Login

*तिचं अस्तित्व* भाग -9

नाचणारीच्या मुलीची कथा
मागील भागात आपण पाहिलं कि राधाचं अचानक निधन झाल्या मुले अनुश्री च पूर्ण आयुष्य च बदल जात ..त्यात सुरेश बेफिकीर असल्या मुळे सगळं काही अनु ला बघायचं होत. आता पाहूया पुढे....,


"बाबा ..काळजी नका करू मी मावशींना विचारते माझ्या साठी काही काम भेटेल का ..मग होईल सगळं नीट ..."


ती कामाला गेली तर कदाचित माझे मनोरथ बिघडेल हे मनात आल्यामुळे तो थोडा घाबरलाच....त्यात आता त्या माणसाला द्यायला त्याच्याकडे पैसे देखील नव्हते.. आणि दोन दिवस दारू न पिल्यामुळे त्याला अजूनच कसतरी झालं होत.

" पोरी, तुज्या आय ची इच्छा व्हती तू शिकव म्हणून... हे काम तू केलस तर तिला बी आवडणार न्हाय.. तू काळजी नगो करुस.. म्या हुडकतो काय तरी काम... "


असं म्हणून तो उठायला गेला तर दारू ची आता त्याच्या शरीराला एवढी सवय झाली होती कि न पिऊन देखील त्याचे हात पाय थरथर करायचे त्यामुळे त्याचा तोल गेला . तो पडणार तेवढ्यात त्याला अनुश्री ने पकडलं आणि त्याला खाली परत बसवून म्हणाली .

"बाबा , मला तुमची काळजी समजते पण आई ने तुम्हाला काम नाही करून दिल ना, मग मी पण नाही करून देणार .तुम्ही आणि गणू माझी जबाबदारी आहात आणि मी ती चांगल्या प्रकारे पार पडेन. तुम्ही बसा इथे मी वंदना मावशी कडून रॉकेल घेऊन येते आणि त्यांना कामाबद्दल विचारते ."


त्यावर त्याने फक्त हसून मान डोलावली पण आता तिच्या पुढे विषय कसा काढावा आणि तिच्या पचनी आपले बोलणे कसे पाडावे ह्याचा तो विचार करू लागला .


***********************************


इकडे अनुश्री वंदना मावशी कडे गेली . तीच मन मोकळं करण्याची ते हक्काचं ठिकाण होत .फडावर असताना देखील आई ची आठवण झाली कि वंदना मावशीच्या कुशीत जाऊन शांत व्हायची. आता ही त्या होत्या म्हणून ती एवढ्या लवकर सावरली होती , दुःख तर होतेच पण ते ती आता दाखवत नव्हती .

"मावशी ..."

तिने आवाज दिला तस देवपूजा करून बाहेर वंदना मावशी आल्या .

"काय ग अनु काय झालं ..एवढी उदास का बाळा ."


"मावशी अग मला वाटतंय मी काहीतरी काम करावं .मला काही काम भेटेल का ?कुठे मजदुरीच असेल तरी चालेल ."


अनुश्री ने मावशींना विचारलं.

"अनु अग राधा ची इच्छा होती कि तू खूप शिकावं. मग तिची इच्छा पूर्ण करावी असं नाही वाटत का तुला ?"

मावशी ने तिच्या डोक्यावरून हात फिरवला व म्हणाली .

"वाटत ना मावशी पण तेव्हा पंखांना बळ द्यायला आई होती आता ती नाही आहे .आता माझ्यावर गणू ची देखील जबाबदारी आहे . घरात खायला पण काहीच नाही त्या लहानग्या लेकराला काय आणि कस समजावू ? तो काही बोलत नाही पण किती दिवस भूक मारणार ना ?"

ती एकदम अगतिकपणे बोलली. मावशी ची परिस्थिती पण बेताचीच होती, त्यामुळे ती सुद्धा त्यांना मदत करण्यास असमर्थ होती. तिला धीर देण्याशिवाय अजून काही करणे तिच्याच्याने ही शक्य नव्हतं .


"ते पण खरं आहे पोरी... मला जेवढं करता येईल तेवढं करेन, सांगते काकांना कुठं काम असेल तर बघायला . ते रोजनदारीवरी नको बघायला .लोकांच्या नजर फार वाईट . कारकुनीच भेटलं तर सांगेन."


"तोपर्यंत काय करणार मला चालेल कुणाच्या ही शेतात काम असलं तरी ."


अनुश्री शांत पणे म्हणाली , तिला आता कुटुंबच पोट भरणे गरजेचे वाटत होते .

"ठीक आहे , ही भाकरी न ठेचा केलाय तो घेऊन जा ."

असं म्हणून तिने तिच्या हातात भाकरी ठेवली . नको म्हणायचं असून देखील गणू चा चेहरा समोर आल्यामुळे ती नको म्हणू शकली नाही .पण आता तिला रॉकेल मागायचा धीर झाला नाही म्हणून तिथून काहीही न बोलता ती निघून गेली.


***********************************

एक आठवडा कसा बसा निघून गेला. आता घरात काहीच शिल्लक राहील नव्हतं तेव्हा सुरेश ने मुद्दाम हुन घरातील वस्तू विकायला काढल्या ,


“आने , ह्यो तांब्याचा हंडा म्या इकतोय, ह्यावर एक हफ्ता जाईल आपला .”

त्यावर निराशेने तिने मान डोलावली . वंदना मावशीला सुद्धा अजून कुठे काम असल्याचा निरोप भेटला नव्हता , त्यामुळे अनुश्री दुःखी होती .ती भुकेची राहू शकत होती पण छोट्या गणूला असं भूकेचे ठेवणे तिला पटत नव्हतं.तिला खूप रडायला यायचं .

"बाबा , तिकडे चालले आहात तर तिथे एका शेतात काही काम मिळतंय का पाहून या ."

एवढं बोलून ती घरात गेली .सुरेश पण तो तांब्याचा हंडा विकायला निघून गेला. आज त्याला दारू प्यायला भेटणार होती, त्यामुळे तो खूप खुश होता .अनुश्री विचारातच होती कि तिकडून गणू आला.


"ताई ही घे बोरे . "


गणू तिच्या हातात बोर देत म्हणाला .

"गणू अरे एवढ्या दूर कश्याला गेलास ?"


"ताई अग खूप भूक लागलेली आणि तुला तरास नको म्हणून आता माझं प्योट भरलं हाय,तू काळजी नगो करुस ."


तो एवढं बोलला आणि अनुश्रीला एकदम भरून आलं आणि तिने त्याला आपल्या गळ्याशी धरलं .

"माफ कर मला गणू , तुझी मोठी बहीण असून मी काहीच नाही करू शकत ."

तेवढ्यात हलत डुलत सुरेश आला. तो दारू पिऊन आला होता हे त्याच्या घरात शिरल्याबरोबर आलेल्या वासावरून समजलं.पण त्याने तिच्या हातात एक पिशवी दिली.

"अणे आज झक्कास जेवण बनव . ह्यात कोंबडी कापून आणले ती रांध अन तांदूळ हायेत . डाळ बी हाय अन हे काही पैके ठिव तुज्याजवळ ."

असं म्हणून तो निघून गेला.


"ताई आज खूप दिवसातून कोंबडी भेटलं खायला लवकर लवकर रांध ."

एवढं म्हणून गणू देखील खेळायला पळाला .

"हे असं किती दिवस चालणार "

असा विचार मनातच करून ती जेवण बनवायला लागली .आज खूप दिवसातून गणू मनापासून जेवला आणि शांतपणे झोपला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत पहाटे कधीतरी विचारात तिचा डोळा लागला .

असेच काही दिवस गेले, आता तर घरात विकण्यासारखं काहीच राहील नव्हतं. एव्हाना अनुश्री सुद्धा कुठे काम भेटत का ते बघून आली होती. पण पावसाळ्यामधली सगळीच कामे झाली होती . जवळपास सगळ्यांची लावणी झाली होती आणि कुणाची राहिली असेल तर अनुश्रीला त्या कामाचा अनुभव नसल्यामुळे कुणीच ते काम तिला देत नव्हते. सगळी कडून तिच्या पदरी निराशा आली होती .


आता सुरेश ला तिच्या अगतिकपणाचा अंदाज आला होता , त्यामुळे हीच खरी वेळ आहे असं समजून त्याने तिच्या पुढे विषय काढला .

"आनु , इथं बस , म्या तुज्या कडून काय तरी मागणार हाय .ह्या बापाला समजून घे अन त्याच ऐक."

"हो बाबा बोला तुम्ही ."

त्याच्या जवळ बसत ती म्हणाली.


"आनु एक शेट भेटला व्हता, त्यास्नी तुजा चिरा उतरवायचा हाय. त्यांच्या घराण्याला फकस्त एक वारस पाहिजेल. तुला बघल तवाच तू त्यास्नी आवडलीस. ते तुला कधीबी अंतर देणार न्हाय. तुज शिक्षण बी बघतील अन कायमच आम्हा दोगांस्नी मला अन गण्याला बगणार हायेत. तुज्या आयेला तू नाचवास असं वाटत नव्हतं , त्यात तिच्या पोटी जन्मला आलीस तू तर तुज लगीन व्हणार न्हाय पण तुझ्या पोटी जनमाला येतील त्यास्नी नाव अन तुला कायम तिथं राहता येईल कारण त्या पाटलाची बायको देवाघरी गेले.आता समदं तुज्या हातात हाय. म्या तर तुला डाक्टर बनवतील म्हणून हा म्हणून आलोय. बघ तू सांग आता. गण्याकड बी लक्ष देता येईल."


असं म्हणून तो तिच्या कडे बघतच राहिला , इकडे अनुश्री ला आता काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं.