Login

तिचं अस्तित्व भाग -13

नाचणारीच्या मुलीचा संघर्ष
मागील भागात आपण पाहिलं की चिरा उतरवण्यासाठी अनुश्री सुरेशरावांसोबत पाटलांच्या वाड्यावर येते. तिथे तिला कमळाबाई आणि शेवंता भेटतात, आता पाहूया पुढे..,



इकडे शेवंता जेवण बनवत असताना नकळत पणे तिच्या डोळ्या समोर अनुश्री उभी राहते. ती मनातच तिचा विचार करू लागते, तिचा तो गोरापान चेहरा , तिचे ते मोहक सौंदर्य,  तिचा तो आपलेपणा, गोड बोलणे, तिची हुशारी या प्रतिष्ठित वाड्याला अगदी शोभणारी होती.  पण ह्यासाठी तिचे वय मात्र खूपच लहान होते. त्यात त्या वाड्या कडून सोपवली जाणारी जबाबदारी स्विकारने तर खूपच अवघड काम होत. त्यात तीच कुणाबरोबर लग्न होईल ह्याची सुद्धा कल्पना नव्हती.

              ह्याची जाणीव तिच्या कडे पाहून सतत शेवंताला होत होती.... पण ती पडली एक नोकर माणूस......तिला बोलण्याचा अधिकार आणि हक्क दोन्ही नव्हतं. खरं तर तिला हे सगळं करायला कमला बाईंनी सांगितलं होत, पण आता तिला स्वतःला तिच्यासाठी करावेसे वाटत होते . म्हणून ती आपलेपणाने सगळं करत होती. अनुश्री बद्दल तिच्या मनात एक आपुलकी निर्माण झाली होती. याआधी एवढ्या प्रेमाने कोण तिच्याशी बोलले नव्हते आणि कदाचित तिची आई आताच गेली त्यामुळे तिच्या बद्दल सहानुभूती वाटणे देखील स्वभाविक होते.


               रात्रीच्या वेळी कमला बाई अनुश्री ला दिलेल्या दालनात गेल्या. त्यांना आलेले पाहून अनु पटकन लगबगीने उभी राहिली.

         
             "अग..... नग उठू.... बस बस..... तुला काही लागलं तर तु शेवंता ला सांग.... हेच सांगायला आलती बघ..... "


          अनुश्री त्यांना पाहून थोडी भेदरली होती. कारण त्यांचा आवाज एकदम कडक होता.

तिने मान हलवत फक्त होकार दिला.


                 "ठीक आहे आमी येतो आता..... बाकी रात्रीचे जेवण इथेच पाठवू देते..... जेवून घ्या.....! आणि आराम करा..तुम्ही.....बाकी जे काही असेल ते समदं आपण उद्या सकाळी बोलू   ......तुमचे बाबा सुद्धा आत मध्ये आराम करतात......"

     असे म्हणुन त्या निघून जात होत्याच की अनु च्या तोंडून शब्द बाहेर पडले,

" ते... माझा भाऊ... गणू तो कुठे आहे... त्या.... ला पाठवता का? "

कमला बाईंनी तिच्याकडे पाहिलं तस तिने आपली मान खाली घातली. तेवढ्यात अजून एक गोरीपान स्त्री गणू ला घेऊन आत मध्ये आली. अनुश्री ला पाहिलं तस गणू तिला जाऊन बिलगला.


"ह्यो बगा तुमचा भाव, त्यास्नी सुद्धा आपल्या बहिणीची आठवण येत व्हती, मंग आली घेऊन."


ती स्त्री हसत हसत अनु कडे पाहून कमळाबाईंना म्हणाली.


"बेस केल बगा रुतुबाई तुमी, आताच ह्या बी आपल्या भावाची आठवण काढत होत्या. आता तुमी दोग बहीण भाव आराम करा. उद्या चिरा उतरवण्याचा कार्यक्रम व्हईल."


त्यावर अनुश्री ने मान हलवली, तश्या त्या दोघी तिथून निघून गेल्या.


"ताये, ती ताई बी भारी हाय. हे बग मला लाडू दिल. झक्कास लागतंय."


गणू आपल्या हातातले लाडू तिला दाखवत म्हणाला.
तस अनुश्री च्या डोळ्यासमोर त्या दोघी उभ्या राहिल्या. दोघींच्या चेहऱ्यावर एकदम खानदानी श्रीमंती झळकत होती. कमळाबाई एकदम सोज्वळ वाटत होत्या, पण आवाज एकदम कडक आणि कुणालाही धाकात ठेवायला पुरेसा होता. रुतूबाई सुद्धा खूप शांत वाटल्या तिला.एकदम नाजूक आवाज आणि त्या देखील तश्याच होत्या. तिला आता प्रश्न पडला, ह्या असताना माझ्याकडून का ह्या घराला वारस हवा आहे??


" ताये, तू बी खाऊन बग ना, लय ग्योड हाय. "


गणू तिला थोडासा लाडू देत होता, त्याच्या बोलण्याने ती तंद्रीतून बाहेर आली.


" नको तू खा..."

          
तस तिला होकार देऊन गणू ने बाजूच्या एका खुर्चीवर बसून घेतलं व तो लाडू खाण्यात गुंग झाला तर इकडे अनुश्री त्या खोलीच निरीक्षण करू लागली..


तिने आजूबाजूला नजर फिरवली, त्या दालनामध्ये एका बाजूला एक मोठा पलंग होता त्यावर कापसाने भरलेली गादी अन अतिशय सुंदर अशी चादर, दोन उशा, आणि त्याच्या बाजूला एक सुगंधित फुलांनी भरुन ठेवलेली  फुलदाणी होती. दोन्ही बाजूच्या भिंती रंगवल्या होत्या आणि त्यावर पेंटिंग लावलेल्या होत्या.


               त्यानंतर एका बाजूला एक लाकडी टेबल-खुर्ची होती. त्या टेबलावर एक वही आणि पेन होता. शिवाय एक रेडिओ आणि  पोपटाची जोडी होती, आणि बाजूलाच शिवाजी महाराजांची मूर्ती होती कोपऱ्यात ज्यावर तिच्या पायाशी एक फुल वाहिल होत. ते पाहून तिला एकदम प्रसन्न वाटल तिने त्या मूर्ती जवळ जाऊन हात जोडले. अजून काही वेळ तिचा त्या रूमच निरीक्षण करण्यातच गेला.


तिला वाचनाची प्रचंड आवड होती म्हणून तिने काही पुस्तके सोबत आणली होती. त्यातलं तिने एक पुस्तकं वाचायला काढलं. पुस्तकं वाचता वाचता काही वेळाने शेवंता गरम गरम जेवण घेऊन आली. अनुश्री तिकडे येताना बैलगाडीत आली होती, दुपारी थोडंसं खाल्लं होत. पण ऊन खूप होत यामुळे ती दमली तर होतीच पण तिला भूक पण खूपच लागली होती. त्यामुळे जेव्हा शेवंता ने आवाज दिला, ती पटकन उठून तिच्या जवळ गेली. तिच्या हातून ताट घेऊन भरभर जेवली आणि गणू ला देखील भरवलं.


         जेवण झाल्यावर तिला तरतरी आली तस तिने थोडी फार शतपावली घातली, गणू ला आपल्या जवळ झोपवलं आणि मग आधी वाचायला काढलेले  पुस्तक तिने हातात घेत पलंगाच्या खाली चटई टाकली व तिने तिथेच खालीच अंग सुद्धा टाकलं....सवयी नुसार... तिच्या घरी कुठे पलंग किंवा गादी..!पण तिला खाली झोपलेले पाहून  शेवंता तिथे आली अणि तिने तिला उठवलं....आणि म्हणाली,

"बाईसाहेब हे व काय करता ....?वर झोपा नाहीतर मोठ्या मालकीणबाई मला वरडतील... "


"अग नाही, मला खालीच झोपायची सवय आहे म्हणून झोपले, आणि नाही ओरडणार मी सांगेन त्यांना "

अनु शेवंता ला अगदी हळुवार पणे म्हणाली.

     
"न्हाय ते काय न्हाय, तुमी वर पलंगावर झोपायचं....खालती न्हाय .."


         असे सांगत तिला हात धरून पलंगावर झोपवून तिने स्वतः तिच्या अंगावर गोधडी टाकली आणि दिवा मावळून ती तिथून निघून गेली. तस अनुश्री ने गणू ला आपल्या जवळ ओढल.


          त्या उबदार गोधडीत आणि मऊशार गाडीच्या स्पर्शाने ती सुखावली. आधीच ती थकून गेली होती ...पण तरीही सवय नसल्यामुळे तिला झोप येत नव्हती. पुस्तकं उठून वाचावं तर पुन्हा दिवा पेटवावा लागेल. म्हणून ती तशीच पडून राहिली आणि विचारातच काही वेळाने झोपेच्या अधीन झाली.


----*****----*****----*****----*****----

 
अनुश्री ला सकाळी जाग आली, पण ती दचकून उठून बसली. कारण पहाटे पाच वाजले असतील आणि एवढ्या सकाळी पूजा पाठ चालू होती. कोण म्हणत असेल एवढ्या सकाळी स्रोत? आवाज सुद्धा खूप गोड होता थोडा वेळ ती ऐकतच तशीच पडून राहिली नंतर ह्याच विचारात ती पलंगावर उठून बसली. नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने सुद्धा देवाला हात जोडून मनातच प्रार्थना म्हंटली. क्षणभर ती कुठे आहे हे तिच्या लक्षातच आले नाही.


तेवढ्यात तिला शेवंता चा आवाज आला, तशी ती पटकन पलंगावरून उठून उभी राहिली.


"झोप झाली का म्हणायचं.....बाईसाहेब ?? "


अनुश्री च्या हातात कपडे देऊन शेवंता ने विचारल.

"हो.... उशिराने लागली पण झाली झोप... नवीन जागा ना..."

अनुश्री ने होकार देत म्हटले.

      "ते बगा,  मागच्या बाजूस न्हाणीघर आहे, तिथं मी आंघोळीचं समदं साहित्य ठिवलं आहे.... तवा जाऊन तुमचं आटपून घ्यावा."


             बिछाना आवरत मागच्या बाजूने हात दाखवत शेवंता म्हणाली आणि आल्यापावली आपल्या कामाला निघून गेली.


सुरु होतोय अनुश्री चा प्रवास?
कथेतील नायकाला भेटायला उत्सुक आहात का?

क्रमश

🎭 Series Post

View all