मागील भागात आपण पाहिलं की, अनुश्री चिरा उतरवून घेण्यास तयार होते. त्यानुसार ते पाटील त्यांच्याकडे येतात. आता पाहूया पुढे...,
"हम्म, सुरेशराव तुमचं घर तर भारी ठिवलं हाय. "
एक भारदार आवाज अनुश्री च्या कानी पडला. तस तिने मान वर करून पाहिलं. एक तिशी ओलांडलेला माणूस धोतर घालून डोक्याला फेटा बांधलेला पूर्ण घरावर नजर फिरवत होता. त्याचा आवाज एकदम दमदार होता, आणि त्याच व्यक्तिमत्व एखाद्याला शांत राहण्यास पुरेसे होत.
" हा जी पाटील, हे समदं माज्या लेकीनं अनुश्रीने केल हाय, खूप साऱ्या कला हायेत तिच्या अंगात. हुशार बी हाय. "
सुरेश कौतुकाने आपल्या लेकीबद्दल बोलत होता.
" चांगलं हाय.. म्हणजे आमची निवड बराबर हाय तर. "
अनुश्री कडे वर खाली पाहत ते जोरात हसून म्हणाले. त्यांच्या तश्या बघण्याने का कुणास ठाऊक पण अनुश्री ला एकदम कस तरी वाटलं. एक क्षण तिच्या मनात आलं की हे उतरवणार आहेत का आपला चिरा...
"अनु बाळ, जा च्या बनव.."
सुरेश ने तिला चहा बनवायला आत मध्ये पाठवलं तशी ती एक सुटकेचा निश्वास टाकत तिथून गेली.
" सुरेशराव, चिरा आपण आमच्या वाड्यावरच उतरवूया अन समदं आवरलं ना? आपल्याला निघावं लागेल. "
"व्हय जी पाटील, तुमी म्हणाल तसचा व्हईल बगा. "
तेवढ्यात अनुश्री चहा घेऊन बाहेर आली, तिने त्या दोघांना चहा दिला. चहा पिऊन झाल्यावर ते पाटील म्हणाले,
" चला सुरेशराव, आता निगायला हव. "
अस म्हणून ते बाहेर गेले आणि बैलगाडीवाल्याला गाडी तयार ठेवायला सांगितली. अनुश्री बाहेर गेली तर तिथे दोन बैलगाडी उभ्या होत्या. एकात पाटील बसले तर दुसऱ्या बैलगाडीत अनुश्री, गणू आणि सुरेशराव बसले.
आपली ताई आता दूर जाईल ह्याची कल्पना नसलेला गणू एकदम खुश होता. तर सुरेश ला त्याच्या डोळ्यासमोर पैसा दिसत होता. तर इकडे अनुश्री तिचा चिरा कोण उतरवेल ह्याच चिंतेत अडकली होती.
शेवटी मजल दरमजल करत ते सगळे पाटलांच्या वाड्यावर पोहचले.
तो वाडा तिथल्या पाटलाचा होता. गावात त्यांना खूप मान होता. त्या मोठ्या टोलेजंग आणि श्रीमंतीच दर्शन घडवणाऱ्या वाड्याला पाहून ती एकदम हरखून आणि घाबरून गेली. एवढंस ते लेकरू तिथला बडेजाव पाहून भेदरलल होत. आता नशिबात असेल तर ते तिचं सासर होईल नाहीतर ती अशीच इकडून तिकडे भटकत राहील. तिचं प्रारब्ध काय होत हे त्या देवालाच ठाऊक.गणू आणि ती खाली उतरून तो वाडा पाहतच राहिले.
तेवढ्यात ते पाटील सुद्धा खाली उतरून आले आणि त्यांनी जोरात आवाज दिला..
" रघु, शेवंता कुणी हाय का? "
त्या आवाजासरसी आतून एक माणूस बाहेर आला , त्याच्या पेहरावरून तो त्या वाड्यात काम करणारा एक नोकर वाटत होता , तो लगबगीने धावत आला आणि म्हणाला,
" मालक, आलात तुमी... "
" हो... ह्यांना समद्याना आत मदी घेऊन जा अन आईसाहेबस्नी सांगावा धाड. "
त्यावर त्याने मान डोळावली अन सुरेश कडे बघत म्हणाला,
"या.... यावं.....आत मंदी......,इथ बसा पाव्हणं.... माझ नाव रघु.....म्या इथलं समदं बगतो. काय बी लागलं तरी मला आवाज द्यायचा.."
असं म्हणून त्याने त्या तिघांना वाड्यात आत मध्ये घेतलं आणि शेजारीच पेटवलेल्या शेकोटी जवळ बसायला सांगून त्यांना पाणी पिण्यासाठी आणायला निघून गेला. येताना त्याने पाण्यासोबत गूळ सुद्धा आणला होता, त्यावेळस तशी पद्धतच होती.
पाणी प्यायला देऊन त्याने हातावर एक एक गुळाचा खडा टेकवला आणि म्हणाला,
"पाव्हणं.... तुमास्नी यायला लय उशीर झाला बगा.... पाऊस पण लय उठलाय... बर तरी येळेत आलात आता तुमी बसा हित शेकत... म्या छोट्या मालकास्नी अन बाईसाहेबस्नी निरोप धाडून येतो बगा लगेच....... "
त्यावर सुरेशरावांनी मानेनेच होकार भरला.
तो आईसाहेबाना बोलावायला गेला पण तेवढ्यात त्याला पाटलांची आई कमला बाई बाहेर येताना दिसल्या, त्या आतील बाजूस असलेल्या दिवाणखान्याच्या दिशेने जात होत्या,पण त्यांना हे दोघे बसलेले दिसले तस त्यांनी रघुला आवाज दिला.
" रघु ते शेकोटी जवळ कोण बसलंय....... पाव्हणं का...?? आले का ते...???? "
कमला बाईंनी तिकडे हात दाखवत रघुला विचारलं.
"आव मालकीण बाई...... अनुश्री ताई अणि त्यांचे वडील सुरेशराव आलेत बगा.....त्यांना तिथं बसवून म्या तुमास्नी व धाकल्या मालकास्नी सांगावा धाडायला जातोय..तुम्ही तोवर बोलून घ्या.... मग ... "
"होका.... त्यांना इकडे बोलाव... तोपर्यंत तू सांगावा धाड, छोट्या पाटलांना "
कमला बाईंच्या ह्या बोलण्यावर रघुने सुरेशरावांना खूण करून इकडे बोलावून घेतलं तसे ते दोघेही त्यांच्या समोर येऊन उभे राहिले अणि कमलाबाई साहेबांच्या समोर हात जोडून खाली मान घालून थांबले.
तस कमला बाईनी त्यांना या या असे म्हणत हात जोडून नमस्कार करून बसायला सांगितलं. तेवढ्यात त्यांचं लक्ष अनुश्री कडे गेलं, बावरलेली, भेदरलेली अनुश्री पाहून.. काहीतरी विचार करत त्यांनी घरकामासाठी असलेल्या शेवंता ला बोलावून काही सूचना देऊन तिला अनुश्री ला आतल्या दालनात घेऊन यायला सांगितले..
तसेच रघुला तिच्या वडिलांसाठी चहा, जेवण अणि झोपण्याची व्यवस्था करून देण्याची सूचना केली.. अणि त्या ज्या दिशेने आल्या त्याच दिशेने आतल्या दिवाणखान्याच्या दिशेने निघून गेल्या.
कमला बाई ह्या दिवंगत पाटलांच्या पत्नी असल्यामुळे त्यांचा ह्या वाड्यात दबदबा होता. तश्या त्या स्वभावाने एकदम प्रेमळ होत्या. पण शिस्तीच्या बाबतीत एकदम कडक, सगळ्या घराची त्या काळजी घ्यायच्या. आज त्यांच्या मुळेच घरातल्या पुरुषांचा पाय ठिकाणावर होता.... नाहीतर त्यांनी कधीच घरात सुद्धा बायका आणल्या असत्या....( त्या वेळेस बाई ठेवणे हे प्रकार खूप चालायचे.)
अनुश्री शेवंता सोबत ती घेऊन गेलेल्या दिशेने गेली तेव्हा आतल्या दालनात आल्यावर ती पाहतच बसली, बाहेरून दिसणारा दरवाजाच्या आत असणारा हा वाडा किती मोठा, भव्य आणि प्रशस्त आहे याची तिला कल्पना आली.प्रत्येक दालनात केलेली कलाकुसर तर तिचे लक्ष वेधून घेत होत...कलेची आवड तिला आधीपासूनच होती.... म्हणून ती एकदम निरखून पाहत होती....... पण....जसं जशी ती पुढे जात होती तस तशी तिला आपल्या होणाऱ्या सासरच्या श्रीमंतीची कल्पना आली... आणि सोबत दडपण सुद्धा.......पहिल्यांदा बघितलेल्या गोष्टी तिला भीती आणि अप्रूप दोन्ही दाखवत होत्या. पण ह्यात रमणारी ती नव्हती, पहिल्यांदा पहिल्यामुळे तिला त्या गोष्टींच कौतुक वाटत होत. त्यांचं पूर्ण घर होत तेवढ ह्यांच फक्त एक दालन होत. त्यामुळे ती बिचकत चालत होती.
. पण शेवंता आणि रघु तिथे खूप वर्षांपासून काम करत होते, म्हणून ते एकदम सहजपणे वावरत होते. त्यात शेवंता एकदम बडबडी आणि रघु खाल्या मिठाला जागणारा होता... त्या दोघानी आज पर्यंत बेईमानी केली नव्हती.....
अनुश्री थोडी लाजरी बुजरी होती पण अत्यंत हुशार, चुणचुणीत, अणि हजरजबाबी होती. कुणालाही पटकन आपलेसे करण्याचा तिचा गुण वाखाण्यासारखा होता. दिसायला सुद्धा ती खूपच सुंदर होती. गोरी, सडपातळ आणि लांबसडक केस, लाल भडक ओठ, तिचं ते रूप आणि सहज बोलणे, त्यात तिची हुशारी ह्या सगळ्यामुळे कुणी ही तिच्या कडे आकर्षित होईल असच होत.
तिच्या त्या चंद्रकोरी वाढत जाणाऱ्या अप्रतिम अशा मोहक सौंदर्याकडे आणि हुशारी कडे मोठ्या पाटलांची नजर पडली होती. हा खरा कोहिनुर हिरा आहे, ह्याची जाणीव त्यांना झाली आणि तो आपल्याकडेच असावा असा त्यांनी निश्चय केला.
काय असेल अनु च भविष्य?
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा