या गोष्टीला तीन महिने ही उलटले नाहीत आणि मला पुन्हा तिच्याकडे जाण्याचा योग आला. त्यावेळेस मात्र मी तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन गेले होते. आणि गेल्या गेल्या मला ती इतकी व्यवस्थित दिसली की मला क्षणभर वाटलं की आताही लवकरच बरी होणार. कमी असले तरी छान व्यवस्थित बांधलेले केस. एक साधासा कुर्ता आणि लेगिज घातली होती तिने. मी गेल्यावर माझ्याकडे बघून हसली सुद्धा आणि बेडवर आपलीच पावले जोरजोरात हलवत स्वतःचाच घर परक्याचं असल्यासारखं न्याहाळत होती. मी बॅग ठेवली हात पाय धुवून पाणी घेऊन प्यायला बसले आणि तिच्याशी गप्पा कशा सुरू करू याच विचारात असताना ती हसून म्हणाली...
" मला न्यायला आलीस ना? थांब मी माझे कपडे पिशवीत भरून आणते. " आणि खरंच उठून जिन्याच्या दिशेने चालायला लागली मी तिच्या आईकडे पाहिलं तर ती सुद्धा आश्चर्याने पाहत होती.
. मी पुढे काय होईल हे पाहत शांत बसून राहिले. त्यांच्या देवळातले देव सुद्धा अंधारात बुडून गेल्यासारखे वाटत होते. घरातले इतर लोकांनी माझी चौकशी केली मी सुद्धा त्यांची खेळणी खुशाली विचारली पण तिच्याबद्दल मात्र कोणीही बोलायला तयार नव्हतं. बोलता बोलता एक मात्र लक्षात आलं की दिवसेंदिवस तिचा विक्षिप्तपणा वाढत चालला होता. दोन दोन दिवस उपासमार काढणारी ती तरुणी, अचानक अर्ध पातेलं जेवण खाऊ लागली होती. असं तिच्या आजीने सांगितले. मध्येच वेड्यासारखी हसायची प्रचंड मोठ्याने गाणी म्हणायची अंगामध्ये खूप शक्ती आल्यासारखे सगळं उध्वस्त करायला निघायची आणि अचानक कोणीतरी बटन बंद करून तिला गप्प केल्यासारखं थरथरत एका कोपऱ्यात पडून राहायची. कुठल्या वेळी ती काय करेल हे कोणालाही माहीत नसायचं. झोप नसल्यामुळे डोळ्याखाली जी काळी वर्तुळे बनली होती. ती तिच्या निरागस चेहऱ्याला भयाण बनवत होती.
अगदी दहा मिनिटात ती एका लहानशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये स्वतःचे कोंबलेले कपडे घेऊन माझ्या समोर आली. आणि लगबग करू लागली मला म्हणे की ही पिशवी तुझ्या बॅगेमध्ये ठेव. मी सुद्धा थोडी हवा खाऊन ती पिशवी हातात घेतली आणि माझ्या बॅगेवर ठेवून दिली. तिची आई अचानक तिला म्हणू लागली की....तुला का जायचंय तिकडे? तुला एवढा मोठा प्रवास नाही झेपणार. आपण तुला नंतर घेऊन जाणार आहोत ना? तुझ्या आईच्या बोलण्याला तिने जराही भाव न देता की फक्त माझ्याकडेच एकटक पाहत राहिली.
. बरं मला जेवायचा ही आग्रह केला गेला पण प्रवासामुळे डोकं इतकं उठलं होतं की मी फक्त एक गरम चहा त्यांना द्या म्हणाले. माझ्या मिस्टरांनाही एक कॉफी पुरेशी होती. मला अचानक गप्प बसून सगळं पहावं लागत होतं पण माझ्या मिस्टरांना मात्र चौकस बुद्धी असल्यासारखं प्रश्न विचारायची इच्छा झाली. त्यांनी तिच्या वडिलांना हे सगळं का झालं, कसं झालं,कुठे झालं आणि हे थांबत का नाही आहे? त्याबद्दल विचारणा करताच त्यांनी जे उत्तर दिलं ते फार विचित्र आणि विक्षिप्त होतं. ते म्हणाले की....
" तिचं लग्न ज्या कुटुंबामध्ये ठरवलं होतं त्या कुटुंबात त्या मुलाचा मोठा काका तरुण असतानाच गळफास घेऊन त्या घरात मरण पावला होता. आणि त्यावेळेस तो विना लग्नाचा होता. ही गोष्ट त्यांनी आमच्यापासून लपवली होती. आणि जेव्हा माझ्या मुलीचं लग्न ठरलं, उटणं, हळद लावली गेली... त्यावेळेस त्या नवरदेवाची उष्टी हळद जेव्हा तिच्या अंगावर लावली त्यावेळेस ती थोडी विक्षिप्त वागू लागली. घरातील काही रिती रिवाज नियम पाळून सुद्धा ती ओल्या हळदीच्या अंगाने अंगणामध्ये फुलं आणायला गेली होती. आमची मान्यता अशी आहे की ओल्या हळदीच्या अंगाने नवरीने उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा पाय ठेवू नये. पण हिला देवपूजा करायचे असल्याने मात्र फुलं आणायला ती गेली होती. आणि खरं सांगतो तुम्हाला की तिथेच घात झाला हो. दुसऱ्या दिवशी तिला चांगलं सजवून मांडवात नेलं.... शालू नेसून बोहल्यावर उभं केलं, पण जसा अंतरपाट सरला तेव्हा समोर नवरदेव नसून जणू काही कुठल्या प्रेताला पाहते आहे अशा प्रकारे किंचाळली ती. शुभकार्यात अचानक हे असं विघ्न आल्याने आमचे हात पाय गळून गेले होते. नाना प्रकारच्या लोकांनी नाना तरी मी उपाय सांगितले तिची नजर काढली, तिच्या हातात काळे धागे बांधले, तिला खायला दिलं, डॉक्टर बोलावले... पण काही म्हणून परिणाम झाला नाही. नवऱ्याच्या घरी गेली एक रात्र सुद्धा ती तिथे राहू शकली नाही. त्याच रात्री दोन वाजता जोरात किंचाळत हॉलमध्ये ओरडू लागली. " मला माझ्या घरी जायचंय, नाही मला इथे नाही राहायचं. " तिचं बोलणं मनावर घेऊन सासरकडच्या माणसांनी रात्री ताबडतोब तिला माहेरी आणून सोडलं. आज पर्यंत तीन वर्ष झाले की अजूनही इथेच आहे. "
आणि हे ऐकून सुन्न झालेल्या माझ्या मनात एकच प्रश्न सारखा येत होता? तिची काय चूक? यावर काही उपाय नाही का? हे नक्की खरं आहे का? मानसिक तज्ज्ञ याबद्दल काय सांगू शकतील?
मी निशब्द होते आणि काळ बलवान असल्यासारखा प्रचंड विभत्स असा हसत होता.
क्रमश :
उन्नती सावंत
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा