Login

तिचं अस्तित्व भाग -17

नाचणारीच्या मुलीची संघर्ष कथा
           

.               *तिचं अस्तित्व * भाग -17


   मागील भागात आपण पाहिलं की, अनुश्री च्या वडिलांना अमोल पाटील जुन्या रीती मोडून लग्नासाठी थांबवून घेतात आणि त्यांना आश्वासन देतात की ते तिला पुढे शिकवतील..... ते तसेच करतील का......स्वतःचा शब्द पाळतील का......???? तिचा चिरा कोण उतरवेल?

आता पाहूया पुढे,


कधी एकदा ही बातमी अनु च्या कानावर घालतो असे झालं होत सुरेशरावांना.... त्याच विचारात असताना  समोरून त्यांना अनु येताना दिसली.


तिला पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...... त्यांना तस पाहून अनुश्री धावत गेली आणि त्यांना बिलगली.......!


दोघे ही बाप लेक मनसोक्त एकमेकांना बिलगून खूप रडले.... त्या क्षणाला तिची आई आणि बाप दोघ ही सुरेशरावच होते........ रडण्याचा थोडा भर ओसरला तस सुरेशराव अनुश्री ला म्हणाले......,


          "नशीब काढलास बग पोरी..... पाटील लय भारी हायेत... तुझा चिरा उतरवण्याचा सोहळा पाहायला त्यांनी मला थांबवून घेतलंय बग....न म्या कधीबी तुला भेटाया येऊ शकतो बग.... आज सांच्याचा  मुहूर्त हाय.....तवा ते समदं इथल्या पद्धती अन परंपरेनुसार विधी व्हतील.... ते समदं प्रेमाने समजून उमजून घे..!"

थोडं थांबून ते परत म्हणाले,

           "ह्या घरच्यांना आपलेसे कर...तुझे कन्यादान तर न्हाय करता यीनार.. पण तुझ्या गळ्यात मंगळसूत येईल... म्हणजी तू कदी बी तुज्या आईसारखी नाचणार न्हाय.... यापुढची तुझी पिढी सुद्धा त्यापासून दूर असल ..... तुज्या विधी झाल्या की, लगेच मला भेटता येणार नाही बग....तवा आता तुज्या या बापाला अन भावाला निरोप दे अन हसत मुखाने येणार्‍या आयुष्यासाठी सामोरी जा....! कधीही खचून जाऊ नगो..... म्या आदी मंदी येईन तुला भीटायला.... हा सोहळा पाहायला सावकारांनी थांबवलं तरी मला जवळून बगता न्हाय येणार.... तवा सांभाळून राहा....बाप लेक म्हणुन आपला स्नेह, प्रेम आहेच.. पण दोर मात्र इथवरच.... आता पाटील आणि बाकीचे समदेच तुझे......!"


अनुश्री फक्त वडिलांचे हात हातात धरून रडत रडत ऐकत होती. आज पहिल्यांदा सुरेश एवढं अर्थपूर्ण बोलत होता. तिच्या बद्दलचे त्याचे प्रेम तिला पहिल्यांदा जाणवत होते.


"आज मी तुझ्या आईला दिलेल्या वचनामधून मुक्त व्हईन....... तिला पण आनंद झाला असणार...... तरास तर व्हतोय.... पण तुज चांगलं व्हईल ह्याच समाधान हाय.......!"


अनुश्री खाली वाकून त्यांच्या पाया पडली..... तस ते तिला उठवून म्हणाले.......,


" आज पासून समदं नीटच व्हईल..... तुझ शिक्षण पण पूर व्हईल.... पाटील म्हणाले तस..... पोरीला जेवढं शिकायचं असल शिकू दे... हा बाप तर शिकवू शकत नव्हता......पण पाटील शिकवतील... तुज्या आयची इच्छा पुरी कर..."


ते हताश पणे म्हणाले......, पण शिक्षणाच नाव ऐकताच अनुश्री च्या डोळ्यात चमक आली... म्हणजे कदाचित आपल्याला डॉक्टर होता येईल........ पण तिच्या मनात कधीपासून असणारा एक प्रश्न सतत डोकावत होता....., तस तिने विचारलं.....


"बाबा हा जो चिरा उतरवणार तो कुणाच्या नावाने? कोण उतरवणार??? म्हणजे माझ्या गळ्यात कुणाच्या नावाचं मंगळसूत्र असणार...........??????"


अनुश्री सुरेशरावांना विचारत होती......,

          "बाबा....., सांगा ना.... कुणाचं नावाचं मंगळसूत्र असेल......???? "

तिचा तो जळजळीत प्रश्न ऐकून सुरेशरावांना काहीही सुचलं नाही........उत्तर खूपच कष्टमय होते...... त्या क्षणी तरी! कारण मुलीच लग्न करायला आलोय आणि ते कुणासोबत होईल हे त्यांना देखील माहित नव्हतं......!


"समजेल आपल्याला संध्याकाळी...तू फकस्त खंबीर राहा...... जा आता...... मी भेटायला यित जाईन........ "


"पण बाबा ......."

अनुश्री काही बोलणारच कि सुरेशराव तिला थांबवत म्हणाले,

"जा...., अनु समजलं म्हणलं ना....... "

नाईलाजाने अनुश्री तिथून भरले डोळे घेऊन निघाली......तिला जाताना पाहून एवढा वेळ त्यांच बोलणे ऐकून गोंधळेला गणू तिला जाऊन मागून बिलगला...


" बाबा , ताई कुठं जाणार ? म्या न्हाय सोडणार तिला ..म्या तिच्याच जवळ राहीन .."

गणू ने भोकाड पसरवला ते ऐकून अनुश्री ला अजून रडू आलं ..


"बाबा , त्यांना विचार ना मी गणू ला माझ्या जवळ ठेवू शकते का ?"


अनुला सुद्धा तो जवळच हवा होता म्हणून ती उत्तर माहित असून देखील खूप आशेने सुरेशरावांकडे पाहत बोलली .

"गणू ये इकडे ..."

अनुश्रीला चिपकून बसलेला गणू काही केला त्यांच्याकडे जात नव्हता पण त्यांनी त्याला ओढून स्वतःकडे घेतलं आणि अनु कडे पाहून बोलले ..,

"आपल्याला कितीही वाटत असलं तरी बी हे व्हनार नाय .गणू च्या शिक्षणाचा बी त्यांनी भर उचलला हाय . त्याच्या वाटणीचा पैके बी दिलेत .आमी तुला भेटाया येऊ ..अन गण्याची म्या काळजी घेईन . तू कसला बी इचार करू नागोसे आता ..."

गणू कडे वळून ते परत म्हणाले ..,

"गणू मला ठाव हाय तुजा तुज्या ताईवर किती जीव हाय ते ..पर इथं तुला थांबता येणार न्हाय ..ताई ला आता जाऊंदे ..आपण तिचा चिरा उतरवला कि घरला जाऊ अन मध्ये मध्ये येत राहू ..समद नीट झालं तर म्या सवता पाटलांशी बोलून तुला इथं ठिवायला सांगेन .."


त्यावर समाधान झालं नसल तरी त्याने मान डोलावली . तस अनुश्री ने त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले आणि त्याला आपल्या गळ्याशी लावून रडली ...

"गणू , अभ्यास कर हा ..ताईला भेटायला ये ..मी पण पाटील चांगले असतील तर बोलून घेईन तुला इथे ठेवण्यासाठी अन बाबा गणू ची काळजी घ्या .."

एवढं बोलून ती रडतच धावत तिथून निघून गेली .
तिच्या दालनामध्ये जाऊन मोठ्याने रडू लागली. कोवळी पोर होती ती........आतून तुटली......! पण तिला जाणीव होती कि, आता येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.    


             ती ज्या जातीत जन्माला आली होती तिथे लग्न होत नव्हते अस असून देखील जिथे तिचा हात मागितला होता , ह्यातच सगळं काही आलं होत........, हे अतिशय प्रतिष्ठेचे व मानाचे होते.......तिच्या पुढच्या पिढीला ह्यातून मोकळीक होती.... हेच खूप होत..... ती नाचणारींची मुलगी राहणार नव्हती.... ही समाधानाची बाब होती.......

           म्हणूनच तिने रडणे आणि येणारे विचार थांबवले आणि पुढच्या  कार्यक्रमासाठी तयार झाली......


दुपारी जेवण झाल्यानंतर तिने थोडा आराम केला. पहिल्यांदा ती तिच्या घरच्यांपासून दूर होती. त्यामुळे तिला खुपच एकटे एकटे वाटत होते..!

तिची ही परिस्थिती शेवंता ला समजली...., तशी ती पुढे होऊन म्हणाली,

           "बाईसाहेब..., काय बी काळजी करू नका...... म्या तुमची माहेरची हाय असं समजा.......म्या सदा तुमच्या सोबतीला असेन बगा....  काय बी लागलं तर मला सांगा......."


       शेवंताच्या ह्या शब्दांनी अनुश्री ला खूप बर वाटल.....ती होकारात मान डोलावली.

          संध्याकाळी कासार आले तेव्हा अनुश्री च्या हातात हिरवा चूडा भरला गेला..... त्यानंतर शेवंता ने तिला हिरव्या रंगाची साडी नेसवली आणि त्यावर कमला बाईंनी दिलेले दागिने घातले........

         तिच्या गोऱ्या अंगावर तो रंग खूप खुलून दिसत होता. फार सुंदर दिसत होती ती त्या रंगात..शेवंता ने पुढे होऊन तिची दृष्ट काढली.


             तो चुडा आणि हिरव्या साडीतल आपलं खुलून दिसणार रूप पाहून नव्या नवरीच्या मनात येणाऱ्या भावना तिच्याही नकळत तिच्या मनात उमलू लागल्या होत्या. पण त्या भावना ज्याच्याविषयी होत्या, त्याचा चेहरा मात्र एकदम धूसर होता तिच्या डोळ्यांसमोर..... तो तिने कल्पना करत रंगवण्याचा प्रयत्न केला.... पण ते तिला काही केल्या शक्य झालं नाही.....ती हाताशपणे त्या हिरव्या चूड्याकडे पाहू लागली...... पण आता धूसर झाल्यामुळे तिला तो चुडा सुद्धा दिसत नव्हता........



अनुश्री चा प्रवास कसा वाटतोय........???


सामान्य स्त्री ते डॉक्टर हा प्रवास काही सोपा नव्हता...... मग तो कसा होता......????