर खजिल हसू उमटले. नक्की आम्ही हसतोय की रडतोय हे कोणालाच कळले नाही. शाळेने अगदी आम्हाला नागपूर शहरातून एखाद्या खेड्यात पोहचल्याचा भाव दिला. अगदी कौलारू टीन टाकलेली, सात खोल्यांची, ७०-८० वर्ष जुनी वाटेल अशी शाळा होती ती. मी फक्त एकच प्रार्थना करत होती की शाळेतील धूळ झाडून झुडून स्वच्छ केलेली असावी. कारण मला धुळीची भयंकर एलर्जी. आत्ताच सर्दी खोकला झाला तर उद्याचे काम कसे करणार? मनोमन प्रार्थना करतच आम्ही आमच्या खोलीत गेलो. तर एक वेगळाच गंध तिथे येऊ लागला. सकाळपासून बाथरूमला जाणे झाले नव्हते अन सामान घ्यायला गेलेल्या शाळेत बाथरूम कुठे आहे तेही दिसले नव्हते. म्हणून आधी वॉशरूममध्ये शिरले. एक जुनीच, शाळेची अर्धी खोली टॉयलेट बाथरूम मध्ये कन्व्हर्ट करण्यात आली होती. तिथे खोलीत आलेला गंध आणखी तीव्र झाला. निरीक्षण केले असता असे लक्षात आले की तो गंध टिपिकल फिनाइलचा आहे.

हातपाय धुवून आपल्या पोलिंग टीम जवळ आले. सर्वांच्या पोटात कावळ्यांनी काका सुरू केले होते. बाजूला ठेवलेली एक चटई खाली टाकून आधी पोटोबा करून घ्यायचे आम्ही ठरवले. तो दिवस कधीच विसरणार नाही. खूप छान वाटले चौघेही आम्ही अनोळखी. तरीही आम्हाला बघून कोणीच यावर विश्वास ठेवणार नाही. इतके आम्ही एकमेकांसोबत मिसळलो होतो. चौघांनी अंगत पंगत करून, हसत खेळत जेवण केले. काही वेळेसाठी मी विसरूनच गेले होते की मी इथे कशासाठी आले आहे ते. असे वाटले मी कुठेतरी, गावात पिकनिकलाच आले आहे.

जेवण आटोपल्यावर आम्ही आपले सामान काढले. विविध स्टिकर्स पोस्टर्स काढून ते दिलेल्या सूचनांनुसार खोलीच्या भिंतीवर, आत बाहेर दरवाजावर लावणे सुरू केले तेव्हा तर असे वाटले की जणू काही आम्ही आमचे घरच सजवत आहोत. कोणत्याही कामासाठी आम्ही एकमेकांची वाट बघितली नाही. फक्त चर्चा करायचो की हे कसे करायचे ते कसे करायचे व त्यानुसार काम करत गेलो. सात वाजेपर्यंत सर्व आटोपून आम्ही आजूबाजूला फेरफटका मारून चहा पिऊनही आलो. मग आले महत्त्वाचे काम ते म्हणजे डॉक्युमेंटेशन. आजच करून ठेवले तर वेळेवर पॅनिक व्हायची वेळ येणार नाही असा विचार करून आम्ही दोन्ही मुलींनी आणखी दोन तास देऊन अर्धे डॉक्युमेंटेशन पूर्ण रिसाईडिंग ऑफिसर आणि फर्स्ट ऑफिसरला मदत केली व नऊ वाजता आम्ही घरी येण्यासाठी निघालो.