*ललित लेख*
तिचा संपलेला प्रवास
तिचा संपलेला प्रवास
दीर्घकाळ आजाराने ती पूर्णपणे खंगून गेली होती. खोलवर गेलेले डोळ्या मात्र जिवंत दिसत होते आणि खूप काही सांगून जात होते. मला मात्र तिच्याकडे पाहावलं नाही. अक्षरशः मान खाली घालून घुमणाऱ्या आवाजात ती हळूहळू शब्द बोलत होती. एकेक शब्द महत्कष्टाने बोलत असावी असा भास झाला . मला बरोबर आठवत होतं...तीन वर्षांपूर्वी लग्नाच्या मंडपात सुंदर सजून देखणी अशी तरुणी उभी होती आणि शुभमंगल सावधान हे शब्द ऐकून ती जी किंचाळली होती तो आवाज अजूनही कानात विचित्ररित्या घुमतो.
. बारा तोंडांनी बारा कथा सांगितल्या पण मी कशावरही विश्वास ठेवू शकले नाही कारण मानसिक आजार वैगरे काहीसं असू शकतं यावर माझं ठाम मत होतं. लग्नाबद्दलची भीती कदाचित तिच्या मनात रोवली असेल किंवा आणखीही काही असू शकत.... पण तिच्या त्या कोवळ्या मनावर हे असले आघात कसं सहन केलं तिने आणि तीन वर्षानंतर तिची ही अवस्था होण्याचं काय कारण असावं. शहरातले प्रतिष्ठित डॉक्टर सुद्धा तिला कुठल्याही मेडिसिन देऊ शकले नाहीत आणि दिलेल्या मेडिसिन्सचा सुद्धा तिच्यावर काहीही असर होत नव्हता. दिवसेंदिवस तिच्या शरीरातलं मास हळूहळू कोणीतरी खातंय असं जाणवत होतं. फक्त सांगाडा उरला होता. दात विचित्रपणे बाहेर आले होते. कुरळ्या केसांचा जो भला मोठा आवाका होता तो कायमस्वरूपी संपुष्टात आला होता. तिच्या कुटुंबाचा जीव मात्र तिला अशा अवस्थेत पाहून चर्रर्रर्र होत असावा. मी घेऊन गेलेला नारळ पाणी मी हळूच ग्लासात ओतलं आणि तो ग्लास तिच्यासमोर धरला. मान वर करून अगदी केविलवाण्या आवाजात तिने माझं नाव घेतलं... माझ्या अश्रूंना तोंड फुटलं आणि मी हुंदका दाबला. वाटलं आवेशाने तिला मिठीत घ्यावं.... पण नाही जमलं मला ते. म्हंटल माझ्या मिठीत घेण्याने ही तिचं उरलं सुरलं शरीर कडकडून मोडून पडेल की काय? कोणी मला त्यावेळेस पाहिलं असतं तर नक्कीच त्यांना माझ्या अशा मृदू स्वभावावर संशय आला असता. असं म्हणतात अशा वेळेस देवाजवळ भांडण मांडायचं असतं आणि त्याला जाब विचारायचा की कोणाच्याही अध्यात-मध्यात नसणाऱ्या या व्यक्तीला, या तरुणीला कुठल्या कर्माची शिक्षा देतोयस? मी मान वळवून तिच्या आईकडे पाहिलं माझ्या डोळ्यातले प्रश्न मात्र त्यांनी अचूक वाचले होते. एकेकाळी सख्या बहिणींपेक्षाही जास्त प्रेमाने राहिलेल्या आम्ही.... पण दोघींच्या नात्याला आज वेगळाच ग्रहण लागल्यासारखं दिसत होतं. तिच्या आईकडे डोळ्याला पदर लावल्याशिवाय दुसरं काहीही उत्तर नव्हतं. त्यांनी फक्त कुठल्या कुठल्या डॉक्टरांकडे काय काय उपचार केले याची यादी वाचून दाखवली. बावीशीतल्या त्या तरुणीची अशी अवस्था संपूर्ण पंचक्रोशीत कोणी पाहिली नव्हती. माझ्या ट्रेनची वेळ झाली होती म्हणून मी तिथून अलगद उठले. तिच्या आईला म्हणाले की जमलं तरी मुंबईतल्या मोठ्या नामांकित डॉक्टर कडे घेऊन या. मी माझ्या घरी राहण्याची सगळी सोय करेन. त्यांनी फक्त मान हलवून होकार भरला माझी पाठवा तिचा घुमणारा आवाज माझ्या कानी पडला.
*" ये गं, मला पण तुझ्यासोबत घेऊन चल, मला नाही राहायचं इथे "*
थोड्या त्रासिक आवाजात अगदी अडखळत तिने हे चार शब्द म्हटले. पण आता आश्चर्य करण्याची वेळ माझी होती मी मागे वळून पाहिलं तर टाकलेली मान हळूहळू वर करत ती माझ्याकडे प्रचंड आशेने पाहत होती. माझ्या डोळ्यात तिचं अगदी थेट पाहणं मला मानवलं नाही. अचानक अंगावर आल्यासारखं झालं काहीतरी. मी मात्र पुन्हा तिच्याजवळ जाऊन बसले आणि तिची समजूत काढली म्हंटल की...आत्ता मला तुला नेणं शक्य नाही, तर नंतर आई-बाबांसोबत येशील ना? पण यावर तिची प्रतिक्रिया मात्र फार वेगळी होती तोंडातल्या तोंडात शब्द खात ती आणखीन त्रास झाल्यासारखी मान जोरजोरात हलवायला लागली. तिच्या आई-वडिलांनी मला पटकन बाहेर जायला सांगितलं. तिने मात्र ताकद लावून माझा हात धरून ठेवला. त्या सुकल्या जीवात कुठून एवढी ताकद आली? ती हात सोडायला तयार नव्हती. तिच्या आईने मात्र जोर लावून हात सोडवला आणि लगबगीने घेऊन मला बाहेरच्या अंगणात गेली. मागून माझे मिस्टर ही बॅग घेऊन आले. तिथूनच परतीचा मार्ग धरला. पण राहून राहून मन माझं तिच्यापाशीच जात होतं. कानावर मात्र तिच्या अस्पष्ट किंकाळ्यांचा आवाज येतच राहिला.
उन्नती सावंत
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा