Login

तिचं अस्तित्व भाग -16

नाचणारीच्या मुलीची कथा


*तिचं अस्तित्व * भाग -16

मागील भागात आपण पाहिलं की, अनुश्री पाटलांसोबत चिरा उतरवायला तर येते, पण तिचा चिरा कोण उतरवेल  हेच तिला माहित नसतं, त्याचा विचार करून ती व्यथित होते.......
आता पाहूया पुढे.....,



पण हे सगळं अचानक झाल्यामुळे राजन मात्र घरापासून दूर गेला, त्यांनी स्वतःला व्यवसायामध्ये झोकून दिल, त्यांच संसारातील लक्ष उडालं..... ते शहरातच राहायचे...अधी मधी कधी आलेच तरी काही वेळ सई च्या सोबत राहून निघून जायचे.... त्यांचं लक्ष उडालं होत संसारामधून, कारण हा त्रास सहन न होऊन निलम दोन वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलेल्या बिचाऱ्या सईला पोरक करून.


राजन चा विचार मनात आला तस कमळाबाईंना काहीतरी क्लिक झालं, त्या दिवशी पाटील बोलले होते, की विस्कटलेली घडी नीट बसवायची आहे.... म्हणजे धाकट्या राजनसाठी तर नसेल ना....???? असं असेल तर खूपच चांगलं होईल.... सईला आई आणि राजनला बायको मिळेल... आणि ह्या मुलीचे देखील हाल होणार नाहीत.


त्या विचारातच होत्या की राणूक्काने हलवून त्यांना विचारलं.....,


"वाहिनी साहेब...., काय झालं.... कसला विचार करत आहात.... "


            "इचार म्हणजी.... बगा ना वन्स..... धाकल्यासाठी असेल तर अमास्नी सांगाय नगो का...??? आमाला पण आनंद च व्हईल ना...ते त्या दिवशी आले... अमास्नी बोलले... घडी नीट करतो.... पण नंतर काय बी बोलले नाय... म्हणून तरास होतोय....रुतू ने बी इचारलं तर तिच्याशी बी तिरकस बोलतोय हा पोरगा. काय कराव काय बी समजत न्हाय. "

कमळाबाई आपली शंका राणूक्का सांगतात, तर रुतू चा चेहरा पूर्णपणे उतरतो.


        "आता हिच्या समोर नको..ती बघा किती गोंधळलेली आहे . आपण विचारूया अमोल दादासाहेबाना...... "

अनुश्री कडे बघून राणूक्का म्हणाल्या..... नंतर अनुश्री इकडे तिकडे गोंधळून पाहते.. मगाशी रुतू ने विचारलेल्या प्रश्नामुळे तर ती अजूनच घाबरली होती तिला तस पाहून राणूक्का तिला आवाज देतात .. तशी ती परत चपापते.


          "पोरी.....आतापासून तुझ बालपण संपले बघ.... आता हेच तुझ घर, आजपासून तुझ्या वडिलांच घर तुझं माहेर झालं .......! सुरेशरावांना मान पान त्यांना हव होत ते सगळं सकाळीच देऊन झाल आहे, त्यांना कदाचित निघावं लागेल बघ आता.... जा बघू त्या आधी त्यांना भेटून घे.."


तशी अनुश्री पटकन उठली आणि जायला लागली तेवढ्यात कमला बाईंनी आवाज दिला....,


          "आव... थांबा... तुमास्नी समजणार नाही... शेवंते जा ग घिऊन यांस्नी....... आणि वरचेवर तुला भिटायला या...हे पण सांग तुझ्या बाबाला ......! हे घर तुज भी हाय....हे ध्यानात असुदे.."


ते ऐकून आनंदाने मान डोलावत अनुश्री शेवंता सोबत गेली. कारण वडिलांसोबत गणूला देखील तिला भेटता येणार होत. त्याच्यापासून दूर जाणे तिला खूप जड जात होत.


             खरं तर ज्या दिवशी मानपानाचे ताट अनुश्री च्या वडिलांना दिल गेलं, त्याच दिवशी मुहूर्त ठरवला होता, सगळी मंडळी जमा झाली की त्यांच्या साक्षीने सोपस्कर पार पाडण्यात येणार होते. ह्याला एक विधी म्हणता येईल पण लग्न म्हणावे की नाही..... हा एक प्रश्नच आहे किंवा होता....!

          हा सगळा प्रकार अनुश्रीला माहित होता, पण आता ती पूर्णपणे गोंधळून गेली होती, ह्या नव्या माणसांमध्ये.....!



****----***-------******------******


न्याहारी झाल्यावर राधाक्का कमळाबाईंना म्हणाल्या,

"पोर अल्लड आहे.... रितीभाती शिकवायला लागतील तिला..... आणि जेवणातलं सुद्धा एवढं नसेल जमत.... शिकवा तिला.... सांभाळून घ्या... गोड आहे बघा मुलगी....."


मान हलवत कमळाबाई खंत व्यक्त करत म्हणाल्या,

"व्हय तर शिकवू की.... ही आपली शेवंता झाक जेवण करते बगा......काय बी येत नसल तरी बी शिकवेल ती.... सोबतीला रुतू बाईसाहेब पण हायेत की..... घेतील पोरीला सांभाळून.....पण फक्त आपल्या मनासारखं होऊ दे.. न्हायतर तिला आपलंस कराया मला अन रुतुला लय जड जाईल....."

शेवटचं वाक्य बोलताना त्यांच्या वेदना जाणवत होत्या. तर रुतू मुकपणे आपले अश्रू लपवत होती.


          "चला, आपण पण जाऊया......,  देवळात जायचे आहे. हळद, कुंकू आणि चुडा ठेवायला...... कासाराला बोलावलास ना..... तिच्या सगळ्या साड्या काढून ठेव...... तयारीला लागा बर....   !"


राणूक्का म्हणाल्या तस मानेने होकार देत दोघीही स्वयंपाक घरातून बाहेर पडल्या.


*******-------*******-------*******-----***


इकडे शेजारच्या खोलीत सुरेशराव गणू सोबत अनुश्री ची वाट पाहत थांबले होते,


त्यांच्या डोळ्यापुढे मागासचा एक प्रसंग उभा राहिला.....,

अमोल पाटील ते ज्या खोलीत होते त्या खोलीत आले, त्यांना पाहून सुरेशराव पटकन उठून हात जोडून उभे राहिले,

        "अरे, सुरेशराव बसा... बसा बर..  कश्यापायी हे सतत हात जोडत असता तुमी....."


          "मालक आहात तुमी म्हणून....आमचं आयुष्य तुमच्यामूळ नीट व्हईल म्हणून......"


त्यांच्या जवळ जात सुरेशराव म्हणाले.


       "ठीक आहे बसा .... तुमास्नी ही रीत तर म्हाहीत हाय ना.."


सुरेशरावांनी मानेने होकार दिला....


            खरं तर मुलीचा अर्पण सोहोळा..... हो अर्पणच...... कन्यादान नाही केल जायचं......तिच्या कुटुंबाने एकदा बिदागी घेतली कि पाहायचा नाही, एकदा मुलीला त्या कुणा व्यक्तीला  दिली की दिली.... मग सुख येवो नाहीतर दुःख कश्यातच सहभाग नाही.....! जोपर्यंत ती व्यक्ती स्वतःहून तिला दूर करत नाही तोपर्यंत.


        फक्त त्या वेळेस जो व्यक्ती तिच्या घरातला असेल त्याचा मान ठेवण्यासाठी काही रक्कम आणि मुलीची काळजी घेऊ ही शाश्वती दिली जायची.

"रघु इकडे ये...."


तसा रघु एक भरलेले ताट घेऊन आला,

"हे घ्या सुरेशराव....."

सुरेश रावांनी ते ताट हातात घेतले.

"उघडून तर बघा ..."

अमोलराव म्हणाले तस मान हलवत सुरेश रावांनी त्या ताटावरचा कपडा दूर सारला,

त्यावर काही रक्कम, फेटा, गणू साठी आणि त्याच्या साठी कपडे होते.... आणि एक कसलासा कागद होता.
ते कागदाकडे पाहत राहिले.... तस लक्षात येऊन अमोल राव म्हणाले,

"हा तोच कागुद हाय... तुझी जमीन आणि घर गहाण व्हती तो... म्या ती सोडवली हाय.... आजपासून समदं तुझ....धान्य सुद्धा तुमच्या सोबत पाठवून देऊ.... अन पोराच्या शिक्षणाची सोय करू....त्याच्या नावाची बी काही रक्कम हाय ह्यात.... "


सुरेशराव फक्त भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होते....


"अन अजून एक, तुमची इच्छा असल तर तुमी चिरा उतरवण्यापर्यंत थांबू शकता, शेवटी पोर तुमची हाय...."

तस सुरेशराव प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले....


            "हा ठाऊक हाय अमास्नी, पण आस बी नाय ना कुठ लिव्हलेलं की ही रीत पाळलीच पाहिजे..... आणि हा....जर मुलीची इच्छा आसल तर पुढे तिला शिकवू...... हुशार हाय...... शिकल जेवढं शिकायचं तेवढं..... काळजी नसावी..."


हे ऐकून सुरेशराव अमोल रावांच्या पाया पडले...त्यांना पायाशी वाकलेले पाहून अमोलराव सुद्धा गडबडले.


"अहो सुरेशराव, ये काय कराया लागलासा तुमी ..,?"


"सावकार पोरीची अपूर्ण इच्छा तुमच्या रूपात पूर्ण व्हईल...... "

सुरेशला अनुश्री ची ईच्छा पूर्ण होईल म्हणून बर वाटलं. एवढ्या दिवस तो तिच्या मागे लागला होता पण आता ती दूर होईल ह्यामुळे त्याला देखील वाईट वाटत होत.


" ठीक हाय.... तुमी नाश्ता पाणी केला ना... बसा आता... तुमची पोर येईल एवढ्यात .. तिला सांगा....."


अस म्हणून अमोल राव तिथून निघून गेले.

कधी एकदा ही बातमी अनु च्या कानावर घालतो असेल झालं होत सुरेशरावांना.... त्याच विचारात असताना  समोरून त्यांना अनु येताना दिसली.


तिला पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...... त्यांना तस पाहून अनुश्री धावत गेली आणि त्यांना बिलगली.......!