मागील भागात आपण पाहिलं कि अनुश्री पाटलांच्या वाड्यावर जाते तिथे तिला कमलाबाई आणि तिथे काम करणारी शेवंता भेटते आता पाहूया पूढे ..,
तिच्या त्या चंद्रकोरी वाढत जाणाऱ्या अप्रतिम अशा मोहक सौंदर्याकडे आणि हुशारी कडे मोठ्या पाटलांची नजर पडली होती. हा खरा कोहिनुर हिरा आहे, ह्याची जाणीव त्यांना झाली आणि तो आपल्याकडेच असावा असा त्यांनी निश्चय केला.
ते सत्य देखील होते कारण उभ्या पंचक्रोशीत त्यांनी अशी देखणी, हुशार मुलगी पाहिली नव्हती. जी पाटलांच्या वाड्याची लक्ष्मी होऊन पुढची पिढी सांभाळू शकेल. म्हणुनच त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा त्यांनी अनुश्री ला राधा बाई सोबत पाहिलं त्याच दिवशी घाईने घरी गेले आणि कमला बाईंशी म्हणजे आपल्या आई बरोबर चर्चा करून त्यांनी अनुश्री चा चिरा उतरवण्यासाठी सांगितलं. कारण त्या वेळेस कळावंतीनीच्या मुलींची लग्न होत नसतं. त्यांनी सुरेशशी बोलून तिचा चिरा उतरवण्याचं ठरवलं आणि त्यानुसार पुढची योजना आखून त्याला हवी ती रक्कम देण्यास ते तयार झाले.
अनुश्री च्या मनाची कोणतीही मानसिक तयारी नसताना तिला लग्न बंधनात बांधले जात होते. खरं तर तिला खूप शिकायचं होत. चिरा उतरवणे ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा तिला नीट माहित नव्हता. त्यात शारीरिक दृष्ट्या सुद्धा ती तयार नव्हती.
पण पुढे तिचे वडील सुरेशराव तिला शिकवू शकत नव्हते, त्यात तिच्या मागे गणू होता. तसही तिचं लग्न होईल की नाही हा प्रश्न उपस्थित होण्या आधीच समोरून मागणी आली होती. ती सुद्धा अश्या घरातून ज्याची कल्पना त्यांच्या उभ्या जन्मात कुणी केली देखील नसेल.
पाटील घराणे त्यावेळेस खूपच प्रतिष्ठित आणि मोठे तालेवार होते. लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरत होती. पूर्ण पंचक्रोशीत त्यांना सगळे वचकून होते. त्यामुळे नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता. पण चिरा कोण उतरवणार हा पण मोठा प्रश्न होताच.
ह्यावर तिचे वडील सुद्धा हतबळ होत कारण त्यावेळेस ती ज्या घरात जन्माला आली, त्या घराण्याची एक पद्धत होती की त्या घराण्यात पहिली मुलगी जन्माला आली तर एक तर तिने नाचायचं किंवा एकदा चिरा उतरवला की मग संपूर्ण गावाला खुश ठेवायचे....
किंवा मग देवाच्या व गावच्या लोकांच्या साक्षीने विवाह करून कोणा एका सोबत ज्याचे आधीच लग्न झालं असेल अश्या व्यक्तीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करायचे.. म्हणजे तस म्हणायला गेलं तर हे लग्न फक्त नावासाठीच.... कधी येऊन कोण हक्क गाजवेल सांगू शकत नाही. कारण प्रथम पत्नी म्हणुन हा मान कधीच मिळणार नाही हे ही तितकेच खरे...सवत म्हणून न जगता रखेल म्हणून जगावं लागत. जिचा कुणीही वाली नसतो.होणाऱ्या मुलांवर सुद्धा अधिकार नसतो किंवा अश्या स्त्रियांची मुलं जन्मलाच येऊन देत नव्हते.
मग ह्या दोन्ही पर्याया पेक्षा तिसरा पर्याय योग्य होता कारण ह्या मध्ये प्रतिष्ठा अणि मान दोन्हीही जपले जाणार होते..अनुश्री ला स्वतःच घर मिळणार होत. शिवाय तिचच बाळ त्या घराण्याच वारस होणार होत. फक्त लग्न कुणासोबत होईल ह्यावर ते सगळं अवलंबून होत. नाहीतर तीच आयुष्य सुद्धा नरकच होणार होत.
अनुश्रीच्या आईला सुद्धा फक्त मुलांना नाव देण्यासाठी आणि गावाची सेवा करण्यापेक्षा सुरेश शी लग्न हेच योग्य वाटलं. पण तिच्या नशिबाने तिला साथ दिली नाही आणि ती आपल्या मुलांना पोरक करून कायमच हे जग सोडून निघून गेली होती.
