. * तिचं अस्तित्व * भाग - बाविसावा
मागील भागात आपण पाहिलं कि राजन आणि अनुश्रीच्या चिरा उतरवण्याच्या आधीच्या विधी सुरु झाल्या आहेत . राजन एकदम राजबिंडा दिसत होता तर अनुश्री सुद्धा खूप जास्त सुंदर दिसत होती आता पाहूया पुढे ..,
इकडे देवळात सगळे खूप खुश होते ; कारण कौल मनासारखा लागला होता. अनुश्रीला देवाने आशीर्वाद दिला होता तसेच तिच्या मुळे घराण्याचा वंश पुढे जाणार याची खात्री देखील दिली होती.
सर्व बायकांसोबत अनुश्री देवळात पोहचली, तेव्हा तिथे पोहोचल्या बरोबर त्या सुवासणीपैकी एकीने तिच्या पायावर दूध व पाणी टाकलं आणि आरती करून ओवाळून तिला मंदिरात आतमध्ये घेतलं.
त्यानंतर तिला मंदिराच्या गाभाऱ्यात जायला सांगितलं आणि देवीचा आशीर्वाद घ्यायला सांगितला. तस तिने माथा टेकून सगळं काही नीट होऊ दे असा आशीर्वाद मागितला. त्यानंतर तिला मंदिरात सगळ्यांच्या मध्ये बसविण्यात आले . तिच्या बाजूलाच भटजी आणि गावातले तिथे जमलेले सर्वच पुरुष व स्त्रिया बसल्या. काही विधी करून तिला मंदिराला सात प्रदक्षिणा मारायला सांगितल्या.त्यानुसार तिने मंदिराला प्रदक्षिणा घातल्या.
नंतर परत तिथेच आणून भटजीनी मंत्र उच्चरण सुरु केले आणि ते चालू असतानाच दुध आणि गोमूत्र तिच्यावर शिंपडण्यात आलं. त्यानंतर मंदिरात जमा असलेले सगळेच जण एक एक करून येऊन तिच्यावर गोमूत्र शिंपडून जात होते. का तर अश्याने ती पवित्र होणार होती..
खरेतर जे काही चालू होते. तो सगळा विधीचा एक भाग होता तरी त्याच वेळी तिच्या मनाची अवस्था फारच विचित्र झाली होती.. ते सगळ्यांनी येउन गोमूत्र आणि दूध शिंपडणे तिला नको झाले होत. या क्षणी सगळं काही सोडून पळून जावे असे मनोमन वाटत होते तिला...! तिला कळतच नव्हतं असं काय ती गोमूत्र शिंपडून पवित्र होणार होती आणि मुळात अपवित्र म्हणजे काय...???? असं काय केल होत मी ज्याने अपवित्र झाली असावी... आणि हे ठरवत तरी कोण.....???? सगळेच आपापल्या सोयीनुसार रीती रिवाज बनवत होते.
काय खोटं होत त्यात. बाईची इतकी वाईट अवस्था. कोणत्याही शारीरिक अत्याचाराच्या शिवाय देखील अशी स्थिती उद्भवू शकते हे तिने आज पर्यंत फक्त ऐकले होते. पण आता ते ती प्रत्यक्ष अनुभवत होती..! फक्त शरीरावरच नाही तर मनावरही अत्याचार होतात. शरीरावरचे घाव भरून येतात कालांतराने, मनावर झालेल्या घावांचे काय करायचे? आजचा दिवस अनुश्री तिची होत असलेली अवहेलना पाहून विसरेल का??????
मुळात जन्म किंवा मृत्यू. तो कुठे, कसा, कधी आणि कुणाच्या पोटी व्हावा हे काय आपल्या हातात आहे का.....????,नाही ना......! मग माझा जन्म एका कळावंतीनीच्या पोटी झाला म्हणून मी अशुद्ध कशी होईन ??? जर कलावंतीण अशुद्ध असते तर मग कलावंतीकडे सगळे आपली वासना पूर्ण करायला जातात तेव्हा ते अशुद्ध नाही होत का.....??? तेव्हा ते बाटत नाही का??? आणि तिच्या पोटी जन्माला आलेले मूल जर तुम्हाला हव असेल तर शुद्ध आणि नको असेल तर बेवारस का? मग ते अशुद्ध का???
हे गोमूत्र शिंपडून मी पवित्र होणार ह्यात तथ्य तरी आहे का? ह्याने मी काय शुद्ध होणार होती, हे तिच्या बुद्धीच्या पलीकडचे होते. आणि देवी कौल देते म्हणजे नक्की काय करते? ती पण एक स्त्री आहे ना? मग माझं दुःख तिला कळत नसेल का ? हे ही तिच्या पचणी पडत नव्हतं. पण ह्यात आपला मांडलेला बाजार पाहून तिला स्वतःचीच किळस येत होती....! इथेच आपला जीव निघून जावा, नाहीतर सीतामाते सारखं मला ही तुझ्यात सामावून घेता येईल का ग धरणी माता?? तिचं मन अकांद्रण करत होत.
त्या वेळेस तिच्या मनात खूप सारे प्रश्न उभे राहिले होते . ह्या विधी , रीती कुणी निर्माण केल्या असाव्यात आणि कश्यासाठी . मीपण तर त्यांच्यासारखीच एक माणूस आहे मग मला अशी वागणूक एक माणूस म्हणून का मिळत असावी हेच तिला समजत नव्हतं .
त्यात शिकलेली होती ती, त्यामुळे काय चांगले काय वाईट..ह्याची समज तिला येत चालली होती. ह्या चालीरीती, त्यातील योग्य काय असावं आणि अयोग्य काय असू शकत याचा सारासार विचार करू शकत होती ती.....! पण ह्यास विरोध करण्याचं साहस मात्र अजून तरी आलं नव्हतं तिच्यात. तिची आई का तिला दूर का ठेवत असावी हे आता तिला समजत होत.
बर......! हे सगळं झाले.... आता होऊन गेलं ह्यावर काहीच उपाय नाही......त्याही पुढे जाऊन एक प्रश्न अजूनही तसाच होता.....आपल्याला आयुष्यभर साथ देणारा कोण आहे याची तिला साधी कल्पना देखील नव्हती..! कोणाला त्याचे गांभीर्य लक्षात येत नव्हते...! मी फक्त एक भोगणारी व्यक्ति.. आणि मुलं जन्माला घालणारी..... काय एवढेच आहे माझे अस्तित्व ????असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात त्यावेळेस येत होते... ज्याची उत्तरे तिला आता तरी माहित नव्हती.
त्यानंतर परत एकदा मंदिर प्रदक्षिणा तिला मारायला लावली. नंतर सगळ्या गावाकऱ्यांच्या पाया तिला पडावं लागलं. बिचारीची कंबर कामातून गेली होती. नंतर तिथे काही तिच्या समुदयातील कलावंतीण आल्या होत्या. परत त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ती ह्या सगळ्यातून मोकळी झाल्याचा तिला शिक्का बसला.
हे सगळं झाल्यावर कमला बाईंनी सोन्याच्या दोन वाट्या आणि मणी घेऊन काळ्या मण्यांच्या पोती मध्ये ओवून दिले. त्यांनी सोबत येताना एक ताट आणलं होत. त्या मानाच्या ताटात असणारे साहित्य म्हणजे एक सुंदर अशी साडी,खण नारळ,कुंकू, ओटीच साहित्य, एक वेणी,गजरा, आणि चांदीचे पायातले पैंजण होते. ते पाटील तिच्या हातात त्यांच्यातर्फे देणार होते. हे सगळं होईपर्यंत दुपार झाली होती.
नंतर परत ती मंदिरात आली तेव्हा भटजी ने पूजा मांडली होती. होम जाळला होता आणि समोर दोन चौरंग होते ; त्यातील एकावर पाटील बसले होते आणि दुसरा अनुश्री साठी होता.....
. ती त्यावर जाऊन बसली, तोपर्यंत सगळे त्या मंदिरात आले होते. तिचं लक्ष तिच्या वडिलांकडे व भावाकडे गेले ; ते दोघे डोळे भरून तिलाच पाहत होते. तर गणू बिचारा रडकुंडीला आला होता. ते पाहून तिच्या हृदयात धस्स्स झालं. तिने एक नजर बाजूला बसलेल्या पाटलांवर टाकली. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. पण छया.....!.सावकारांचा पूर्ण चेहरा फुलांनी झाकलेला होता. त्या मुंडावळ्या आणि बाशिंगात नक्की कोण आहेत हे काही तिला ओळखता आलं नाही. तरीही ती एका नजरेने त्यांना पाहत होती, पण तिला काही त्यांचा चेहराही पाहता आला नाही...!
चौरंगावर बसवल्यावर त्या दोघांच्या गळ्यात हार टाकण्यात आले...देवीच्या,तिथे जमलेल्या प्रतिष्ठित मंडळीच्या व गावाकऱ्यांच्या साक्षीने पाटलांनी त्यांच्या नावाने तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलं....
. नंतर कमलाबाईनी पुढे येऊन लोकांमध्ये पाटलांच नाव घेतलं, पण लोकांच्या आवाजामुळे तेही अनुश्रीला ऐकू गेले नाही. नंतर पाटलांच्या हस्ते तिथे जमलेल्या सगळ्या कळावंतीनीला आणि गावातील महिलांना साड्या वाटण्यात आल्या.
सगळे कार्य, विधी पूर्ण झाले तसे पुन्हा एकदा देवाचे दर्शन घेऊन अनुश्री आणि पाटील बाकीच्या लोकांसोबत वाड्याकडे निघाले. तिच्या मनात खूप शंका दाटून येत होत्या....
अनुश्रीच लग्न कुणासोबत झालं असावं?
अनुश्रीचा पुढचा प्रवास कसा असेल????
क्रमश :-
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा