Login

तीच अस्तित्व भाग -10

नाचणारणीच्या मुलीचा संघर्ष
मागील भागात आपण पाहिलं कि अनुश्री ला सुरेश तिचा चिरा उतरवण्याबद्दल विचारतो. आता पाहूया पुढे...,


तिला विचारात पडलेले पाहून त्याने पुन्हा तिला विचारलं,

" आने, जास्त इचार नगो करुस, तुजा नकार असल तर म्या आजच न्हाय म्हणून सांगून येतो. "


त्यावर ती काही क्षण विचारात पडली. आईची इच्छा होती कि मी नाचव नाही तर ह्या लग्नामुळं तिची इच्छा पूर्ण होईल आणि गणू ला देखील पोटभर खायला भेटेल. बाबांचे देखील हाल नाही होणार, शिवाय मला डॉक्टर ही होता येईल कदाचित. लग्न तर तस ही आपल्याशी कोण करणार नाही मग एका सोबतच आयुष्यभर राहायला काय हरकत आहे. नाहीतर अश्या किती जणी आहेत ज्यांना मन भरलं कि सोडून दिल जात. विचारांच्या तंद्रीतून बाहेर येऊन ती सुरेशला म्हणाली.

" ठीक आहे बाबा, मी तयार आहे चिरा उतरवण्यासाठी. पण गणू चा सगळं त्यांना बघावं लागेल तरच. "


ते ऐकून सुरेश एकदम खुश झाला, त्याला वाटलच नव्हतं कि अनुश्री एवढ्यात तयार होईल. त्याने उठून तिच्या डोक्यावरून हात फिरवला व म्हंटल,

" म्या उद्याच त्या पाटलास्नी बोलावून आणतो, मग ते सांगतील तवा उतरवू चिरा. "


त्यावर तिने फक्त मान डोळावली आणि सुरेश आनंदाच्या भरात तिथून निघून गेला.तर अनुश्री पुढे काय होईल ह्या विचारात अडकली.


***********************************


संध्याकाळीच सुरेश निरोप घेऊन घरी आला. तो खूपच खुशीत होता. घरात वाणसामान पण आणलं होत त्याने. अनुश्री साठी एक लुगडे आणि गणू साठी देखील काही कपडे होते. ते पाहून अनुश्री खुश झाली, चला गणू तरी सुखी राहील आणि माझं शिक्षण ते लोक पूर्ण करणार असतील तर मला काहीच अडचण नाही.


"आने, हि साडी घे अन सांच्याला नेस . सांच्याला ते पाटील आपल्याला घ्यायला येतील तवा तयार राहा. उद्या त्यांच्याच कड तुजा चिरा उतरवतील."


अनुश्री च्या जवळ जात सुरेश म्हणाला,


"पण बाबा गणू च काय ?"


तिने काळजीने म्हंटल, कारण त्याच्या भल्यासाठीच तर ती तयार झाली होती.


"त्याच काय ..त्याला बगायला म्या हाय . ते पाटील जमीन अन पैसा अडका बी देतील, त्यातून आमचं आमी भागवू , तू तिथं जोपर्यंत राहशील आमास्नी काय बी कमी पडणार न्हाय. फकस्त त्यास्नी लवकर वारस हवा हाय . पहिल्याच पोऱ्या झाला कि काम जाल बग. तुज आयुष्य बी नीट जाईल."

तिच्या हातात लुगडं देत तो म्हणाला.

" आणि माझ्या शिक्षणाच काय. "

अजुनही तिला खात्री भेटत नव्हती.


"आने आता तू मोडता नगो घालूस बग, तुज्या बा वर  तुजा इश्वास न्हाय का ?"


सुरेश थोडा रागात बोलला.


" बाबा, विश्वास तुमच्यावर आहे, पण त्यांच्यावर कसा असेल म्हणून विचारलं. "

अनुश्री आपल्या मनातील शंका व्यक्त करत होती पण ते सुरेश ला नको होत, आतापर्यंत ह्या क्षणासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे तो जरा वरच्याच पट्टीत बोलला.


" ते म्हणलेत ना शिकवू तर शिकवतील, म्या काय तुजा वाईट न्हाय बगत. "


एवढं बोलून तो तिथून निघून गेला आणि अनुश्री त्या लुगड्याकडे बघतच राहिली.



"ताये, हे बग भारी हाय ना? म्या अशी कापडं पहिल्यांदा घातली बग, भारी वाटत हाय."


अनुश्री ने पाहिलं तर गणू नवीन कपडे घालून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि हसू होत. त्याच ते निखळ हसू पाहून सध्या तरी तिने काहीच विचार करायचा नाही हे ठरवलं आणि त्याच्या डोक्यावरून हसून त्याला होकार देऊन मान हलवली.


" म्या समद्यास्नी दाखवून येतो. "


अस म्हणून तो मित्रांना नवीन कपडे दाखवण्यासाठी तिथून उड्या मारत निघून गेला. तो गेल्यावर अनुश्री देखील घरच्या कामात गुंतून गेली, तिने घर शेणाने सारवलं आणि भिंती सुद्धा शेणाने लिंपून घेतल्या. दारासमोर रांगोळी काढली आणि तिच्या वडिलांनी दिलेले लुगडे नेसून तयार झाली. तिचं बोसके सुद्धा तिने भरलं होत. आज ती आपली नजर पूर्ण घरावरून फिरवत होती,उद्या पासून ती तिथे नसणार ह्याच विचाराने तिला भरून येत होत. ती वंदना मावशी कडे सुद्धा जाऊन आली, नेहमी त्यांच्याकडे गेल्यावर तिचं मन शांत व्हायचं पण आज मात्र एकदम अस्थिर होत. तिने त्यांच्याकडे मनसोक्त रडून घेतलं.

" मावशी, जोपर्यंत गणू माझ्याकडे येत नाही तोपर्यंत त्याची काळजी घ्या. मी लवकरच त्याला माझ्याजवळ घेऊन जाईन. "

भरल्या डोळ्याने तिने वंदना मावशींना निरोप दिला.


" तू फक्त तुझी काळजी घे, गणूला मी जमेल तेवढं सांभाळेन. "


मावशींनी फक्त तिला होकार भरून मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला निरोप दिला.


********************************


"आने, थोबाड हसरं ठेव, ते पाटील येतीलच."


दारातून घरात येरझाऱ्या घालत सुरेश बोलला. एव्हाना त्याच्या पाच सहा फेऱ्या मारून झाल्या होत्या. तिने मान हलवून त्यांना फक्त होकार भरला. थोड्या वेळाने त्यांना बैलांच्या घुंगरांचा आवाज आला. तस सुरेश लगबगीने बाहेर गेला आणि अनुश्री थोडं सावरून बसली.


" यावं पाटील, तुमचं पाय आमच्या गरीबाच्या झोपडीला लागलं, हेच आमचं भाग्य हाय. "


तस तो व्यक्ती आत मध्ये आला.


" हम्म, सुरेशराव तुमचं घर तर भारी ठिवलं हाय. "


एक भारदार आवाज अनुश्री च्या कानी पडला. तस तिने मान वर करून पाहिलं. एक तिशी ओलांडलेला माणूस धोतर घालून डोक्याला फेटा बांधलेला पूर्ण घरावर नजर फिरवत होता. त्याचा आवाज एकदम दमदार होता, आणि त्याच व्यक्तिमत्व एखाद्याला शांत राहण्यास पुरेसे होत.




(चिरा उतरवणे म्हणजे एक प्रकारे लग्न सोहळाच असतो, ह्यात फरक एवढाच कि ह्यात त्या व्यक्तीच मन भरलं की सोडून देता येत होत ..ह्या मध्ये नाचणारणीच्या आयुष्यात जी पहिली व्यक्ती येते त्या व्यक्तीने नाचणारीच्या नातलगाने मागितलेली रक्कम द्यावी लागते किंवा ती रक्कम किती असावी ती ठरवली जाते, ह्यात ती रक्कम सोन्याच्या , जमिनीच्या किंवा पैश्याच्या रूपात असते , ती रक्कम काय घ्यावी हे ती व्यक्ती ठरविते ते ही पूर्ण गावाच्या समोर, पहिल्या रात्री नाचणारणीला नव्या नवरीसारखं सजवतात , देवाची पूजा करतात. तिला सर्व नातेवाईकांच्या व गावातल्या मोठ्या लोकांच्या पाया पडाव लागत . गळ्यात मंगळसूत्र घालतात , पायात जोडवी घालतात तसेच सोन्याच्या दागिन्याने देखील तिला मढवतात , लग्नाच्या पहिल्या रात्री जशी फुलांनी खोली सजवली जाते तशी तिची खोली सजवतात . ह्या मध्ये जी व्यक्ती नाचणारीचा चिरा उतरवते, त्या व्यक्तीस तिला नवऱ्याचं स्थान द्यावं लागत . आता ह्यात ते कधी कधी स्वतःच्या मर्जीने असते किंवा कधी कधी कुणाच्या तरी दबावाखाली व भीती पोटी असते . ह्यात जोपर्यंत ती व्यक्ती तिला व तिच्या कुटुंबाला सांभाळते तोपर्यंत त्याच्या शिवाय दुसऱ्या कुणाशी त्या नाचणारणीने शरीर संबंध ठेवायचे नाही आणि जी व्यक्ती चिरा उतरवते तिला मालक असं म्हणते, म्हणजे एक प्रकारे ह्यात त्या मुलीच शरीरच विकलं जात. तो चिरा उतरवणारा चांगला निघाला तर ठीक नाहीतर मन भरल्यावर फेकून देणारे सुद्धा खूप असतात.ह्यात त्या मुलीचा बापच भागीदार म्हणून असायचा म्हणजे अस ही म्हणू शकतो की त्या मुलीला वेश्या व्यवसात ढकळलं जायचं.....ते सुद्धा तिच्या घरच्यांच्या संमतीने तिच्या मर्जीने किंवा मर्जीशिवाय.)



संघर्ष हा तिच्या पाचवीला पूजला होता पण तो कुठपर्यंत हे तर तिची नियती ठरवणार होती, आता ह्यात ती नियती ला दोन हात करते की तिच्या सोबत वाहून जाते.


क्रमश :

🎭 Series Post

View all