ती होती तेव्हा तिने अनुश्री व गणू ला तळहाताच्या फोडा सारखे जपले होते. जसं जमेल तस त्यांच्यासाठी केल होत. अनुश्री आपल्या आईहुन जास्त सुंदर दिसत होती, त्यात कलाकुसर आणि हुशारी तिच्यात जन्मजात होती आणि म्हणुनच गावची होण्यापेक्षा पाटलाची बायको किंवा रखेल होण्यातच जास्त शहाणपण आहे असा विचार सुरेशने अनुश्री च्या मनावर बिंबवला . तसेही आपल्या आई वडिलांचा शब्द तिने आजपर्यंत टाळला नव्हता. म्हणून काहीही विचार न करता तीच डॉक्टर होण्याचं स्वप्न मारून तिने होकार देऊन टाकला. त्यात गणू च चांगल होईल हा सुद्धा विचार होताच म्हणा. नशिबात असेल तर होईन डॉक्टर नाहीतर आहे ते स्वीकारायचे आणि पुढे चालायचे.
खरं तर तिथे येण्या आधी काही दिवस तिने तिच्या मनाची तयारी करून घेतली होती. मध्ये सुरेश देखील तिला मार्गदर्शन करत होता . कारण काहीही झालं तरी ती त्याची पोटाची मुलगी होती आणि आता तो मेला तरी तिची भेट होणे शक्य नाही, ह्याची कल्पना होती त्या दोघांना.
आतमध्ये येऊन शेवंताने तिला बदलायला एक लुगडे दिल. ती अंघोळ करून आल्यावर तिचे ओले केस एका कपड्याने पुसून दिले. ती तिच्या केसांकडे पाहतच राहिली. लांब सडक असून खूप जाड आणि काळेभोर होते. शिकेकाई मुळे तिच्या केसांना एक प्रकारचा सुगंध येत होता. शेवंता ने नंतर तिच्या नाजूक केसांना तेल लावुन त्याची वेणी घातली अणि केसात एक गजरा माळायला दिला. तो सुद्धा तिने स्वतः तिच्या केसात घातला आणि कौतुकाने तिच्या त्या केसांकडे पाहत राहिली. तिच्या अश्या पाहण्या मुळे अनुश्री खूप गोंधळली.
तिचा गोंधळ लक्षात येऊन शेवन्ता च तिला म्हणाली,
"झाक दिसताऐसा बाई साहेब.... पण एक कमी हाय बगा.... "
"काय. ...... "
अनुश्री ने स्वतःकडे पाहत विचारलं....
"थांबा हा.... येतेच..... "
असं म्हणून शेवन्ता तिथून गेली आणि मिनिटभरात तिथे परत आली. तिच्या हातात एक टिकली होती. ती चंद्रकोर तिने अनुश्री च्या कपाळी लावली आणि हाताने तिच्या चेहऱ्यावरून माया मोडली.
तिची ती माया पाहून अनुश्री ला खूप गहिवरून आलं, तिला तिच्या आईची आठवण आली कदाचित ती असती तर तिने सुद्धा हेच केल असत. असा विचार तिच्या मनात आल्यावाचून राहिला नाही.
तिच्या डोळ्यातील पाणी पाहून शेवन्ता तिला विचारलं..,
"काय झालं बाईसाहेब.... तुमच्या डोळयांन पाणी...????माज काय चुकलं का..... म्या.... माजी पायरी वलांडली का.... माफी असावी बगा.... ते तुमी एवढ्या झाक दिसतायेसा ते पाहून म्या सवताला थांबवू शकली नाय..... "
तिला हात जोडून उभ राहिलेलं पाहून अनुश्री झटकन पुढे झाली आणि तिने तिचे हात पकडले आणि म्हणाली,
"अहो, नाही.... तुमची माया बघून मला माझ्या आईची आठवण आली, ती असती आता तर कदाचित तिने सुद्धा असच केल असत. "
अनुश्री डोळ्यातले पाणी पुसून म्हणाली.
"म्हणजे......तुमची माय न्हाय का बाईसाहेब...?? "
शेवंता ने अडखळत विचारलं.....
"हम्म.. आताच काही दिवसांपूर्वी ती आम्हाला सोडून गेली."
अनुश्री भरल्या गळ्याने तिला म्हणाली.
"माफी असावी बाईसाहेब... मला ठाव नव्हतं .... "
वाईट वाटून शेवंता म्हणाली.
"तुम्ही कश्यासाठी माफी मागता, आता तिच्या रूपात तुम्हीच भेटल्या ना मला.."
अनुश्री तिच्या मनाची अवस्था समजून म्हणाली, तर हे ऐकून शेवन्ता ला देखील भरून आलं.
"देव तुमचं समदं चांगल करेल ...."
खूप प्रेमाने अनुश्री कडे पाहून ती म्हणाली.तस अनुश्री फक्त हसली.
"तुमी बसा बर आता .....म्या तुमास्नी दूध आणते."
असं म्हणून शेवंता तिथून निघून गेली आणि थोड्या वेळाने तिने तिच्यासाठी गरमगरम दूध आणले . नंतर तिला तिथेच बसवून ती त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला म्हणून निघून गेली.
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा